पहिला चहा : सासू मॉम आणि एआय..!  
संपादकीय

पहिला चहा : सासू मॉम आणि एआय..!

पुढारी वृत्तसेवा

सासू मॉम : अगं बाई, ते एआय की काय बंद पडलं बघ. काही समजेना. (मधुराची सासू मॉम बेडरूमचं दार ठोठावत)

मधुरा : (दार उघडत) काय? मला कशी समजली नाही बातमी? कुठं ऐकलं मॉम तुम्ही?

सासू मॉम : अगं, आपल्या घरातल्या गोष्टी कुठं कशाला ऐकायला पाहिजेत?

मधुरा : मी समजले नाही मॉम. एआय कधीपासून आपलं पर्सनल झालं?

सासू मॉम : अगं, सगळ्यांना विचारलं मी? त्यांचं त्यांचं चालू आहे. आपलंच बंद आहे?

मधुरा : म्हणजे, हे काय नवीन प्रकरण? बिल गेट्सने घोळ घातला की काय नवीन? एआय ऑप्शनल केलं की काय?

सासू मॉम : अगं, ते डबडं बंद पडलंय घरातलं. वरती लावलंय ते.

मधुरा : ओ ओके ओके. ते एआय नाही वाईफाय म्हणतात त्याला. काहीही असतं तुमचं. घाबरले की मी!

सासू मॉम : हो का? तेच ते. मी रेसिपी पाहत होते मोबाईलवर, तेवढ्यात ते बंद झालं! काय झालं बघ तेवढं.

मधुरा : बिल अपडेट होईल थोड्या वेळात. मोबाईल डेटा असेल ना तुमचा? तोवर चालवून घ्या.

सासू मॉम : मोबाईल डेटावर मध्येच व्हिडीओ अडकतो गं. जरा बघ की त्या फायचं.

मधुरा : त्याला वायफाय म्हणतात मॉम. मी कपड्यांची इस्त्री करतेय. ऑफिसला लेट होतोय.

सासू मॉम : बरं बाई. ते बिल गेट वर आलंय का? पाहू का? तुझा हेलपाटा वाचेल.

मधुरा : कोणतं बिल गेट वर आलंय? आजकाल मोबाईलवर भरतो ना बिल आपण?

सासू मॉम : मघाशी तूच बोलली ना, गेट वर बिल राहिलं म्हणून घोळ झाला म्हणून.

मधुरा : मॉम, तुम्ही इम्पॉसिबल आहात. एवढं सगळं बघता मोबाईलवर, तुम्हाला बिल गेट्स माहिती नाहीत का? मायक्रोसॉफ्टचे फाऊंडर आहेत ते. त्यांनी एआयबद्दल सतर्कता बाळगा, असं सांगितलंय. ते सांगत होते मी.

सासू मॉम : सांगणारच ते. ते मराठी नाव वाटतं ना एआय. कसं खपणार त्या गोऱ्यांना. खेडोपाडी लोकं आईला 'ए आय' म्हणून हाक मारतात तेव्हा नाकं मुरडता आणि त्या गोऱ्यांनी तेच नाव 'एआय' म्हणून कशाला तरी दिलं ते चालतं? चूक समजली वाटतं त्यांना.

मधुरा : मॉम, त्याचा अर्थ वेगळा होतो दोन्हीकडे. काय बोलता?

सासू मॉम : पण, उच्चार तर एकच आहे ना. बंदी घातलीच पाहिजे. सारखं आपलं एआय एआय. काय हाय का नाय..! लावा कामाला त्याला पण हाका मारून मारून. बिचाऱ्या आयांची आणि त्या एआयची सुटका नाही तुमच्याकडून, हेच खरं!

मधुरा : (हसत) लॅक ऑफ नॉलेज. सासू मॉम.. हा जोक होता का? एआय इज वेरी इंटेलिजेंट दॅन मॉम्स. ओके? हा हा..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT