पहिला चहा | कल, आज और कली..! 
संपादकीय

पहिला चहा | कल, आज और कली..!

पुढारी वृत्तसेवा

टाईम मशिनचा कोणीतरी शोध लावला आणि ते कालचे, आजचे आणि उद्याच्या राजकीय परिस्थितीचे परीक्षण जर करू लागले तर काय होईल? निरीक्षण आणि परीक्षण यात भलता घोळ झाला तर ‘ज्याचे त्याने निस्तरावे!’ असे घोषवाक्य त्यात इनबिल्ट करून टाकावे, की त्याचं काम सोपं. घोळ नेमका कसा असेल पाहूया... टाईम मशिनचा भूत, वर्तमान आणि भविष्याशी संवाद..!

कल : जसा काळ सरल तो जसा असल तिकडे आमचा कल. बाकी आजची आणि उद्याची चिंता कशाला?

आज : तुम्ही काल पेरून ठेवले, झाड मोठं झालं आणि फळं दुसऱ्यांनी चोरावीत. असं झालं. कशाला करून ठेवता इतका उपद्‌व्‍याप?

कली : तुम्ही कलियुग पाहिलं. ते आम्ही जगतोय खऱ्या अर्थाने. तुमच्या आधीच्या पिढीने जे पेरले ते तुमच्या ऐशपंथी स्वभावाने दुसऱ्यांनी पळवले. फळं भोगतोय आम्ही. तुमचे काय गेले?

टाईम मशिन : मी बोलू का? तुम्ही सगळेच या ना त्या कारणे राजकारण करत आलात; पण फळांची अपेक्षा पहिल्या पिढीला वेगळी होती, दुसऱ्या पिढीला त्याच्याशी देणंघेणंच नव्हतं. आहे ते सर्व आपलंच. जातंय कुठं? त्यामुळे ते झाले दुसऱ्यांचे. खरं का?

कली : खरंच म्हणावं लागेल. आता घे गव्हाची, घे तुपाची चालू आहे. ते आम्ही बघत दिवस काढायचे.

कल : अहो, आम्ही काय मूर्ख होतो का? दळून द्यायला. पुत्र व्हावा ऐसा गुंडा तर म्हणे तुम्हीच गुंडगिरीचे बाळकडू पाजले. अरे, अर्थ काय आमच्या शब्दाला?

आज : तुम्ही नीट समजावून सांगितले असते, तर आज आम्ही वेगळे असतो. नुसती कोडी सोडवण्यातच आमचा वेळ गेला. कशाला शिकवायचं इंग्रजीतून. मराठी नीट कळलीच नाही.

कली : पॉप्स, डोन्ट वरी. बघा मी सध्या अस्खलित इंग्रजीत भाषण हाणू शकतो.

कल : अरे, भाषण हाणायला ते काय शेळी-मेंढी आहे? शी शी शी. काय ती मराठीची दशा?

कली : यू मीन टू से दिशा? मावळली ती. रात्र होईल इतक्यात.

आज : अरे कारट्या, त्यांना त्यातलं काही माहिती नाही. तो विषय नको इथे.

टाईम मशिन : तो विषय आम्हाला माहिती आहे; पण टाईम टाईम की बात है. हाजिर हो म्हटलं की जायचं.

आज : म्हणजे नेमकं काय?

टाईम मशिन : जो हाजिर तो वजीर, असं सुचवलं फक्त. बाकी बघून घ्या.

कल : बरोबरच आहे. जो हाजिर तो वजीर. ज्याची दिशा, तिकडे उषा..!

(आज और कली बेशुद्ध, टाईम मशिन बंद. क्षमस्‍व..!)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT