पहिला चहा | किटी पार्टी! 
संपादकीय

पहिला चहा | किटी पार्टी!

पुढारी वृत्तसेवा

रिमा : मला पैठणी खूप आवडते; पण तुम्ही सगळ्यांनी आधीच ड्रेस कोड ठरवलात पार्टीचा.

अंजली : किटी पार्टीत पैठणी कोण नेसतात? वेडी आहेस का जरा?

गीता : अगं रिमाकडे पैठण्या छान आहेत विकण्यासाठी! म्हणून कौतुक करतेय पैठणीचं. जिकडे जाते तिकडे मार्केटिंग.

रिमा : का गं बाई? का करू नये मार्केटिंग? आहे स्टॉक माझ्याकडे. त्यात काय झालं!

अंजली : अगं मग असं सांगायचं, माझ्याकडे पैठण्या आहेत विकायला. हव्या असतील तर घ्या.

रिमा : विक्रीसाठी आणल्या सणासुदीला. तुम्ही सगळ्या नको तिथे फाटे फोडता. किटी पार्टी फक्त एन्जॉय करण्यासाठी असते का?

गीता : चुकलं बाई माझं. मी पण सांगायला हवं होतं, माझ्याकडे कॉस्मेटिक्स आहेत वेगवेगळ्या ब्रँडचे. घ्या बाई सणासुदीला माझ्याकडून हवं तर.

अंजली : ए खरंच का? मग आणलीस का सोबत सँपलसाठी. दाखव ना सगळ्या यायच्या आधी. नंतर नीट चुज नाही करता येणार.

रिमा : बघा मार्केटिंग कोण करतंय आता. माझं नाव पुढे करून हिने खपवल्या पण लिपस्टिक, पावडर.

गीता : अगं अजून बोलतोय आम्ही. कुठे काही खपवलय. माझ्याकडे ब्रँडेड कपडे पण आहेत युरोपातून आणलेले विकायला. ते अजून बोलले होते का मी?

अंजली : काय गं! इतकी कशी स्मार्ट तू? मस्त. मी घरी येते तुझ्या. मला दाखवशील?

रिमा : तसं तर मलाही पहायचंय; पण मुद्दा भरकटला. मुद्दा हा आहे, मार्केटिंग कोण करत आहे? मी की गीता ते सांग आधी?

अंजली : गीता फक्त ओघाने बोलली. मार्केटिंगला तू चालू केले असे म्हणायला हरकत नाही; पण असू दे. मी पैठणी पण घेणार आहे गौराईसाठी. दोघींकडे येणार मी चहाला. चालेल?

गीता : चालेल काय? पळेल. नक्की ये.

रिमा : आधी माझ्याकडे ये. मार्केटिंगला मी चालू केलं. (उपहासाने)

अंजली : हो गं बाई. नक्की.

गीता : पैठणी तर महाराष्ट्राची शान आहे; पण एडिट करून जॉर्जिया मेलोनीला हिने पैठणीत बसवलं. किती हा मार्केटिंगचा अतिरेक. हा हा... पण छान दिसत होती जॉर्जिया पैठणीत.

रिमा : तू कार्टून दिसशील नको घेऊ. त्याला पैसे पडतात.

गीता : मी पण घेऊनच दाखवते पैठणी बघच तू. माझ्यावर खुलून दिसते पैठणी जॉर्जियापेक्षा. पार्टीनंतर तुझ्याकडे येणारच आहे पैठणी घ्यायला. चला गं. लवकर आटोपून घेऊ किटी!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT