FIFA World Cup 2026 | ‘फिफा’चा महाकुंभ! (Pudhari File Photo)
संपादकीय

FIFA World Cup 2026 | ‘फिफा’चा महाकुंभ!

पुढारी वृत्तसेवा

फिफा विश्वचषक हा संपूर्ण जगाला खिळवून ठेवणारा एक अद्‌भुत आणि अवाढव्य महासोहळा असतो. दर ४ वर्षांनी येणारा हा महाकुंभ सुरू होतो तेव्हा जणू जगाची गती काही काळ संथ होते. सुमारे ३५० कोटी लोक दूरचित्रवाणी आणि विविध माध्यमांवरून या स्पर्धेचा थरार अनुभवतात. ‘फिफा’च्या मैदानातील एखादा चांगला क्षण खेळाडूला थेट देवाच्या स्थानी नेऊन बसवू शकतो, तर एक छोटी चूक त्याचे संपूर्ण आयुष्य, त्याच्या देशाच्या आशाआकांक्षा धुळीस मिळवू शकते. ‌‘फिफा‌’च्या निमित्ताने पृथ्वीवरील प्रत्येक खंड, प्रत्येक भाषा, प्रत्येक संस्कृती आणि प्रत्येक धर्मातील लोक एका सामायिक भावनेने जोडले जातात.

जगातील युद्धे, राजकीय संघर्ष, आर्थिक संकटे आणि सामाजिक मतभेद या सर्व कटू काळातही फुटबॉलने मानवजातीला एकत्र आणण्याची अद्‌भुत क्षमता दाखवून दिली आहे. फिफा २०२६ महासंग्राम १९ जुलैपर्यंत चालणार असून फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच ४८ देश यात एकमेकांशी भिडणार आहेत. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे देश यजमान आहेत. यापूर्वी विश्वचषकात ६४ सामने होत. यंदा १०४ सामने असून स्पर्धेचा कालावधी ३९ दिवसांचा आहे. ४८ देशांतील तब्बल १,२४८ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून हा एक विक्रम आहे. फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन तथा ‘फिफा’ची स्थापना २१ मे १९०४ रोजी झाली. तिचे मुख्यालय झुरिच, स्वित्झर्लंड येथे आहे. सध्या जगातील २०० पेक्षा जास्त देश या संस्थेशी जोडलेले आहेत. फिफा विश्वचषक हा देशा-देशांमध्ये खेळवला जातो.

क्लब फुटबॉलसाठी फिफा क्लब विश्वचषक ही एक वेगळी स्पर्धा असते. भारतदेखील ‘फिफा’चा एक सक्रिय सदस्य आहे. मात्र, भारतीय फुटबॉल संघाची जागतिक क्रमवारी आणि पात्रता फेरीतील कामगिरी कमकुवत असल्याने भारत अद्याप या मुख्य विश्वचषकासाठी पात्र ठरू शकलेला नाही. १९३० आणि १९३४ मधील पहिल्या दोन फुटबॉल विश्वचषकांमध्ये अवघ्या १३ ते १६ देशांनी सहभाग घेतला होता. पुढे १९८२ ते १९९४ या काळात २४ देशांना खेळण्याची संधी मिळाली. १९९८ ते २०२२ या कालावधीत ही संख्या ३२ देशांपर्यंत पोहोचली. यानंतर ‘फिफा’ने जगातील सर्व देशांची त्यांच्या खंडानुसार वेगवेगळ्या महासंघांमध्ये म्हणजेच कॉन्फेडरेशनमध्ये विभागणी केली आहे. एशियन कॉन्फेडरेशन, युरोपियन कॉन्फेडरेशन, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका आणि ओशनिया अशी ही विभागणी आहे. प्रत्येक खंडातील संघ विश्वचषकाचे तिकीट मिळवण्यासाठी आपापसात पात्रता फेऱ्या खेळतात. यंदा स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल, इंग्लंड आणि गतविजेता अर्जेंटिना हे विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ब्राझीलचा संघ संघर्ष करत असला, तरी त्यांना कधीही कमी लेखता येत नाही. कारण, भारतात जे स्थान क्रिकेटला आहे, तेच स्थान ब्राझीलमध्ये फुटबॉलला आहे.

