संपादकीय

पहिला चहा : दिवसाआड पाणी...

पुढारी वृत्तसेवा

भाऊसाहेब : गणपतराव, आज तुमच्या घरी पाणी आलं का?

गणपतराव : नाही हो! आज येणार नाही. काल आलं होतं ना!

भाऊसाहेब : पाण्यालाही दिवसाआड सुट्टी मिळते; पण आपल्याला तर रोज अंघोळ करावी लागते!

गणपतराव : अहो, अंघोळीवर थोडीच बंदी घातलीय!

भाऊसाहेब : कालच्या पाण्यात भांडी घासली, कपडे धुतले, स्वयंपाक केला.

गणपतराव : आणि अंघोळ?

भाऊसाहेब : नाही! बायको म्हणाली, उद्या करा. पाणी वाचवा!

गणपतराव : वा! म्हणजे आता घरात स्वच्छतेपेक्षा जलसंधारणाला महत्त्व आलंय! मी तर पाण्याचा हिशेब वहीत लिहून ठेवतो.

भाऊसाहेब : कशाला?

गणपतराव : पुढच्या पावसाळ्यापर्यंत किती पाणी पुरेल, याचा अंदाज घ्यायला!

भाऊसाहेब : मग किती दिवस पुरणार?

गणपतराव : पुरेल; पण घरातल्या माणसांच्या अंघोळीचा हिशेब काही जुळत नाही.

भाऊसाहेब : खरंय! काल नातू म्हणाला, पोहायला शिकायचंय! मी म्हटलं, बाळा, आधी बादलीत पाय भिजवायला शिक. पोहण्याचा विचार पुढच्या पावसाळ्यात करू!

गणपतराव : (हसत) अहो, आमचा नातू पाण्याचा नळ म्हणाला, आजोबा, नळातून पाणी येत नाही, मग हा नळ बंद का करायचा?

भाऊसाहेब : लहान मुलांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यापेक्षा दुष्काळाला उत्तर शोधणं सोपं आहे.

गणपतराव : पण, पाणी वाचवायचं कसं?

भाऊसाहेब : सोपं आहे! दात घासताना नळ बंद, भांडी घासताना पाणी जपून, गळती असेल, तर ताबडतोब दुरुस्ती आणि पावसाचं पाणी साठवण्याची सोय!

गणपतराव : सोसायटीच्या अध्यक्षांनी काल सभा घेतली. म्हणाले, प्रत्येक थेंब जपून वापरा!

भाऊसाहेब : छानच!

गणपतराव : हो! पण, भाषण झाल्यावर हात धुवायला नळ पूर्ण उघडा ठेवला होता.

भाऊसाहेब : (डोक्याला हात ) म्हणजे पाणी कमी पडतं ते फक्त आभाळामुळे नाही, तर काही लोकांच्या सवयींमुळेही!

गणपतराव : खरंय! पाऊस कधी पडेल हे आपल्या हातात नाही; पण पडलेल्या पाण्याचा थेंब न् थेंब जपणं आपल्या हातात आहे.

भाऊसाहेब : अगदी बरोबर! आजपासून पाणी जपून वापरायचं आणि पावसाचं पाणी साठवायची सोय करायची.

गणपतराव : हो! कारण, पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवायचं असेल, तर आजच शहाणं व्हायला हवं!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT