काळाचा महिमा अगाध असतो, असे म्हणतात. काळाचे चक्र मानवी आकलनाच्या पलीकडचे आहे, हे नेहमी सिद्ध होत असते. फिरंगी पुन्हा भारतात वाजत-गाजत आले आहेत, याचा प्रत्येक भारतीयाला आनंद होईल, यात शंका नाही. स्वातंत्र्यपूर्वकाळात प्रत्येक गोर्या माणसाला फिरंगी असे म्हटले जायचे. आजच्या सोप्या भाषेत सांगायचे तर फॉरेनर. ब्रिटिश लोकांना ‘साहेब’ असे संबोधले जायचे. इंग्लंडचे हे गोरे लोक पूर्वी भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले.
इंग्लंडचे पंतप्रधान केअर स्टॅर्मर हे त्यांच्यासोबत त्यांच्या देशातील 101 मोठ्या उद्योगपतींना घेऊन आपल्या देशाच्या मुंबई शहरात उतरले आहेत. भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यासाठी ते भारतात आले आहेत. संरक्षण विषयक करार असतील, तर ते दिल्लीत केले जातात आणि व्यापार विषयक काररांसाठी मुंबईला प्राधान्य असते. काळाचा महिमा बघा. फार पूर्वी आलेल्या ब्रिटिश लोकांनी व्यापार करण्याऐवजी भारताला गुलाम बनवले आणि अमानुषपणे लुटले. दि. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला आणि इंग्रज येथून निघून गेले. आज स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर तोच ब्रिटन पुन्हा व्यापार करण्यासाठी भारतात आला आहे; पण यावेळी ब्रिटनला भारताच्या मदतीची फार गरज आहे.
आपल्या देशाप्रमाणेच ब्रिटनही ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे त्रस्त आहे. भारत आणि इंग्लंड या दोघांनाही ट्रम्प यांच्या विक्षिप्त व्यवहाराचा डायरेक्ट फटका बसल्यामुळे तत्काळ दोघांना येऊन एकत्र येऊन मुक्त व्यापार करार करायचा आहे. कधीकाळी आपला गुलाम असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या मदतीने इंग्लंडला स्वतःची अर्थव्यवस्था वाचवायची आहे. त्यांचे पंतप्रधान येताना सोबत शेकडो सीईओ आणि कंपन्यांचे अधिकारी घेऊन आले आहेत, ज्यामध्ये बँका आणि असंख्य उत्पादनांचे उद्योगपती आहेत. त्याचबरोबर ब्रिटिश एअरवेज, रोल्स रॉईस असे महत्त्वाचे उद्योग समूह आहेत. आपल्या देशाच्या ताकतीची कल्पना देणारा अनेक आणखी एक ऐतिहासिक निर्णय अमेरिकेत घेतला गेला आहे. ज्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताशी थेट शत्रुत्व घेताहेत, त्याच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने आता दिवाळीला अधिकृत राज्य सुट्टी म्हणून घोषित केले आहे. अमेरिकेत दिवाळीला सुट्टी देणारे कॅलिफोर्निया हे तिसरे राज्य ठरले आहे. अशा असंख्य घडणार्या घटनांमुळे आपला देश दर दिवशी स्वतःच्या ताकदीमध्ये भर टाकत आहे, हे सहज दिसून येते. जर्मन लक्झरी कार मर्सिडीजने नुकतीच आकडेवारी घोषित केली आहे. ही महागडी कार भारतात दर सहा मिनिटाला एक या वेगाने विकली गेली आहे, ही आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आहे. कधीकाळी आपल्यावर राज्य करणारे इंग्रज व्यापार करून आपली मदत घेत आहेत, याचा आपणा सर्वांना अभिमान वाटेल, यात शंका नाही.