पहिला चहा | गर्जना आणि कोल्हेकुई! 
संपादकीय

पहिला चहा | गर्जना आणि कोल्हेकुई!

अरुण पाटील

उसाला तुरा आला की कोल्हे जमू लागतात; सत्तेला तडा गेला की नेते मोर्चाला निघू लागतात. उसाला तुरा आला की कोल्ह्यांना आनंद होतो. तो कुजबूज करू लागतो. फळांचा फडशा पाडण्यासाठी आपल्या गटांत खलबते करू लागतो. त्याला इतर समूहात कोल्हेकुई असे म्हणतात. परवा-परवा अशीच कोल्हेकुई ऐकू आली. त्यात सहभागी होणाऱ्यांनी आपल्या खलबतांना गर्जना, मोर्चा असे म्हटले.

इतके दिवस कोल्ह्यांना सत्तेतून बाहेर असल्याने काही कामच नव्हते. पण, काही विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू झाल्यावर कोल्ह्यांना आयती संधी चालून आली होती. त्यामुळे जो तो गर्जना करू लागला. असे गर्जना करणारे लोक संधी मिळेल तिथे गर्जना करू लागले. मोर्चा कोणीही काढू दे, गर्जना करणारे ठरावीक लोक वेळात वेळ काढून गर्जना करू लागले. संधी आली की हात धुवून घ्यायचा. स्वतः माईकसमोर उभे राहिले की सिंहगर्जना, दुसरा उभा राहिला की ध्वनिप्रदूषण!

काही मंडळींनी या गर्जनाकारांच्या मोर्चाला कोल्हेकुई म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या दृष्टीने ही गर्जना नसून कोल्हेकुई असली तरी या मोर्चात अनेक बडे एकापेक्षा एक वाघ, सिंह, बछडे सामील झालेले होते. सत्तेत नसल्याने ते मोकळेच असतात. त्यामुळे, तूर्तास गर्जना हेच काम. एक मात्र खरे, मोर्चात सहभागी झालेले मोठी तयारी करून आलेले. त्यांच्या चेहऱ्यावर आक्रमक भाव तसा कायम होता. आणि पुढचा मोर्चा कधी आहे, याची ते आस्थेवाईकपणे चौकशी करत होते.

मध्ये मध्ये आपण मोर्चाला आलो आहोत, हे मोर्चेकऱ्यांना लक्षात राहात नाही आणि ते रेंगाळतात. आपण गर्जना करायला आलो आहोत हे ते विसरून जातात. म्हणून त्यांनी सावध असायला हवे. फड सांभाळायला हवा. तो तुऱ्याला आला आहे. तो लुटून नेला जाऊ शकतो. त्यामुळे फडकऱ्यांनी हे ध्यानात ठेवून राहावे. खरे तर जंगल तेच, आवाज तोच; फक्त प्रत्येकाच्या राजकीय चष्म्याचा नंबर वेगळा! गर्जना आहे की कोल्हेकुई, हे ठरवण्यापेक्षा प्रश्न सुटतात की नाही महत्त्वाचे. कारण जनतेच्या पदरात काही पडलं नाही, तर शेवटी दोन्ही निव्वळ ‘आवाज’च ठरतात! एकंदरीत स्वतःची कोल्हेकुई ती गर्जना आणि दुसऱ्याची गर्जना ती कोल्हेकुई, हेच राजकारणातलं ध्वनिशास्त्र..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT