पहिला चहा | आठवलेले काव्य..! 
संपादकीय

पहिला चहा | आठवलेले काव्य..!

पुढारी वृत्तसेवा

सत्कारमूर्तींच्या गळ्यात हार पडताच एका कविवर्याला झक्कास कविता स्फूरते. त्याचं काय कवतिक स्वतःच्याच तोंडून ऐकावे, तेवढे थोडेच. असं वाटलं जास्त अवघडून बसण्यापेक्षा मांडी घालून मैदानावर निवांत बसावं का? कारण कविता खूप वेळ चालणार आणि हास्याचे स्फोट होणार. जॉक आवडला बुवा, असं शेजाऱ्याला पटकन कानात सांगता येईल. असो. खुर्चीवर बसून ते हसरे काव्य ऐकण्यात मजा कसली. गडबडा लोळलू ऐकून! असं सांगता यायला हवं ना! जॉक अपार्ट. काव्य ऐकण्यात मजा आहे, काव्याचा भाषणाशी मतभेद नको उगाच, काय? पाहूया ते बहारदार आठवलेले काव्य..?

कविवर्य : (काव्याला सुरुवात करतात) मी कोण? कोण आहे मी? सांगाल का? मी कोण? कोण मी, सांगाल का?

(प्रेक्षकांतून एकजण) ‘आठवले, तर तुम्‍हीच सांगा. वेळ आहे अजून.’ (हशा)

कविवर्य : गमती करता तुम्ही, कविता करतो आम्ही, बसा खाली, गंमत केली आम्ही. (प्रेक्षक उपहासात्मक हसत खाली बसतो.) हसून हसून दुखेल पोट, बसायला नाही इथे पाट, हसून हसून दुखेल पोट, बसायला नाही इथे पाट, मी काय सांगतो त्याची बघा वाट, नका काढू पळवाट, नका करू गोंगाट, एक पक्ष आमचा, काय त्याचा थाट, एक पक्ष आमचा, काय त्याचा थाट, नारळ फोडून घातला उद्‌घाटनाचा घाट, आता तेवढ्यात विरोध्यानी का लावावा नाट?

पळून पळून दमलो आम्ही, कधी इकडे, कधी तिकडे, पळून पळून दमलो आम्ही, कधी इकडे, कधी तिकडे, मग आलो इकडे. इकडे कमळ तिकडे झेंडू, मग म्हटले कमळाला हात जोडू.

कमळ माझ्या आवडीचे फार, कमळ माझ्या आवडीचे फार, केला त्याचा हार, युतीविना स्वप्न कसे होईल साकार, बघा मी आहे की नाही हुश्शार! यमकाला साकडे घालून करतो मी कविता फार, म्हणून मी हुशार..! (इकडे प्रेक्षकगण निम्मेअधिक पसार)

अरे बापरे! सगळे झाले पसार? लेकांनो, तुम्ही पण फार हुश्शार. यंदा पाऊस नाही; पण ढग आहेत चिक्कार, नदी गोठली तरी बर्फाचा पूर येणार, आम्ही नाही घाबरणार, वाह वाह! यमक जमलं. काव्य संपलं, ससा ससा दिसतो कसा, ढगांवर ढग ठेवला जसा, (सगळे उठू लागतात) बसा बसा, मी निघतोच कसा..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT