पहिला चहा | रोज ऐकायचं तरी किती? 
संपादकीय

पहिला चहा | रोज ऐकायचं तरी किती?

पुढारी वृत्तसेवा

गोविंदराव : शामराव, बायकोचं ऐकलं की खरंच संसार सुखी होतो?

शामराव : छे! संसारात काही गोष्टी ऐकाव्या लागतात, काही ऐकूनही न ऐकल्यासारख्या कराव्या लागतात आणि काही गोष्टी तर जन्मभर ऐकूच नयेत, हेच पुरुषजातीचं अलिखित तत्त्वज्ञान आहे!

गोविंदराव : वा! म्हणजे तू ही असाच संसार करतोस तर! पण आता एका सुखी संसारात घटस्फोटाची ठिणगी पडलीय म्हणे! ऐंशी वर्षांच्या आजींनी आपल्या ८४ वर्षांच्या नवऱ्याविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला म्हणे!

शामराव : या वयात? पण कारण काय?

गोविंदराव : नवरेबुवा गेली अनेक वर्षे बहिरेपणाचे सोंग घेऊन राहत होते. बायको काही बोलली की ऐकूच येत नाही, असा चेहरा करायचे. अनेक वर्षे हा प्रयोग यशस्वीपणे सुरू होता. पण, नुकतंच आजींना कळलं की नवरा बहिरा नाही. मग काय, थेट घटस्फोटाची मागणी केली!

शामराव : अरे बापरे! म्हणजे आजोबांनी संसारात बहिरेपणाचा मुखवटा घालून इतकी वर्षे काढली!

गोविंदराव : खरं तरं आजींनी नवऱ्यासाठी चक्क सांकेतिक भाषा शिकण्याचा घाट घातला होता.

शामराव : हम्म.. मग आजोबा म्हटले असले मला दिसतंही नाही नीट

गोविंदराव : अगदी! उद्या आजी ब्रेल लिपी शिकल्या तर आजोबा म्हणतील, ‘माझ्या बोटांना मुंग्या येतात!’

शामराव : आता मात्र आजोबांची पंचाईत झाली की. इतकी वर्षे बायकोचं ऐकलं नाही, आता वकिलाचं ऐकावं लागणार!

गोविंदराव : पण, या वयात घटस्फोट मागून काय उपयोग. हे वागणं बरं नाही आजोबांच. पण, थोडं सबुरीनं घ्यायला हवं होतं आजींनी...

शामराव : होय. तिलादेखील संधी होतीच की... नवरा बहिरा झालेला नाही हे आपल्याला कळलेलेच नाही, असे भासवत रोज त्याला चार शिव्या द्यायच्या... मग नवऱ्याला त्या शिव्या ऐकूनही न ऐकल्यासारखं कराव्या लागल्या असत्या...

गोविंदराव : खरंच की, म्हातारीलाही आनंद मिळाला असता...

शामराव : हीच खरी आयुष्याची मज्जा... कशाला हवा कोर्ट आणि कज्जा...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT