राजजी मराठीशी बोलतात. ‘बाई मी बघ किती तुला डोकीवर घेऊन मिरवतो. 'मराठी घ्या मराठी...' सगळ्यांनी मराठी माझ्याकडून शिका. ही घ्या मराठी. आमच्याकडे हिंदी, इंग्रजी काही म्हणून मिळणार नाही. मी एक मराठी माणूस आहे. मराठीशी प्रामाणिक आहे म्हणून मराठी परप्रांतीयांच्या घशात घालतो. मराठी घ्या मराठी. आपलाच कोणी हिंदीत बोलला, तर त्याला खडसावतो.
ठाकरी भाषेत समजूत काढतो की, बाबा गामाशी! म्हणजे 'गाठ माझ्याशी' हे बोलतो मी. अशी संक्षिप्त भाषा पण येते आम्हास; पण त्याचे तुकडे पाडून कोणीही कसेही सोयीने बोलतो आजकाल. काही वचक नाही राहिला. कालपरवा लग्नाला गेलो. आमीर खान आपला. हिंदी चित्रपटाचा हिरो. त्याने बोलावले. गेलो मी त्याच्या तिसऱ्या लग्नाला. आता त्याची पहिली बायको हिंदू आहे. त्यामुळे मी त्याला हिंदू समजतो. त्याने भेदभाव केला नाही, याची जाण ठेवली आम्ही तर बिघडले कुठे?
मी हिंदुत्वाचं आणि मराठीचं रक्षण करतो. आमीरला मी चांगली मराठी कशी बोलली जाते, त्याचे धडे देऊन आलो हे कोणाला माहीत कसे नाही झाले? आता तो मराठी चांगला बोलतो. आम्ही त्या लग्नाला गेलो ते मराठीचा प्रचार करण्यासाठी. शेवटी आमचा राग परप्रांतीयांवर घसरतोच. त्या लग्नात मंगलाष्टक म्हटले नाही म्हणून मी जाम चिडलो आणि आमच्या कोड भाषेत समजून सांगितले विधीचे महत्त्व. शुद्ध मूर्खपणा आहे मंगलाष्टकविना लग्न म्हणजे. जाऊदे. आता हे मराठी भाषा, तूच माझ्याशी बोल माझे काय चुकले, मी तुझा प्रचार करतो ते. आजवर कितीतरी मराठी पाट्या प्रत्येक दुकानावर लावल्या गेल्या. ते थोडके नाही. मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करतो की, हा महाराष्ट्र फक्त मराठी भाषा बोलला पाहिजे. तर ते विधानसभेत आमचे मित्र एका वाक्यासाठी मराठीत नापास झाले.
काय गरज होती हिंदीत वाक्य पोहोचवायची आपल्या नेत्यांना. त्यांना मराठी येत नाही, तर शिकवावे ग म भ न! पण, आमचा मराठी माणूस शेवटी नको तिथे माणुसकी दाखवून फसणार हेच ओरडून सांगतो मी माय मराठी. तूच सांग आता मी काय बोलू कोणाला?
मराठी : ग ब स.
मराठीचा पवित्रा पाहून राजजी चुकलेल्या वाटेवरून (मिसिंग लिंक) भाऊंना वाट्टेल ते बोलले.