तिथली मुले चालायला शिकण्यापूर्वी फुटबॉलशी खेळायला शिकतात, असे म्हटले जाते. ‌‘फिफा’च्या आजवरच्या प्रवासात ब्राझीलने सर्वाधिक म्हणजे ५ वेळा या करंडकावर नाव कोरले आहे. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असण्याचे कारण म्हणजे त्याचे साधेपण. हा खेळ खेळण्यासाठी महागड्या साहित्याची गरज नसते. एक चेंडू, मोकळे मैदान आणि झुंझार खेळाडू पुरेसे ठरतात. या स्पर्धेतील कामगिरी खेळाडूंना अमर बनवते. १९८६ च्या विश्वचषकात मॅराडोनाने इंग्लंडविरुद्ध हाताने मारलेला गोल ‌‘हँड ऑफ गॉड‌’ म्हणून प्रसिद्ध झाला. एका फायनलमध्ये फ्रान्सचा महान कर्णधार झिनेदिन झिदान याने इटलीच्या मार्को मॅटरेझीला मारलेला ‌‘हेडबट‌’ अत्यंत नाट्यमय होता. त्या चुकीमुळे झिदानला रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढण्यात आले आणि फ्रान्सने तो विश्वचषक गमावला. त्यामुळे ‌‘फिफा‌’मधील प्रत्येक सेकंद इतिहास रचणारा आणि बदलणारा असतो. १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान ख्रिसमसच्या दिवशी पश्चिम आघाडीवर ब्रिटिश आणि जर्मन सैनिकांनी काही काळासाठी युद्धविराम जाहीर करून फुटबॉल खेळल्याची घटना आजही मानवतेचे प्रतीक म्हणून स्मरणात आहे. युद्धाच्या भयावह वातावरणात काही तासांसाठी सैनिकांनी बंदुका खाली ठेवल्या आणि राष्ट्रांमधील सीमांपेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व दिले होते.

‘फिफा’च्या अंदाजानुसार, जगभरात ५ अब्जांहून अधिक लोक फुटबॉलशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडलेले आहेत. २०२२ मधील कतार विश्वचषकाची अंतिम लढत जवळपास १.५ अब्ज लोकांनी पाहिली होती. संपूर्ण स्पर्धेच्या प्रसारणाने ५ अब्ज प्रेक्षकांपर्यंत पोहोच केल्याचा दावा ‘फिफा’ने केला आहे. या विश्वचषकामुळे जगभरातील पर्यटन, हॉटेल व्यवसाय, वाहतूक, जाहिरात आणि प्रसारण क्षेत्रांना मोठी चालना मिळते. ‘फिफा’ ही स्वतः अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणारी संस्था आहे. युरोपातील प्रमुख लीग्सची वार्षिक आर्थिक उलाढाल अनेक देशांच्या अर्थसंकल्पाशी स्पर्धा करणारी आहे. २०२२ च्या कतार विश्वचषकासाठी अंदाजे २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च आला होता. आज पर्यावरणीय परिणामांच्या चर्चेतही फुटबॉल विश्वचषक केंद्रस्थानी आहे. कारण, लाखो प्रेक्षकांच्या प्रवासामुळे कार्बन उत्सर्जन वाढते, प्रचंड स्टेडियमसाठी मोठ्या प्रमाणावर संसाधनांचा वापर होतो आणि स्पर्धांदरम्यान ऊर्जेचा वापरही वाढतो. त्यामुळे अलीकडच्या काळात ‌‘ग्रीन वर्ल्डकप‌’ ही संकल्पना पुढे येत आहे. अक्षय ऊर्जेचा वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार्बन ऑफसेट कार्यक्रम यांच्या साहाय्याने ही संकल्पना पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

सोशल मीडिया आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे फुटबॉलचा प्रभाव आणखी वाढला. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, किलियन एम्बापे यासारख्या खेळाडूंचे सोशल मीडिया फॉलोअर्स अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहेत. या महान खेळाडूंचे प्रत्येक गोल, प्रत्येक प्रतिक्रिया आणि प्रत्येक निर्णय जागतिक चर्चेचा विषय ठरतात. कारण, फुटबॉल केवळ खेळ राहिलेला नाही. तो संस्कृती आहे, अर्थव्यवस्था आहे, राजकारण आहे, मनोरंजन उद्योग आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो भावनांचा महासागर आहे. हा खेळ लोकांना आनंद देतो, रडवतो, प्रेरणा देतो आणि कधीकधी राष्ट्रांच्या सामूहिक स्मृतीचाही भाग बनतो. म्हणूनच फिफा विश्वचषक ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून, मानवजातीच्या सामूहिक उत्सवाचे सर्वात मोठे व्यासपीठ मानले जाते. जग बदलत राहील, तंत्रज्ञान विकसित होत राहील, राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये युद्धे होत राहतील, आर्थिक दुष्टचक्रे येत राहतील; पण फुटबॉलच्या एका गोलने निर्माण होणारा जल्लोष आणि त्यातून निर्माण होणारी जागतिक एकात्मतेची भावना कदाचित कधीच बदलणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT