रामा : आरं, तू त्यो राज कपूरचा पिच्चर बघितलायस काय?
शिवा : कुठला रं?
रामा : आरं, त्योच की! ज्यात आजोबा पृथ्वीराज कपूर, पोरगा राज कपूर आणि नातू रणधीर कपूर... म्हणजे तीन पिढ्यांचा एकाच घरात सिनेमा... कल आज और कल!
शिवा : मगं त्याचं काय?
रामा : आरं, आक्शी तसंच अंबानींचं बी हाय बघ! आजोबा धीरुभाई, पोरगा मुकेश आणि आता नातवंडं आकाश, अनंत आणि ईशा. तीन पिढ्या झाल्या, धंदा सुसाट हाय गड्यांचा... आजोबानं लावलेलं झाड फळांनी लगडलंय...
शिवा : मी बी पोराकडनं ऐकलं. त्यांच्याकडं पोरं जन्माला येतानाच बहुतेक बिझनेस प्लॅन घेऊन येत असतील!
रामा : आरं, झाडाचं ख्वाड चांगलं असलं की, फळं बी चांगली लागत्याती. त्याच्या रक्तातच धंदा हाय. आपण आपलं सकाळी वैरण आणायची, धारा काढायच्या अन् डेअरीला दूध घालायचं. बघू, गोकुळ आवंदा सभासदांस्नी किती डिव्हिडंड देतंय ते! आपला सगळा बिझनेस दुधाच्या धारेवर हाय!
शिवा : आरं, पैशानं मोठी असली, तरी त्यांचं पाय जमिनीवर हायती. त्या अनंतानं कोल्हापूरची माधुरी हत्तीण वनताराला नेली. उपचार करून पुन्हा पाठवली. मुंबईत एका दुर्धर आजारानं ग्रस्त पोराच्या उपचारासाठी मदत मागणाऱ्या लोकांना पाहून गाडी थांबवली. नऊ कोटींचा खर्च होता. दोन कोटी जमा झाले होते. उरलेले सात कोटी देऊन उपचाराची जबाबदारी घेतली.
रामा : भारीच की!
शिवा : आरं, बापानं व्यवसाय उभा करायचा, पोरानं वाढवायचा; पण त्याचबरोबर समाजाचं देणं बी फेडायचं. पैशानं मोठं होणं सोपं असंल कदाचित; पण मनानं मोठं व्हायला काळीज लागतं!
रामा : व्हय की! नुसत्या मोठ्या गाड्या, बंगले अन् झगमगाट करून काय उपयोग? आपल्या कमाईनं एखाद्याच्या घरात चूल पेटली, गरिबाच्या पोराला शिक्षण मिळालं, आजाऱ्याला जीवदान मिळालं, तर त्याच्यासारखी श्रीमंती न्हाय!
शिवा : ते म्हणत्यात नव्हं, वारसा फक्त संपत्तीचा नसावा, तर संस्कारांचाही असावा!
रामा : (चहाचा शेवटचा घोट घेत) आरं, हे ऐकून तर आपल्यालाही स्फुरण चढलंय. उद्यापासून दुधात पाणी कमी घालायचं!
शिवा : तेवढं तरी कर आधी! मग समाजसेवेचा विचार कर!
रामाः जीयो मेरे लाल...!