पिंडदान होतं तिथे कावळ्यांची जत्रा भरलेली. त्यांच्यात काय बोलणं होतं पाहा... खरं तर ते ऐकू येत नाही तेच एकाअर्थी बरे आहे.
पहिला कावळा : कोणीतरी बडी आसामी गेली. बरंच बुफे टाईप आपल्याला जेवण करून आणलंय. खा की खा...
दुसरा कावळा : तिकडे आईस्क्रीम पण ठेवले. वितळायच्या आत खाऊ. चला तिकडे. (सगळे कावळे तिरप्या उड्या घेत आईस्क्रीम जवळ पोहोचतात.)
पहिला कावळा : अजून बराच नैवेद्य ठेवलेला दिसतोय; पण ही माणसं आपल्या पाळतीवर का आहेत? जातच नाहीत. काव काव जाव..!
तिसरा कावळा : पिंडदानासाठी आलेत. आपलं फक्त नाममात्र काम आहे. आपण नैवेद्य शिवला की हे निघणार.
पहिला कावळा : ए आज नैवेद्य शिवायचा नाही. बघू किती वेळ उभे राहतात?
दुसरा कावळा : आपण मंत्री नाही यांनी आपल्या दिमतीला उभं राहायला. गप गिळा. नाहीतर ते पण मिळायचं नाही. माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. काव काव.
पहिला कावळा : खाल्ली माती. किती वेळा सांगितलंय जरा काव काव, खाव खाव कमी कर. हे उदाहरण माणसं देतात. कावळे नाही.
दुसरा कावळा : मी उदाहरण देतोय भुकेचं.
पहिला कावळा : पूर्वीच्या काळी आपले पूर्वज खड्याने पाण्याचा घडा भरायचे. आपल्याला आयता गडू ठेवलाय पाण्याचा. आवरा रे.
दुसरा कावळा : ए तो बघ, चौथा कावळा आला. डोमकावळा आहे. तो बघ कसा बघतो. चला रे. लवकर फस्त करू.
डोमकावळा : हाय ऑल. मी आफ्रिकन आहे. अमेरिकन रहिवासी होतो. ट्रम्पुने व्हिसा नसल्याने तिथल्या आफ्रिकन लोकांना हकलवून लावले. मी उडत उडत इथे पोहोचलो. मला वाटतं मी योग्य ठिकाणी पोहोचलोय भारतात. मी जॉईन करू का ही पार्टी? खूप भुकेला आहे मी.
पहिला कावळा : या. नैवेद्यावर टोचा मारा. पहिला मान तुमचा पाव्हणं. मारा टोच. तुम्ही आमचं पाव्हणं. (डोमकावळा नैवेद्य शिवतो. सगळे कावळे नैवेद्यावर तुटून पडतात. लोक हुश्श होऊन परततात.)
डोमकावळा : थँक्यू. मजा आली. मस्त मेजवानी. इंडियातील लोक कावळ्यांना पाहुणे समजतात. मजा आली!
दुसरा कावळा : स्मशानात आहे तोपर्यंतच. बाहेर चला मग समजेल कसे पाठी लागतात ते... हे हे..! आपल्यावरून चिडवतात एकेकांना. आला मेला डोमकावळा, काळा कावळा कुठचा वगैरे वगैरे..! तेवढाच मान समजून अपमान गिळायचा.
चला... जाऊ इथून. आपला मान संपला.