तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे फूल लिलाव बाजार सुरू करण्यात येणार आहे. Pudhari File Photo
संपादकीय

राज्यात पहिला फूल लिलाव बाजार पुण्यात बहरणार

बंगळूरच्या धर्तीवर तळेगाव दाभाडेत केंद्र

पुढारी वृत्तसेवा
डी. बी. चव्हाण

कोल्हापूर : फुलांची पणन व्यवस्था बळकट व्हावी, शेतकरी फूलशेतीकडे वळावेत, यासाठी केंद्र सरकारची शेतीमाल निर्यात मार्गदर्शन संस्था (अपेडा) आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्या वतीने बंगळूरच्या धर्तीवर तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे ‘फ्लॉवर ऑक्शन सेंटर’ (फूल लिलाव बाजार) सुरू करण्यात येणार आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

राज्यातील पहिले फूल लिलाव केंद्र असून, त्याचा लाभ पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांतील फूल उत्पादक शेतकरी यांना होऊ शकतो. हा बाजार जागेवर लिलावाद्वारे आणि ऑनलाईन लिलाव या दोन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील फूल उत्पादक शेतकरी, फुले खरेदी करणारे स्थानिक व्यापारी, देशातील व विदेशातील व्यापारी फुले खरेदी करू शकणार आहेत.

कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले म्हणाले, देशात बंगळूरला फुलांचा मोठा बाजार आहे. गुलाब, कमळ यासह जरबेरा, निशिगंध, झेंडू या फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी बंगळूर बाजारात आपली फुले घेऊन जातात. आता तळेगाव दाभाडे येथे फुलांचा बाजार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना या ठिकाणी फुले घेऊन येणे शक्य होणार आहे. दरम्यान, यासंदर्भात पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव परिसरातील फूल उत्पादक शेतकरी यांची बैठक झाली. या बैठकीला ‘अपेडा’चे प्रतिनिधी, राज्य शासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. हा बाजार सुरू करावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. त्यानुसार या बाजाराचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याचबरोबर राष्ट्रीय सुगी पश्चात संस्थेतर्फे फूल उत्पादक शेतकर्‍यांना फुलांची काढणी, ग्रेडिंग, बियाणे, रोपे तयार करणे, खते, औषधे यासंबंधी माहिती देणारे केंद्रही तळेगाव येथे सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.

फुलांच्या जाती अशा

गुलाब, जरबेरा, कार्नेशन, झेंडू, सदाफुली, तुळस, कमळ, अबोली, मधुमालती, बहार, जयफूल, चमेली, निशिगंध, चाफा, रातराणी, गणेश वेल, कर्दळ फुले, ब्रह्मकमळ, आकाश नील, शेवंती आदी जातीची फुले विक्रीसाठी येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT