पहिला चहा | चालूदे तुमचं...  
संपादकीय

पहिला चहा | चालूदे तुमचं...

पुढारी वृत्तसेवा

(गल्ली-बोळातील टोळके, छत्रीधारी, दुपारची वेळ, छत्रीवर पावसाची टपटप आणि बाकी गोंगाट पावसाच्या सरीमुळे ठप्प... छत्र्या वाऱ्यावर डुलत झुलत पावसाशी झुंजत, उडत)

पहिला : आरं धर ती छत्री. (दुसरा छत्रीमागे धावत ती उचलतो) या पावसाच्या सरी लय टोचत्यात. असं वाटतंय रामायणातलं, महाभारतातलं कुणीतरी नेम धरून बाण मारतंय. आपण सापडलो या तडाख्यात. विजापण अशा आवाज करत्यात, रामायणातलं युद्ध चालू असताना मुजिक वाजल्यागत!

दुसरा : (छत्री सावरत) तुला बरं रामायण आठवलं? पावसाळी अधिवेशनात राम अवतरले म्हणे!

तिसरा : म्हणजे तुला सांगून गेलंत का काय? काय लेका. राम मंदिरात असत्याल! असं येत्याल का कुठंबी?

चौथा : चालूदे.

पाचवा : चालूदे चालूदे.

पहिला : तुमी काय कुठल्याच पक्षाकडनं न्हाई. तुमी हे असंच बोलणार. चालूदे! राहूदे! (विजांचा कडकडाट. पावसाकडे पाहत) अरं, थांब की गड्या. कधीपासनं अडकलोय समदी तुझ्यामुळं.

दुसरा : व्हय रं. तास झाला कोसळतोय. ते बी धपाधप. पावसाळी अधिवेशन आवरून इकडं आला बघ. तिकडं सगळा बट्ट्याबोळ करून आला ह्यो पाऊस.

तिसरा : ऐ लेका. ते पावसाळी अधिवेशन असं म्हणत्यात, पावसाळ्यात असतंय म्हणून. आज ऊन असतं तरीबी ते पावसाळी अधिवेशनच असतं. काय बोलतंय येड्या डोकीचं!

दुसरा : व्हय काय? बरंय बाप्पा. यंदा सगळं रामायण उरकणार हे अधिवेशन वाटलं हुतं. वारीत विठ्ठलाचा जयघोष, अधिवेशनात रामनामाचा जोश थांबना. दोन्ही प्रधान पदं जनतेच्या हित (हिट नाही) लिस्टवर आहेत. ते जनतेच्या हिताचाच विचार करत असतात; पण जनता जाणत नाही. (चौथ्या व्यक्तीकडे पाहत) काय रे. खरंय ना?

चौथा : चालूदे तुमचं.

पाचवा : बरंय. निघतो. चालूदे तुमचं.

दुसरा : काय बरंय, चालूदे. एकच शब्द पाठ करून आल्यागत.

पहिला : अशा तुमच्यासारख्या लोकांमुळं शिवराळ पक्ष स्थापन करावा वाटत असंल एखाद्या लेखकाला, पत्रकाराला. ना हिकडचे ना तिकडचे. निघा..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT