पहिला चहा | काहीतरी नवीन केले पाहिजे!  
संपादकीय

पहिला चहा | काहीतरी नवीन केले पाहिजे!

पुढारी वृत्तसेवा

अमितजी : मजा आली. परवा आदित्यसोबत गाडीच्या टपावर काय जबरदस्त फील होता. काय डेंजर गर्दी जमली होती. असं वाटत होतं सगळी मुंबई इथेच जमली आहे. जबरदस्त वाटलं. एवढ्या सगळ्यांच्या गराड्यात... रील्स प्रचंड व्हायरल झालेत त्या दिवशीचे... पण, आता बोअर वाटतंय. काहीच नाहीय करायला सध्या... काहीतरी नवीन केले पाहिजे...

राजाजी : ...तुला कसली आहे चिंता एवढी?

अमितजी : आंदोलने, निदर्शने आता कधी होतील याची चिंता वाटतेय... गाडीवर उभे राहिले की, लक्ष वेधले जाते लोकांचे... मीडियाचे पण...

राजाजी : हम्म... मी बघितले दोघांना गाडीच्या टपावर उभे राहिलेले... पण, तू सुरुवातीला काही बोलत नव्हतास... चालायचंच. तरी शो मात्र चांगला झाला. ही सगळी एमपीएससी विद्यार्थ्यांची कृपा.

अमितजी : पण, आता एमपीएससीचे आंदोलनही नाही आणि दिल्लीतही आंदोलन नाही.

राजाजी : आता काही दिवस शांत राहा.

अमितजी : कमॉन डॅडी. तुमची ताकद महाराष्ट्राला माहितीय. मला माझी ताकद दाखवून द्यायची आहे.

राजाजी : अरे पण, बछड्यांची ताकद दिसली जगाला. पण हे खरं आहे की, राज्यामध्ये आंदोलने, निदर्शने होत राहिली पाहिजेत. जिवंतपणाचे लक्षण असते ते.

अमितजी : मलाही त्याशिवाय करमत नाहीय आता. आपण, अधेमधे मोर्चे, आंदोलने, ठिय्या वगैरे केलं पाहिजे.

राजाजी : हे बघ. आता सणवाराचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकजण सुट्टीच्या मोडमध्ये गेले आहेत. त्यामुळे जे कराल ते जपून करा...

अमितजी : आम्हालाही लोकांची काळजी होतीच. नंतरच्या वेळी लोक नव्या दमाने सामील होतात की नाही पाहा. पण, आता कारवर चढण्याऐवजी काहीतरी वेगळे करायला हवे, कुछ तुफानी करते है...

राजाजी : हम्म....

अमितजी : तुम्ही असताना आयडियांची काही कमी पडणार नाही...

राजाजी : तरीसुद्धा स्वयंपूर्ण हो. ऐनवेळी काय बोलायचे ते सुचले पाहिजे.

अमितजी : डॅडी, मी अजून या प्रांतात नवीन आहे. शिकेन हळू हळू... आणि या राज्यकर्त्यांना वठणीवर आणून महाराष्ट्राला सूतासारखा सरळ करणार मी...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT