राजेंद्र जोशी
युरोपातील दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था अडचणीत असून राफेलमुळेे जगातील देशांच्या लष्करी सामर्थ्याला पंख देणार्या फ्रान्समध्ये एका वर्षात 4 पंतप्रधान पायउतार झाले आहेत.
जगातील देशांना राफेलसारख्या लढाऊ विमानांचा पुरवठा करून लष्करीद़ृष्ट्या सामर्थ्यवान बनविणारा फ्रान्स सध्या आर्थिक आघाडीवर मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करतोय. देशावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. महसुली आणि वित्तीय तुटीने उच्चांकी पातळी गाठली आहे; पण कमकुवत झालेल्या अर्थकारणासोबत सध्या जपानमध्ये राजकीय अस्थिरतेनेही टोक गाठलेय. अस्थिरतेच्या भोवर्यात अडकलेल्या युरोपातील दुसर्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक शिस्तीच्या वळणावर आणण्यासाठी प्रयत्न करणारे फ्रान्सचे पंतप्रधान फ्राँस्वा ब्रायू यांना तेथील संसदेत विश्वासदर्शक ठरावावेळी अपयशाला सामोरे जावे लागले. यामुळे युरोपियन युनियनमध्ये खळबळ माजली आहे. साहजिकच आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांना नवा सहकारी शोधावा लागेल. तथापि, आर्थिक शिस्तीच्या विरोधात संसदेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे जगात महासत्तांच्या पंक्तीमध्ये 7 व्या क्रमांकावर खाली गेलेल्या फ्रान्सला मोठ्या संक्रमणाला तोंड द्यावे लागणार आहे.
गेल्या आठवड्यात फ्रान्सच्या संसदेत 74 वर्षीय मध्यमवर्गीय विचारांचे पंंतप्रधान फ्राँस्वा ब्रायू यांनी फ्रान्सला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी 44 अब्ज युरोंचे खर्च कपात व दरवाढीचे प्रस्ताव मांडले होते. यामध्ये दोन सार्वजनिक सुट्ट्या रद्द करण्याचाही प्रस्ताव होता. या प्रस्तावासोबत विश्वासदर्शक ठराव होता; पण हा प्रस्ताव विश्वासदर्शक ठरावासह 364 विरुद्ध 194 या मतफरकाने फेटाळून लावला. स्वाभाविकतः पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्षकांकडे राजीनामा सादर केला असला, तरी ब्रायू हे फ्रान्सच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणारे चौथे पंतप्रधान ठरले. डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या ब्रायू यांना 8 सप्टेंबर रोजी पदत्याग करावा लागला. त्यांना 8 महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यांच्यापूर्वी पंतप्रधानपद भूषविलेले मिशेन बर्नियर यांना अवघ्या 90 दिवसांचा, तर तत्पूर्वी वयाच्या केवळ 35 व्या वर्षी पंतप्रधानपद भूषविलेल्या गॅबि—यल अटाल यांना पंतप्रधानपदावर दोन महिनेही राहता आले नाही.
मॅक्रॉ 2017 मध्ये सत्तेत आले. त्यांच्या मध्यममार्गी आघाडीला संसदेत बहुमत मिळाले नाही. यामुळे त्यांनी 2024 मध्ये मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाणे पसंत केले. त्या निवडणुकीत त्यांनी उजव्या विचारसरणीच्या मेरीन ले पेन यांच्यावर विजय मिळवून सुधारणा व आधुनिकीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला होता; पण या निवडणुकीत त्यांना बहुमत मिळण्याऐवजी फ्रान्सची नॅशनल असेंब्ली आणखी तुकड्यांत विभागली गेली. यामुळे पंतप्रधान बदलण्याचे सत्र सुरूच राहिले. मॅक्रॉ यांनी फ्रान्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ब्रायू हे सहावे पंतप्रधान होते. युरोपातील बलाढ्य अर्थसत्ता म्हणून ओळखल्या जाणार्या आणि लढाऊ शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये जगात अग्रेसर असलेल्या फ्रान्सच्या डोक्यावर सध्या सुमारे 3.35 ट्रिलियन युरोचे कर्ज आहे. युरोपीय युनियनच्या रचनेत वित्तीय तुटीला जीडीपीच्या 3 टक्क्यांची मर्यादा आहे. तथापि, फ्रान्समध्ये वित्तीय तूट मर्यादेच्या जवळजवळ दुप्पट म्हणजे 5.8 टक्क्यांवर गेली होती. एकूणच फ्रान्सच्या अर्थकारणाभोवती अस्थिरतेचा भोवरा मोठा आहे. त्यातही संसदेत कोणत्याच आघाडीला बहुमत नाही. छोट्या पक्षांची मोट बांधून मॅक्रॉ प्रयोग करताना दिसताहेत; पण आर्थिक शिस्तीचा प्रयत्न करावयास कोणी प्रयत्न केला, तर त्याला सत्तेतून खाली खेचण्यामध्ये फ्रान्सची नॅशनल असेंब्ली पुढाकार घेत आहे.