एकेकाळी आकाशात उडणारे पक्षी पाहून वाटायचे की आपणही त्यांच्यासारखे आकाशात उडले पाहिजे. अशावेळी आपसूकच हिंदी गाणे तोंडात यायचे.. पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में... आज मैं आझाद हूँ, दुनिया की नजर में..., पण आता हेच स्वप्न सत्यात उतरणार आहे. या आलम दुनियेतील एकमेव खरबोपती सद्गृहस्त इलॉन मस्क यांनी आकाशात उडू शकेल अशा कारचा शोध लावला आहे. ती गाडी आता आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला घेऊन आकाशाला गवसणी घालायला तयार झाली आहे. नुकतेच तिच्या यशस्वी चाचणीचे व्हिडीओज व्हायरल झाले आणि... अनेकांचे चेहरे अजि म्या ब्रह्म पाहिले... सारखे झाले.
पण, एक अडचण आहे. ती भारतात आली तर सोय होईल की अडचण हे कळेनासे झाले आहे. कारण, जर कुणी ट्रॅफिक पाहून गाडी आकाशात उडवली आणि जर ड्रायव्हर जर तंबाखू, गुटखा, पान खाणारा असला, तर त्याच्या पिचकारीने खाली ट्रॅफिकमध्ये उभ्या किंवा खाली रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांची दररोज रंगपंचमी साजरी व्हायची. आणखी एक शंका वाटते. शहरातील बडे बडे डिजिटल बोर्डस् आणि फ्लेक्सच्या जंजाळातून जाताना कुठून एखाद्या भाईच्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांच्या बड्या फ्लेक्समध्ये गाडी घुसली तर... तर काय होईल ते कळणार नाही....
मस्क साहेबांना नम्रपणे एक सूचना करावीशी वाटते. त्यांनी उडणारी रिक्षा चुकूनही काढू नये. कारण, आपले रिक्षावाले अशा काही स्टाईलमध्ये बसून रिक्षा चालवतात की, रिक्षावाला वरून खाली पडायचा आणि रिक्षा हवेतच राहायची... त्याच्या पलीकडे चुकून कुणी उडणारी वडाप सेवा सुरू केली, तर मजा येईल. कारण, वडापला लटकलेली माणसे हात सुटला की हवेत तरंगू लागतील किंवा विहंगम आस्वाद घेत जमिनीवर आदळतील. मग त्यांना पंछी बनू, उडती फिरू... गाणे तंतोतंत लागू पडेल.
आणखी एक. ट्रॅफिकवाल्या मामांचं दिवाळंच निघेल. गाडी साईटला लावायला सांगून लायसन्स मागण्याची सोय त्यांना राहणार नाही. चलान कसं काढणार आणि त्यातून महसूल कसा वाढणार मग... तर माझी इलॉनसाहेबांना विनंती आहे. त्यांनी या सगळ्याचा विचार करूनच गाडी भारतात पाठवावी...