पहिला चहा | भलताच योग... योगायोग! 
संपादकीय

पहिला चहा | भलताच योग... योगायोग!

पुढारी वृत्तसेवा

(एका उभ्‍या उभ्‍या कोसळलेल्‍या पक्षाचे मनोगत)

इमाने ऐतबारे राहावे म्हटले तर सगळे सोडून पळावे की काय? हे राजकारण सोडावे, पद सोडावे, निवांत राहावे. ते नाहीच जमणार आपल्याला, कधीच नाही, छ्या! काहीही बालंट येऊदे, सत्ता, कार्यकर्ते, खासदार, आमदार कुठेही पळूदेत, कोणीही त्यांना पाळूदेत अगर पळवूदेत, आपण तसे निवांत राहू; पण सर्वतोपरी नाही. आम्ही इकडे सभा, तिकडे भाषण करत राहणार, उणे दुणे, बे दुणे चार करणार. इकडचे सहा गेले तर ते का गेले, यासाठी सभा घेणार. आम्हाला कशाची भीती! आम्ही काय केलेच नाही. ज्यांनी केले त्यांनी आमचे शिलेदार भरून द्यावेत; अन्यथा आम्ही पिच्छा सोडणार नाही.

आम्ही पाठलाग करू, हवे ते करू. हवेत गोळ्याही मारू. या ना त्या कारणे काहीही करू. आम्हास कोण विचारणार! आम्ही मिळेल ती बस पकडू; पण विरोधी पक्षाचा पाठलाग करू. ते कसे बसतात, उठतात, कोठे जातात ते पाहू. कोणाशी बोलतात, कोणाला पक्षातून का काढतात, नवीन कोणाला भरती करतात तेही पाहू. योग्य-अयोग्य निर्णय घेण्यास काय करावे लागते, काय वागावे लागते, कसे बोलावे लागते याचे एकलव्यासारखे प्रशिक्षण घेऊ. कोणाला न कळता. अगदी अलवार! खोगीरभरती काढून टाकू, नवीनच बसणारा पक्ष स्थापन करू. खूप झाले उभे राहणे, पाठीचा कणा ताठ ठेवणे, आता जरा निवांत बसू आणि पक्षासही साजेसे नाव देऊ. उभा बीभा काय नको ते नतद्रष्ट नाव. बोभाठा ठीक आहे.

फार गोंधळ आणि बोभाटा केला राव या खासदारांनी. पक्ष धाब्यावर बसवला. एकही हिंदू पाठीशी नाही. आता आणावे कोठून? बंधू तर भाषण, तत्त्‍व सोडून संभाषण नाही करत. नुसते राडे, बोलघेवडे, नशीब नाहीत कोण बेवडे आमच्यात. (असे समजायला हरकत नाही.) पक्ष निवांत उभा होता. आता सारा बोभाटा. निस्तरावे कोणी? आबासाहेब असते तर आम्हास लोहगडावर नेले असते (निसर्गसौंदर्य पाहायला.) आणि चार गोष्टी समजावून परत आणले असते. बाकी कोणाची ग्यारंटी काय समजावून सांगतील? आमचा एक शिलेदार आणि शिलेदारीन एक रडतंय, एक बोंबाबोंब करतंय. अरे बाबा, एवढे करून पक्ष नाही पुढे जाणार. बसू नका रे नुसते, उभा राहा ठाम आमच्या पाठीशी. थांबा, आम्हीच दौरा करू नागपूरचा आणि करू पाठलाग आजी बाजींचा. (मुख्यमंत्री) सांगू काहीतरी बहाणे आणि घेऊ उखाणे; पण जाऊ त्याच विमानाने. योगायोग हो! जय महाराष्ट्र!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT