सावकारांच्या कर्जाचे आव्हान (Pudhari File Photo)
संपादकीय

Farmer Debt Crisis | सावकारांच्या कर्जाचे आव्हान

गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेले दिसतात. शेतकर्‍यांना सावकारांच्या कर्जातून वाचवून सरकारी व सहकारी कर्जांच्या छत्राखाली आणणे आवश्यक झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी सावकारांच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेले दिसतात. शेतकर्‍यांना सावकारांच्या कर्जातून वाचवून सरकारी व सहकारी कर्जांच्या छत्राखाली आणणे आवश्यक झाले आहे.

डॉ. जयंतीलाल भंडारी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

अलीकडेच राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) प्रसिद्ध केलेल्या ग्रामीण धारणा सर्वेक्षण अहवाल 2025 मध्ये ग्रामीण भारतातील कर्ज वितरण आणि त्यासंबंधी अडचणींवर काही अतिशय महत्त्वाच्या बाबी नमूद झाल्या. या अहवालातील पहिली महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागात 54.5 टक्के कुटुंबे आता केवळ औपचारिक स्रोतांद्वारेच (प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी संस्था, सूक्ष्म वित्त संस्था इ.) कर्ज घेत आहेत. हा टक्का सर्वेक्षण सुरू झाल्यापासूनचा सर्वाधिक आहे. औपचारिक स्रोतांतून कर्ज देताना काही ठरावीक सरकारी नियम व व्याजदर लागू असतात, त्यामुळे शेतकर्‍यांना शोषणापासून संरक्षण मिळते.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भारतात औपचारिक कर्ज व्यवस्थेत सुधारणा झाली असली, तरी अजूनही अनेक कुटुंबे सावकार, नातेवाईक, मित्र व इतर अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून आहेत. सुमारे 22 टक्के ग्रामीण कुटुंबे पूर्णपणे सावकारांवर आणि अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून आहेत. या वर्गाकडून अजूनही 17-18 टक्क्यांपेक्षा अधिक व्याजदराने कर्ज दिले जाते. अहवालात असेही नमूद आहे की 23.5 टक्के कुटुंबे औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही स्रोतांवरून कर्ज घेतात.

2019 मध्ये सुरू झालेली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही लहान शेतकर्‍यांसाठी आर्थिक आधारस्तंभ ठरली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 9.7 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना 20 हप्त्यांमध्ये 3.9 लाख कोटी रुपये देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण नागरिकांना त्यांच्या जमिनीचा कायदेशीर हक्क मिळवून देण्यात येत असून, त्यामुळे त्यांचे आर्थिक सशक्तीकरणाचे नवे पर्व सुरू झाले आहे. परंतु, अजूनही 22 टक्के ग्रामीण लोकसंख्या सावकार आणि अनौपचारिक स्रोतांवर अवलंबून आहे. त्यामुळे लहान शेतकर्‍यांची आर्थिक सुरक्षा धोक्यात येत आहे. जेव्हा या शेतकर्‍यांना उत्पन्नातील अस्थिरता, ऋतुमानिक जोखमी आणि सरकारकडून अपुर्‍या निधी हस्तांतरणाची समस्या भेडसावते, तेव्हा ते सावकारांच्या दाराशी मदतीसाठी पोहोचतात. व्याजदर प्रचंड असले तरी त्याशिवाय दुसरा पर्यायच या शेतकर्‍यांकडे उपलब्ध नसतो.

शेतकरी औपचारिक स्रोतांद्वारे कर्ज घ्यायचे ठरवतात; पण कागदपत्रांची कमतरता, हमीदारांचा अभाव आणि इतर कठीण अटींमुळे ते मागे हटतात. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार, सुमारे 50 टक्के कृषी कुटुंबे कर्जबाजारी आहेत. त्यांना संस्थात्मक बँकांबरोबरच गैरसंस्थात्मक स्रोतांवर म्हणजे सावकार व नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागते. अनेकदा शेतकर्‍यांना जड व्याजामुळे मूळ रक्कम फेडता येत नाही आणि व्याजाचा भार कमी करण्यासाठी नव्याने कर्ज घ्यावे लागते. अशा रीतीने ते सावकारांच्या कर्जजाळ्यात अडकत जातात. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2024-25 च्या वार्षिक अहवालानुसार, मार्च 2010 मध्ये ग्रामीण भागात 33,378 बँक शाखा होत्या, तर डिसेंबर 2024 पर्यंत हा आकडा 56,579 वर पोहोचला आहे. सहकारी संस्थांचेही नवे जाळे उभे राहिले आहे. मात्र, सावकारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी फक्त शाखा वाढविणे पुरेसे नाही. छोटे व अल्पमुदतीचे कर्ज प्रकल्प तयार करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील लघुउद्योग आणि उद्योजकांना विश्वासार्ह संस्थात्मक आर्थिक सेवा मिळाव्यात, यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT