हवामान खात्याने 2025 साठी अत्यंत उत्साहजनक अणि दिलासादायक भाकित केले असून यानुसार गेल्या 6 वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाऊस वेळेच्या आधीच येऊ शकतो, असे सांगितले आहे. अर्थात, दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या मध्यान्हीच पावसाच्या सरी कोसळणे हा हवामान बदलांचा चमत्कार म्हणायला हवा. अन्यथा गेल्या 25-30 वर्षांत मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस कधीही झाल्याचे दिसून आलेले नाही.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीमध्ये यंदा सरासरीच्या 105 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आपल्या देशातील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने हवामान खात्याने दिलेली चांगली बातमी ही कृषीप्रधान देशातील शेतकर्यांना नवा आशेचा किरण दाखविणारी आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत असेल, तर देशाची अर्थव्यवस्था, शेती, शेतकर्यांसाठी अतिशय चांगली बाब राहू शकते. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर पाऊस येणार असल्याने शेतकर्यांना पेरणीसाठी योग्य वेळ मिळेल आणि त्यामुळे पीक उत्पादनात सुधारणा होऊ शकते.
साहजिकच ग्रामीण भागात मागणी वाढेल आणि अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मदत मिळेल. शिवाय परिसरातील तलाव, विहीर, जलस्रोतांनाही वेळेवर येणारा पाऊस लाभदायी ठरणार आहे. भारतात दरवर्षी कोट्यवधी शेतकरी पावसाच्या पहिल्या शिडकाव्याची आतुरतेने वाट पाहत असतात. चांगल्या पावसाचा परिणाम खरीप पिकाच्या उत्पादनावर पडेल आणि त्यामुळे काही विशेष खाद्यपदार्थांच्या किमतीत घट होऊ शकते. तांदूळ, बाजरी, कापूस, मका, सोयाबीन, भुईमूग आदी खरीप पिकांचे उत्पादन हे चांगल्या पावसावर अवलंबून आहे. त्याची लागवड जून-जुलैपासून सुरू होते. अशोवळी पुरक पाऊस असेल, तर खरीप पिकांचे उत्पादन वाढण्यास हातभार लागेल आणि त्यामुळे महागाईवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.
महागाई कमी झाली, तर अर्थव्यवस्थेला फायदा मिळेल. एकुणातच पाऊस हा भारतीय कृषीची जीवनरेषा आहे. एका अंदाजानुसार, पावसावर दोन खर्व डॉलरची अर्थव्यवस्था अवलंबून असून किमान 50 टक्के कृषी क्षेत्राला पावसामुळे पाणी मिळते. सुमारे 800 दक्षलक्ष नागरीक ग्रामीण भागात राहतात आणि ते शेती कामावर अवलंबून आहेत. ते भारताच्या जीडीपीत चौदा टक्के योगदान देतात. त्याचवेळी पाऊस हा देशभरातील वीज उत्पादनाबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असणारे तलाव भरण्याचेदेखील काम करतो. शेतीपासून ते जेवणाच्या टेबलापर्यंत एक साखळी असते आणि अशा स्थितीत पावसाळ्याचे वेळापत्रक बिघडले, तर संपूर्ण साखळीवर त्याचा परिणाम होतो. परिणामी, आर्थिक घडामोडीदेखील बिघडू शकतात. पावसाने खरीप पिकांना लाभ मिळतोच, त्याचवेळी रबी हंगामात म्हणजे हिवाळ्यात लागवड होणार्या पिकांसाठीदेखील मातीत आर्द्रता राखण्यास मदत करते.
2025 मध्ये चांगला पाऊस असण्याची शक्यता असताना सरकारने शेतकर्यांच्या चेहर्यावरील आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. गेल्या दोन दशकांत भारतीय हवामान खात्याने पावसासंबंधी केलेले भाकित बर्यापैकी अचूक ठरले आहे. मार्च 2025 मध्ये अॅडव्हान्स एरोसोल लिडर सिस्टीम तैनात केली असून यामुळे पावसाचा अंदाज पूर्वीपेक्षा अधिक अचूक ठरत आहे, तरीही काही जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर अचूक अंदाज आणि पावसाळ्यात स्थितीवर लक्ष ठेवणे यासाठीच्या प्रणालीचा अभाव आहे.