फिल्म निर्माते : कपूर नसून शेवटच्या अक्षरात साम्य असणारे राजकीय व्यक्तिमत्त्व.
डायरेक्टर : इटलीचे.
स्थळ : डोंगराळ, ओसाड भागातले पडीक काही सुस्थितीतले बंगले, निर्जन रस्ते आणि दुतर्फा.
कलाकार : तुम्ही फिरायला आलेले स्वतः...
शोची वेळ : पर्यटक रसिकांवर अवलंबून
(सुरुवात माहितीने) हा काही चित्रपट भयपट नसून सपशेल आपटलेली एक बोगस गृह योजना आहे. अशा डोंगराळ ठिकाणी आता पर्यटनासाठी लोक येत राहतात. पर्यटक रस्ता चुकण्याची शक्यता दाट आहे. सावध राहावे. आताच कोर्टाने नोटीस जारी केल्याने कपूर नसलेले निर्माते चिंतेत आहेत. ही गृह योजना नागरिकांच्या स्वास्थ्यास आणि पर्यावरणाला घातक असल्याचे निदर्शनास आले असून इथे राहणाऱ्यांनी आधीच पलायन केले असल्याने पर्यटकांना चिंता नसावी. हे ओसाड शहर, नदी, नाले, घरे, बंगले आपलेच समजून खुशाल सुट्टीवर यावे. एखादे भूतबीत दिसल्यास घाबरू नये. आपण जाणूनबुजून पर्यटनाचे हे ठिकाण निवडलेले आहे. पाहूया एक किस्सा (काल्पनिक गोष्टीवर आधारित). आलासा शहर पर्यटकांच्या गर्दीत सकाळी मिसळून जातं आणि रात्रीचं चांदणं या भकास, विद्रूप झालेल्या शहराला भुताटकीच्या अफवांना वाव देतं. एका रात्रीकडे वळलेल्या संध्याकाळी पर्यटक चहा, कॉफी घेत आलासाच्या ब्रिटिश मिमिक्रीच्या सौंदर्याकडे पाहत निसर्गाचा आस्वाद घेत फिरताना एकमेकांशी बोलत चाललेले असतात. पाहूया पुढे!
एक पर्यटक : लॉबीमध्ये बसूयात चहा- कॉफी घेत. इथे गर्द झाडीतून एखादं जनावर येऊन उपास सोडेल. मेजवानीच त्याची. हा हा हा...
दुसरा : जनावरं नाही; पण रात्री भूत, हडळी येतात असं ऐकलं. तो बघ ओसाड बंगला तिकडे जाऊ. चल!
(मागून एक मळकट कपड्यात इसम)
इसम : तुम्हाला बंगला हवाय का राहायला? माझ्या मागे या, हवा असेल तर.
दुसरा : हो. चालेल. दाखवा कुठे आहे?
इसम : तोच ओसाड बंगला. (लांबून दाखवत)
पहिला : काका, तुम्ही नक्की माणूसच आहात ना... की?
इसम : मी त्या बंगल्याचा मालक होतो. माझ्या मृत्यूनंतर तो बंगला ओसाड झाला.
दुसरा : (पहिल्याला खेचत) राम राम राम! चल इकडून (दोघेही पसार).
क्लायमॅक्स : बंगला त्या म्हाताऱ्याचा असतो. फसवणुकीतून तो वेडा होतो. समाप्त.