Navi Mumbai international airport | प्रगतीच्या पंखांना नवे बळ (Pudhari File Photo)
संपादकीय

Navi Mumbai international airport | प्रगतीच्या पंखांना नवे बळ

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि अनेक विक्रमांची नोंद झाली. देशातील सर्वात मोठे ग्रीन फिल्ड विमानतळ प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी खुले झाले. देशातील एकाच शहरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ असण्याचा बहुमान मुंबईने पटकावला. महामार्ग, द्रुतगती मार्ग, उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि जलवाहतुकीने जोडलेले हे देशातील एकमेव विमानतळ आहे. जवळपास 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. 1997 मध्ये या विमानतळाचा प्रस्ताव पुढे आला. 2007 मध्ये त्याला केंद्राने मान्यता दिली. दरम्यानच्या काळात झालेली सत्तांतरे आणि कोरोनाचा कालावधी, यामुळे विमानतळ आकारास येण्यास तीन वर्षांचा विलंब झाला. या विमानतळामुळे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांचा देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुकर होणार आहे.

सध्या प्रचंड मोठी वाहतूक कोंडी भेदत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचावे लागते. जितका वेळ पुण्याहून मुंबईच्या वेशीपर्यंत येण्यासाठी लागतो तितकाच; किंबहुना त्याहीपेक्षा अधिक वेळ गर्दीच्या वेळेत मुंबईच्या वेशीवरून आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी लागतो. हा वेळ आता नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाचणार आहे. 2032 पर्यंत या विमानतळावरून दरवर्षी तब्बल नऊ कोटी प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. दुसरीकडे, अडीच दशलक्ष मेट्रिक टनांची मालवाहतूकदेखील या विमानतळावरून सुरू होईल. दोन समांतर धावपट्ट्या आणि चार टर्मिनल असलेले हे महाकाय विमानतळ येत्या काळात देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांपैकी एक असेल.

देशातील कोणत्याही विमानतळावर नसतील इतक्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे हे विमानतळ महाराष्ट्रासाठी नक्कीच गौरवास्पद ठरेल. याच नवी मुंबईत जेएनपीटीसारखे आंतरराष्ट्रीय बंदर आहे. तिथून भारतीय उत्पादने जगभर जातात. विशेषतः, कृषी उत्पादने विदेशात पाठवण्यात हे बंदर सिंहाचा वाटा उचलते. आता या बंदराच्या जोडीलाच नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मालवाहतूक सुरू होईल. त्यामुळे भाजीपाला, फळे आणि मासे असा नाशिवंत माल विदेशात मोठ्या गतीने पोहोचू शकेल. एका विमानतळाच्या उभारणीमुळे परिसराचा काय कायापालट होऊ शकतो. हे पाहायचे असेल तर नवी मुंबईच्या थक्क होणार्‍या प्रगतीकडे एक नजर फिरवावी लागेल. पायाभूत सुविधा, बांधकाम व्यवसाय, हॉटेल उद्योग, वैद्यकीय आणि शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी प्रचंड मोठी चढाओढ लागली आहे. अर्थात, याआधीच नवी मुंबईचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू झाला आहे.

याशिवाय जगातील नामवंत विद्यापीठांनीदेखील नवी मुंबईमध्ये आपला परिसर उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार केला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या येथे पाय रोवत आहेत. आंतरराष्ट्रीय कृषी उत्पन्न बाजाराची पायाभरणीदेखील झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे मोत्यांचे पार्क होऊ घातले आहे. भविष्यात नवी मुंबईसारखे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकणार आहे. पायाभूत सुविधांतून कोणत्याही शहराच्या प्रगतीचा महामार्ग ठरत असतो. या शहराची वाटचाल त्याद़ृष्टीने वेगाने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या प्रगतीला विशाल असे पंख लाभले आहेत.

हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत असतानाच देशातील अनेक शहरांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा निर्णय केंद्र आणि तेथील राज्य सरकारांनी घेतला आहे. राजधानी दिल्लीसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहराला मेट्रो मार्गामुळे बर्‍यापैकी दिलासा मिळाला आहे. आता हा मेट्रो मार्ग आणखी विस्तारणार आहे. 16 किलोमीटर लांबीच्या या विस्तारित मेट्रो मार्गावर 13 स्थानके तयार करण्यात येत आहेत. सध्या दिल्लीचे नाव वायू प्रदूषणाच्या बाबतीत जगभरात कुप्रसिद्ध आहे. या प्रदूषणाला रस्ते वाहतूक 40 टक्के कारणीभूत असल्याचा निष्कर्ष नुकताच काढण्यात आला आहे. हे प्रदूषण कमी करायचे असेल, तर धूरविरहित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यावे लागेल. दिल्लीत साडेतीन हजारांवर इलेक्ट्रिक बसेस धावतात. मात्र, मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत त्या अत्यंत कमी आहेत.

रस्त्यांची मर्यादा लक्षात घेता एका ठराविक संख्येपर्यंतच या बसेस रस्त्यावर धावू शकतील. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मोठा डोलारा मेट्रोवर अवलंबून असणार आहे. वातावरण प्रदूषणमुक्त राखण्यासाठी आणि जलदगतीने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास मेट्रोसारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. त्यामुळेच दिल्ली मेट्रोच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारने 12,000 कोटींहून अधिक निधी देण्याचे ठरवले आहे. बंगळूरसारख्या महानगरातही कर्नाटक सरकारने मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. जपानच्या सहकार्याने बंगळूरमध्ये मेट्रो मार्गाची उभारणी सुरू आहे. पुढील वर्षी 38 किलोमीटर, तर 2027 पर्यंत 175 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाची उभारणी या शहरात केली जाईल. पर्यटन आणि माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांमुळे बंगळूरने आंतरराष्ट्रीय नकाशावर आपले स्थान निर्माण केले आहे. या शहराचे क्षेत्रफळ पाहता तिथे लोकसंख्येची दाटी अधिक आहे.

खासगी वाहनांची संख्याही अधिक आहे. परिणामी, हे शहर सातत्याने वाहतूक कोंडीत अडकलेले असते. त्यावर उपाय म्हणून तेथे मेट्रो मार्गाचे जाळे अधिकाधिक पसरवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे जितके झपाट्याने हे जाळे विस्तारेल, तितकी या वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता होईल. पुणे आणि नागपूर येथेही मेट्रो मार्ग शहराच्या विविध भागांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नागपुरात दुसर्‍या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सततच्या पाठपुराव्यांमुळे नागपूरची मेट्रो वेळेत सुरू झाली आणि त्याचे विस्तारीकरणही झपाट्याने होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे मेट्रोसाठी सरकारने शंभर कोटींचे भाग भांडवल उभारण्यासाठी मंजुरी दिली. त्यामुळे या शहरातील मेट्रो मार्ग विस्तारण्यासाठी सज्ज झाला आहे. एकूणच देशातील मोठ्या शहरांत सार्वजनिक वाहतूक सुविधांची उभारणी झपाट्याने सुरू झाली आहे. यात प्राधान्याने महानगरांतील वाहनांमुळे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी मेट्रोसारखे पर्याय आणखी सक्षम करायला हवेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT