संपादकीय

पहिला चहा | सिक्सर पे सिक्सर...

पुढारी वृत्तसेवा

युक्तिवाद, उक्तिवाद, सगळे शब्दांचे खेळ! आहे का वेळ इतका कोणाला? जाऊया म्हटलं कोर्टात जरा चक्कर मारून येऊ. अवघड केस कशा असतात पाहूया म्हटलं. सिक्सर पे सिक्सर! कपिल देवांची सिक्सर फिकी पडली आणि त्यांनीही मनोमन मान्य केले, ‘ये होती है सिक्सर!’ असा जोश त्या केसीचा. न्यायाधीशांचे त्रिसूत्री धोरण! किती विकेट कोणत्या वकिलांनी घेतल्या, यावर लक्ष केंद्रित करत प्रश्नांचा भडिमार न्यायाधीशांकडून होत होता. एकमेकांच्या विरोधातले दोन पक्षकार भांबावून गेले की, आता काय? कपिल देव किलबिल साहेब काही बेअरिंग सोडायला तयार नाहीत.

काही क्षणात किलबिल साहेबांनी कोर्टाला क्रिकेटचं मैदान करून टाकलं की, मीच चुकून कोर्टाला मैदान वाटून घेऊन प्रत्येकाला खेळाडूच्या रूपात पाहण्यात धन्य समजत पुढील सुनवाई उत्सुकतेने पाहत होतो? कोर्टापुढे केसच्या रूपात मांडलेला घोळ मी कुतूहलाने पाहत होतो. किलबिल साहेब कागदावर कागद बाजूला करत सगळ्या घटनांवर युक्तिवाद करत त्रिसूत्रीना सडेतोड उत्तरे देत होते आणि दोन्ही पक्षकार एकमेकांकडे खुन्नस देत श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं, या विवश मुद्रेत हादगा खेळतायत की काय, असं वाटत होतं. या दोन विरोधींना न्याय द्यायचा कसा, हा यक्ष प्रश्न भेडसावत असताना किलबिल साहेब निवडणूक आयोगाच्या यक्षप्रश्नाकडे वळले आणि एकेक गुंता सुटत गेला.

मी अवाक्‌ झालो. साम, दाम, दंड, भेद या नीतीने त्यांच्या पुढील युक्तिवादाला बळ मिळत गेले आणि एक हरलेला गड वारसा हक्काने वारशाला परत मिळाला. तब्बल तेरा वर्षांचं राजकारण क्षणात बिनकारणाचं कसं होतं, हे उलगडून दाखवण्यात आलं. तारुण्याच्या एक, दोन, तीन उंबरठ्यापलीकडे झुकलेल्या वयात, जोशात कोर्टाच्या पायऱ्या चढून सहज बाजी मारणे आणि एका शिंदेशाही थाटात, जयात- विजयात विघ्न आणणे ही हातोटीच होती. येत्या पंधराच्या तारखेच्या झेंड्याबरोबर भगवा ही पुन्हा आपल्या बालेकिल्ल्यावर फडकवला जाणार, पुन्हा शिवशाही येणार ती पूर्वीच्या थाटात यात विजय डोकावला; पण भाऊ मात्र धाकात राहिला! 'अरे ये तो ट्रेलर है, पिक्चर अभि बाकी है' हे मिम्स आठवत भावी मिमिक्रीला कसं सामोरे जाऊ बाप्पारे! असा विचार करून भाऊ कोर्टात बसून आहेत..! गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही, तर मोडून खाल्ली. हे काय बरोबर नाही भाऊराया! असो. तूर्तास जय शिवशाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT