शरद ऋतू जर वर्षा ऋतूमध्ये अवतरला, तर काय होईल ते पावसाळी अधिवेशनात नेमके पाहायला मिळाले. पावसाळा अजून सुरू नाही झाला, तर शरदाचं चांदणं विधान भवनाकडे वळलं. ऋतू बदलाची तत्काळ वर्दी देण्यात आली. पूर्वेचे आकाश पश्चिमेला आलं आणि पश्चिमेचे पूर्वेला. ऋतू अवचित बदलल्याने जागा बदली अर्थातच होणार. कुठे, कोणी, कधी स्थानापन्न व्हावे हे कळेना. जिन्यावर चढून जाणं या ज्येष्ठ ऋतूला जमणारा विषय नव्हता. जिन्याजवजवळचे दालन उघडे दिसताच ऋतूने सिंहासनाकडे प्रस्थान केले. हे दालन शिंदेशाही थाटाचे असल्याने इंद्राच्या ऐराऊताने आक्षेप घेतला. ‘असे कसे, कधीही, कुठेही कक्षा सोडून कोणत्या ऋतूने इकडे तिकडे जावे. बरे दिसतं का ज्येष्ठ ऋतूला?’
शेरेबाजी झाली, ताशेरे झाले, तरीही शरद ऋतूचे गमन झाले नाही. मग, शिंदेशाही नमन झाले. ते झाडूसारखे असतात बघा काय म्हणतात त्याला हां बुके? बुकेच म्हणतात त्याला ते शरद ऋतूच्या आकस्मिक आणि अवकाळी आगमनाखतर तातडीने मीटिंगा सोडून बहाल करण्यात आले. सोबत शाल आणि श्रीफळही! जरी इतरवेळी या ऋतूबद्दल मुक्ताफळं उधळली गेली धनुष्यबांकडून तरी ‘कौतुके करू मी किती आदर’ असा धनुष्याचा पवित्रा योग्यच वाटला आणि ज्येष्ठाप्रती आपुलकी दिसली पण ऐराऊत खवळला त्याचे काय? इंद्राचे हातचे धनुष्य गेले आणि भलतेच धनुर्धारी झाले. ते धनुष्य ज्येष्ठांच्या हातापाया पडताना ऐराऊत तेवढी तरी स्वामिनिष्ठा दाखवणारच. त्यात काय वेगळे!
सीमाप्रश्नाचे वादळ उठले असताना पावसाळी हवा काय कामाची, असे शरद ऋतूला वाटणे साहजिक आहे. या ऋतूमध्ये पूर्वी झंझावाताचे राजकीय वारे वाहत होते. आता ते शांत दिसत असले तरी मनात काय वावटळी घेऊन विरोधी पक्षाच्या दालनात घुसले असावे देवास (स्वर्गीच्या) माहीत. यंदाचे पावसाळी अधिवेशन शरद ऋतूमुळे आखडतं घेणार आणि विरोध्याना चांदण्या दिसणार हे ऐराऊताला प्रखरतेने जाणवल्याने त्याचं सैरभैर होणं साहजिक आहे. इंद्रदेव रामलीलेत असल्याने रावणच जणू अधिवेशनात आला असे त्यास वाटले असावे. अजून दहा डोकी अदृश्य आहेत, तरी काही सांगता येत नाही. सगळे नेते आखडून बसलेत विधान भवनात. आणि हे ऋतू चक्र भलत्याच सदनात घळघळीत अवतरले. असूदे त्यात काय मोठे! विषय सोडून द्यावा ऐराऊत महाशय. आशय काय आघाडी फुटू नये आणि एनडीएमध्ये हा वजीर विलीन होऊ नये.
चेक मेट होऊ नये, बस!