पहिला चहा | इलॉनभाईंचे स्वप्न...  
संपादकीय

पहिला चहा | इलॉनभाईंचे स्वप्न...

पुढारी वृत्तसेवा

टु बी ऑन नॉट टु बी दॅट इज द क्वेश्चन... काय करावं आता?

मी या जगातला एकमेव ट्रिलियनेअर... तरी भारतात माझी किंमत शून्य! हाताशी रॉकेट, आकाशात हजारो उपग्रह, खिशात अब्जावधी डॉलर... पण भारताच्या इंटरनेट बाजारपेठेच्या दारात माझ्या स्टारलिंकचा घोडा अडला आहे!

मंगळावर माणूस पाठवण्याची तयारी करणारा मी! पण भारतात इंटरनेट विकण्यासाठी माझीच ग्रहदशा वाईट झाली आहे! माझ्या रॉकेटला गुरुत्वाकर्षण थांबवू शकत नाही; पण माझ्या इंटरनेटला सरकारी परवानगी थांबवते?... अनेक देशांची सरकारे हातात ठेवणारा मी... ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ म्हणणाऱ्यांनी मला अडथळा आणला आहे.

आणि वर मुकेशभाईंना मी काय काय बोललो! खरे बॉस, खरे पंतप्रधान... आता वाटतंय, ते टोमणे होते की स्वतःच्याच पायावर मारलेले व्यावसायिक दगड?

पण हा मुकेशभाईंचा प्रश्न नाही. हा इलॉनभाईंच्या इगोचा प्रश्न आहे!

काय करावं....?

अजून एक ट्विट टाकावं?

‘मी १६५ देशांत पोहोचलो; पण भारतात अजून दारातच!’

पण अडचण अशीय की ट्विटला लाईक्स मिळतात, लायसन्स नाही!

अजून काय करता येईल... रॉकेट पाठवून सरकारला संदेश द्यावा काय... वर उपग्रह पाठवणं सोप्पंय... खाली स्पेक्ट्रम मिळवणं अवघड आहे.... माझं रॉकेट काही मिनिटांत आकाशात पोहोचतं; माझी फाईल मात्र कुठल्या टेबलावर पोहोचते, हेच कळत नाही!

एक मिनीट... उपाय सापडला!

इंडियात इंटरनेट स्वस्त करायचं!

डेटाची सवय लागल्याने भारतीय ग्राहक जिओ जी भरके म्हणत आहेत... ठरलं तर मग... ‘आता आरोप कमी, ऑफर जास्त! मुकेशभाईंना टोमणे कमी, ग्राहकांना गिगाबाईटस्‌ जास्त!

पण स्पर्धा केवळ दरांची नाहीच... इंडियात खूप मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते बुवा... सुरक्षा मंजुरी, स्पेक्ट्रम आणि सरकारी नियमांची प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल... कारण भारतात ग्राहकाला जिंकायचं तर रिचार्ज स्वस्त लागतो!

अरे पण हे काय...

अवकाशात हे एवढे नवीन उपग्रह कुठून आलेत... खूपच गर्दी झालेय उपग्रहांची... आम्ही पाठवत असतोच वरचेवर... पण हे तर माझे नाहीत. मग आहेत कुणाचे? क्क क्काय? मुकेशभाईंचे...

इतक्यात इलॉनभाई धाडकन बेडवरून खाली पडले!

स्वप्न होतं!

हुश्श!

नाहीतर उद्या मुकेशभाईंच्या उपग्रहांवरून इंटरनेट मागण्यासाठीही मला त्यांच्याकडेच अर्ज करावा लागला असता!’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT