पहिला चहा | शिंगरू..! 
संपादकीय

पहिला चहा | शिंगरू..!

अरुण पाटील

वरातीमागून घोडं नाचवायचं हे समीकरणच उलटं; पण वरात पुढे गेल्यावर घोड्याला नाचण्याची हौस निर्माण झाली आणि वरात तिथेच थांबून एका घोड्याचा नाच पाहू लागली. काय सुंदर घोडे हो. घोड्याचे स्वरूप म्हणजे मूर्तिमंत शिवशाही घोडा. मनाचेही न ऐकणारे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. दुरून पाहिलं तर घोडा, जवळून शिंगरू, गेलं एका चित्रकाराच्या कलादालनात. एकेक सुंदर फ्रेम मधील चित्रं पाहून शिंगरू खूश झालं. यापूर्वी एकही असे कलादालन त्याने पाहिले नव्हते. चुकून माकून तिथे ते शिरलं आणि घोळ घातलाच. दालनात ‘वेलकम’ चित्रपटातील चित्र पण होते. गाढवावर घोडे स्वार!

शिंगरूला त्याचं अप्रूप वाटलं. त्याला ते चित्र इतकं आवडलं इतकं आवडलं की उड्या मारून त्याने खुशी दर्शविली. दालनातले सगळे अस्वस्थ. यात काय एवढे? चित्र आणि विचित्र यातला फरक कळू नये की काय? उड्या मारताना बाजूचे चित्र त्याने धक्का देऊन पाडले. एकाने प्रसंगावधानाने ते अलगद उचलले आणि बाजूला ठेऊन दिले. बाकीच्या मौल्यवान फोटोंना धक्का लागू नये म्हणून त्या शिंगरूला बाजूला करण्यात आले. हा गदारोळ निस्तरताना बघ्यांनी शिंगरूला घेरा घातला. त्यातल्या एकाने त्याला विचारले...

इसम : बाबा रे, हा काय घोळ घातलास आणखी? काल तिकडे हींहीं करून लोक गोळा केलेस, आता इकडे. तूच ना तो?

शिंगरू : होय, मीच तो. अचाट चित्रकला आहे आमच्या पिताश्रींकडे. म्हणून या चित्राने मला पागल केले.

इसम : गाढवावर घोडा काढला आहे चित्रकाराने यात. हे चित्र आवडले आणि दुसरे चांगले होते ते पाडले. काय हे शिंगरूराव!

शिंगरू : ते चुकून पडले. आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही. द्या मला ते.

इसम : फुकट घेऊन जा. असल्या चित्राला कोण विचारले असते? भिंतीवरून बाजूला केले असते तर?

शिंगरू : खळ खट्याक...! हे घ्या पैसे. एवढेच आहेत. बाबांनी दिले होते नाश्त्यासाठी. त्या हॉटेलात सगळे पदार्थ होते शिळे. हे वाचलेले पैसे उपयोगी आले. घ्या.

इसम : आमचा मौल्यवान फोटो इथे लावतो आधी थोडं थांब. (फोटो अडकवत) हा बघ झाला लावून. तो फोटो तुला बक्षीस म्हणून ठेऊन घे. काय?

शिंगरू : धन्यवाद! आता गाढव आणि घोड्याचे चित्र भिंतीवर लावतो म्हणजे आमची युती पक्की... हीं हीं हीं.. (हिंहिणत)

इसम : ते गाढव मरेल घोड्याचे ओझे सांभाळून! त्याच्या आत पळ बाबा इकडून. काय त्या ‘वेलकम’ची क्रेझ या शिंगरूला! गाढव मेले ओझ्याने, शिंगरू गेले हेलपाट्याने. दुसरं काय! (उपहासाने)...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT