पहिला चहा | लॉस्ट जनरेशन... File Photo
संपादकीय

पहिला चहा | लॉस्ट जनरेशन...

पुढारी वृत्तसेवा

वृद्ध : अरे झिंजी इकडे ये. ही गर्दी कसली एवढी. कोणाचं भाषण आहे का?

जेन-झी : आम्ही जेन-झी आहोत. झिंजी काय? अर्थ बदलतो ना!

वृद्ध : अरे बाबा, तेच ते. झिंजी. आमच्या काळात कोणी पोबारा करून पळू लागला की, झिंजी धरून आपटायचो. हे कसलं नाव रे तुमचं आणि गर्वाने सांगता आम्ही झिंजी. महाराजांनी तुमच्याएवढं असताना जिंजीचा वेढा उठवला. तुम्ही झिंजीनी वेड लावलं सगळ्यांना.

जेन-झी : अहो आजोबा, त्याचं असं आहे, आम्हीच इतिहासाचे शिलेदार. वेढा उठवूनच गप्प बसणार.

वृद्ध : अरे ये बाबा. आहेस केवढा तू. भाषण किती देतो. मीच ऐकतोय म्हणून बरे हो. अरे बाळा, पुण्यात बे दुणे चार नसतं म्हणायचं. बे दुणे पुणे, असं म्हणायचं.

जेन-झी : ते काय असतं आणखीन?

वृद्ध : हें हें हेंsss! अरे बावळ्या, बे दुणे किती?

जेन-झी : चार! त्यात पुणे आले कुठून?

वृद्ध : चार म्हणजे चार चौघे, चार लोक, चारी मुंड्या चित, चितळे, हे पुणेरी बोलण्यात येते. म्हणून बे दुणे पुणे.

जेन-झी : ओ आजोबा, हे शब्दांचे भेंडोळे सोडू नका हा, भेंड्या खेळाल का आता? काय चालू आहे समोर? ते निमूटपणे पाहा नाहीतर जा इकडून. डोकं खातात.

वृद्ध : अरे बाळा, चिडू नको. ही नक्की प्रक्रिया आहे की, प्रकरण जेन-झी का काय ते? ते जरा विस्कटवून सांग ना.

जेन-झी : आता विस्कटाविस्कटी संपली आजोबा. आम्ही सामंजस्याने घेतले. आमच्या मागण्या मान्य करत आहे सरकार. तुम्ही आलात तोवर.

वृद्ध : शिरा तानू नकोस बाळा. जातो मी. नको चिडू. झिंजी कुठचा. या... (उपहासाने) आंदोलन काय, भाषण काय. काय तैनात यांची. आमच्यावेळी नव्हतं असं.

जेन-झी : ओ आजोबा, फार बोलता हो तुम्ही. तुमच्यावेळी असं नव्हतं कोणी वागत तुमच्यासोबत म्हणून काहीही बोलता का मग आता.

वृद्ध : बाळा, शांत राहा. मला भाषण ऐकू दे. नीट ऐकू येत नाहीये. झेंडा कोण फडकावते ही मुलगी? छान हा? हे मात्र सांगावं लागत नाही तुम्हाला. जिकडे जाल तिकडे झेंडा ऊंचा रहे हमारा... चालू दे. आमचं काही ऐकायचं नसतं तुम्हाला. चालू दे बाबा तुमचं. आमच्यावेळी नव्हतं बाबा असलं..!

जेन-झी : आजोबा गो टू द पास्ट. कारण, गेट लॉस्ट म्हणू शकत नाही. लॉस्ट जनरेशन. हॅ..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT