पहिला चहा | हम पंछी इक डाल के..! 
संपादकीय

पहिला चहा | हम पंछी इक डाल के..!

पुढारी वृत्तसेवा

‘पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में, आज मैं आझाद हु दुनिया के चमन में’ राजनैतिक सद्यस्थिती या गाण्यावर अधोरेखित होत आहे, हे स्पष्ट आहे. या स्थितीची मार्मिक पडताळणी करावी, तर मर्मबोध व्हायला हवा. हल्लीच तीन हंस एकाच यानात बसले. कुठे जावे बरे? तू हो पुढे, मी मागून येतो. असं काहीतरी बोलणे झाले असावे. कोणीच एकमेकांशी संवाद न करता एकाच ठिकाणी पोहोचले. बरं मग मौन कशासाठी असावे बरे? ‘मन की बात मन ही जाने’. असावा सुंदर पक्ष्यांचा थवा, असे गाणे ओठांवर येता येता राहिले. या राजहंसांची महायुती अनुभवायला भाग्य लागते. वाह वाह, काय सुंदर त्रिकुट!

‘युं तो हमने लाख हंस देखे है, तुमसा नहीं देखा.’ दुर्मीळ दृश्य! नॉर्वेचे (नामधारी) हंस दिमाखात यानातून उतरत दोन हंसांच्या मागून कुठे अंतर्धान पावले ते कशासाठी काय की बाप्पा! राजकीय योग न म्हणता राजहंस योग म्हणावे ते उत्तम! करवीरात गुपचूप आगमन होता अंबाबाईला साकडे आणि महाजनांची भेट होताच तातडीने दुसरी राजधानी गाठायची होती. यान तातडीने दुसऱ्या ठिकाणी बिगिबिगी निघून गेले; पण राजहंसांच्या पाऊलखुणा नगरीत, देशात, परदेशात हल्ली एकत्रित उमटत आहेत. हे बऱ्याच सामान्यजनांच्या ध्यानी आले.

आता लोक यान दिसले की, युतीच्या आशेने ध्यान लावून बसतात; पण तूर्तास युतीची चिन्हे न दिसल्याने चोचीतून निसटलेले शिवधनुष्य कोण उचलणार याकडे जास्त लक्ष जातेय. ते दोन हंस तिकडे आपलं आपलं काम आटोपतील, कोणा एकाला न्याय मिळेल; पण दुसऱ्याचं काय? यशोदाला देवकीहाती कृष्ण सोपवताना जे दृश्य परिजनांनी पाहिले तेच आता पाहावे लागणार आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय, कसं काय, बरं हाय का?’ एवढंच उलटपक्षी घडणार आणि मॅटर क्लोज! ‘दो हंसोंका जोडा (वादातून) बिछड गया रे’ असेही काही म्हणतील. म्हणणाऱ्यांना काय हो.

चांगली ऐसपैस पथारी दिसली, तरी खुंटीवर टांगलेली होती तीच बरी होती, असेही म्हणतील. लोकांना निंदिस्त राहणं, हेच हवं असतं. तसे आजकालचे हंस पूर्वीच्या हंसांप्रमाणे तापट, एकाच कक्षेत न घुटमळणारे, महायुतीकडे पाठ करणारे नाहीत किंवा विकासाचे तोंड दाबणारेही नाहीत. जे घडेल त्याला तोंड देणारे आहेत. असं लोणच्याची फोड सरतेशेवटी तोंडी लावतो तसं बोलायला काहीच हरकत नाही. जेवणाला आणि बोलण्याला चव त्यामुळेच येते. असो, ‘हम पंच्छी इक डाल के, खाएंगे मिल बांटके’. ही म्हण आणि गाणं यांची युती करून धून बनवावी, असा विचार करायला हरकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT