गुरू : (एक मोटिव्हेशनल भाषण) मित्रहो! मी तुम्हाला इथे यासाठी आमंत्रित केले आहे की, तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला नागरिकशास्त्र समजायला हवे.
नागरिक : (मध्येच उठून प्रश्न विचारत) नागरिक आणि शास्त्र या दोन्हीची सांगड कशी घालायची? कारण शास्त्र सांगते देशात जाती, प्रजाती, भाषा, वर्ण या सर्वांत भिन्नता आहे. नागरिक हा कोणत्याही जातीचा असला तरी नागरिकच आहे. यावर तुमचं मत काय आहे?
गुरू : (आश्चर्याने) बसा, बसा. सांगतो. नागरिक हा कोणत्याही जाती, धर्माचा असला तरी त्या त्या धर्माच्या शास्त्रानुसार आचरण करत असतो, व्यवसाय करत असतो; पण सर्वांसाठी कायदा एकच. हे सांगणारे शास्त्र म्हणजे नागरिकशास्त्र.
नागरिक : (दुसरा नागरिक उठून माईक हातात घेत) शस्त्र आणि शास्त्र यात नेमका फरक काय?
गुरू : (आता मात्र गुरू धर्मसंकटात सापडल्याने प्रश्नाची चिरफाड करत) तुमचं प्रश्न विचारण्याचं कौशल्य कौतुकास्पद आहे; पण या दोघांचा काडीमात्र संबंध नाही.
नागरिक : असं कसं बुवा? काहीतरी संबंध असेल, त्याशिवाय दोघे एकसारखे वाटतात?
गुरू : शास्त्र आणि शस्त्र हे दोन विरुद्ध दिशेचे गुणधर्म दर्शवितात. शास्त्र शिकावे लागते, शस्त्र चालवावे लागते.
नागरिक : ते माहिती आहे हो. वेगळं काहीतरी सांगा.
गुरू : आता शस्त्र चालवून दाखवू का? आमचे शस्त्र म्हणजे जीभ, हल्लेखोरांचे शस्त्र बंदुका, तलवारी. हे झाले शस्त्र आणि जीभ जे परखडपणे आपलं मत सांगते ते शास्त्र. दोन्हींही धारदारच. पुढे?
नागरिक : म्हणूनच म्हटलं दोन्ही समान आहेत. तुम्हीच म्हणता काडीमात्र संबंध नाही.
गुरू : अरे बांधवा. तू बस खाली. नको संताप ओढवू.
नागरिक : (पहिला नागरिक) बरोबरच आहे त्यांचं. दोन्ही शब्द समान वाटतात लिहिताना. काना चुकला की शस्त्र आणि काना लिहिला की शास्त्र. सोपं आहे.
गुरू : बरोबर! चुकीची प्रतिक्रिया ही शस्त्राचा वापर करून देता येते. योग्य प्रतिक्रिया शास्त्राने देता येते.
नागरिक : ते कसं काय सांगाल का?
गुरू : तुम्ही स्टेजवर या. दाखवतो.
नागरिक : शास्त्राने की शस्त्राने?
गुरू : हा हा हा. शास्त्राने. या. (नागरिक स्टेजवर येताच त्याला आलिंगन देत) आलिंगन रागावर मात करणारे शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आहे. हे नागरिकशास्त्रही आहे. म्हणून परिस्थितीचा अभ्यास करूनच ते हाताळावे. समजले? की इंग्रजीत सांगू?