दोन नेतेमंडळी घरगुती समारंभात तिसऱ्या नेत्याच्या घरी सपत्नीक हजेरी लावतात. उखाणा म्हणजे आजकालच्या पिढीसाठी सीनिअर पिढीची हुल्लडबाजी वाटून ते उखाणा चालू होताच निघून जातात. त्यातलं एक जेन झी कार्टून मागे राहून निरीक्षण करू लागतं...
पहिली : हंड्यावर हंडे ठेवले चार, एकात दही, बाकी सब आचार! आमचे हेच सर्वात हुशार..!
दुसरी : हंड्यावर हंडे ठेवले चार, दह्याची हंडी फुटली आणि आमची स्वारी आचार खाऊन सुटली..!
तिसरी : हंड्यावर हंडे ठेवले चार, आमचं हेss! मुंढे आल्यापासून, आचार घेऊन झालंय पसार... (खिक खिक) झालं बाई सगळ्यांचं उखाणं घेऊन. चला निघूया. (जेन झी सर्व पाहून खवळतो)
जेन झी : (कुत्र्याला कुरवाळत) हा काय आचरटपणा आई? सगळ्यांच्या उखाण्यात हंडेच? वेगळे काहीतरी बोलायचं ना?
पहिली : तू मेल्या इथं बसून काय मापं काढतो. जा बाहेर!
जेन झी : तुम्ही आम्हाला म्हणता हुल्लडबाजी करता म्हणून, हे तुमचं प्रत्येक समारंभात चालतं. त्याला काय म्हणायचं आम्ही जेन झी नी?
पहिली : याला उखाणा म्हणतात. कळलं.
जेन झी : उखाणा आहे म्हणून खाण्याच्या पदार्थांशिवाय दुसरं तिसरं काही नसतं का त्यात? आचार काय, दही काय! मघाशी जेवताना पण ते होतंच ना सगळं. पोट भरत नाही वाटतं तुम्हा बायकांचं?
पहिली : मेल्या बाहेर जा म्हणते ना! तुला काही कळतं का त्यातलं?
दुसरी : नका बोलू त्याला तसं. बाळ तू शिकवशील आम्हाला उखवना?
पहिली : अगं बाई, उखाणा असतं ते. उखवना नाही.
दुसरी : बरं, जे असेल ते. मला कॉपी करता येतं. आमचं इंग्रजीतून बोलणं, चालणं, उठणं, बसणं होतं ना. सो वी डोन्ट केअर अबाऊट उखाणा ऑर उखवना.
तिसरी : इंग्रजी पाचवी नापास हाईस तू. गप गुमान बस वाईच. त्यो काय म्हणूय ते बघू. तुजं ठेव बाजूला. हो तिकडं (धक्का देत बाजूला करते आणि बसते). आली मोठी.
दुसरी : बरं बाई. अडाणी तर नाही तुझ्याइतकी. कर तुझंच खरं. मी जाते.
जेन झी : ओ काकू! कुठे निघालात? बसा. उखाणा शिकवतो तुम्हाला. (खाकरत) एक गेली दह्याला, एक गेली तुपाला, तिसरी आली कडमडायला. (तिसरीकडे पाहत) तुला नाही मला, म्हणे; घाल कुत्र्याला! (कुत्रा मधेच भू... करतो) झाला उखाणा.
पहिली : हट मेल्या...कुत्र्याला पण नाही आवडला उखाणा...! (हसत)