नंदीवाले : नंदीवाले आले माई... नंदीला चारा द्या. हातावरच्या रेषा खोट्या ठरणार माय. विस्कटलेलं आयुष्य नंदी सावरणार माय.
राजजी : ये इकडे ये माय.
नंदीवाले : बोला माय. गरिबाची चेष्टा करून राह्यले का माय? नंदी तुमच्या मनातलं सगळं ओळखतो. तुमचं काम होणार बघा माय अवंदा. (नंदीला) चाक चक्क हुर्र...! समोर बघ कोण नंदी महाराज. राजजी..
राजजी : मी नाही तू आला, असं म्हण. बोल कुठून आलास?
नंदीवाले : मी इथलाच की. जन्मल्यापासून भायखळ्यात आयुष्य गेलं माय.
राज जी : उद्या मोर्चात यायचं. तिकडूनच मोर्चा चालू होईल.
नंदीवाले : व्हय व्हय. येईन; पण एकदा भविष्य ऐका नंदीकडून, काय म्हणतो ते.
राजजी : तुझं भविष्य सध्या माझ्या हातात आहे; पण बघू तुझा नंदी महाराज काय सांगतो ते. शेतकऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आहे, तो सुटेल काय? बरं. मोर्चाचं काय होईल, ते सांग.
नंदीवाले : (नंदी चौफेर मान फिरवतो) होईल पण शिस्तीत. हे हे...
राजजी : हा तर काहीच धड सांगत नाही. तूच सांगतोस सगळं त्याच्या मनातलं. आमच्या मनातलं पण सांग. काय असेल माझ्या मनात?
नंदीवाले : चौफेर मान हलवतो. ते बघा मोर्चामधे लय माणसं येतील. त्याची प्रचिती उद्या येईल महाराजा. हा घ्या रुद्राक्ष. रात्री उशाखाली ठेवा झोपताना. स्वप्नात दिसंल महाराजा. या रुद्राक्षाचे पाच हजार पडतील महाराजा.
राजजी : अरे बैला.. रुद्राक्ष ज्यांनी लहानपणापासून जपताना पाहिले त्यांना सांगतोस ते उशाखाली ठेवा म्हणून. हाच उपयोग त्याचा? उद्या भायखळ्यात आहे मी. तुझं नशीब आज बलवत्तर आहे राजा. जा तू. पुनः नंदी नंदी खेळू नको. किमान इकडे. समजलं?
नंदीवाले : नंदी आमचा कधी खोटं बोलणार नाही. फुकट कोणाचं खाणार नाही. रुद्राक्ष एक संकेत आहे महाराजा. काकांचा तुमच्यावर लय विश्वास होता महाराजा.
राजजी : ते तू कशाला सांगायला हवं? ठेवतो मी हा रुद्राक्ष. तू म्हणतोस ते खरं आहे, तर येतील ते स्वप्नात. जा तू. हे घे पैसे.
नंदीवाले : नंदी जाण ठेवल आयुष्यभर. मला आंध्रातून बोलावणं आलंय. आई आजारी हाय. पुढच्या महिन्यात मी इथच असेन. सगळं बदललं असंल असं नंदी सांगतो. येतो महाराजा.
राजजी : अरे तुझे रुद्राक्ष खरे असतील; पण तुझं काय? आंध्रात नाही, तुझंच भविष्य अंधारात आहे ते सावर. नंदी म्हातारा आहे. तुमचा मूळ धंदा सोडलात का? शेतकऱ्यांना बैलं विकणारे तुम्ही, स्वतःच नंदीची वरात काढताय. निघ नाहीतर याच नंदीवरून धिंड काढेन. समजलं?