मुरलीधर कुलकर्णी
युरोपमध्ये जंगलातील आगींमध्ये दोन महिन्यांतच सुमारे ३.१ अब्ज युरो (सुमारे ३३,७९० कोटी रुपये) इतके आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस आणि रोमानिया या युरोझोनमधील सर्वाधिक प्रभावित पाच देशांतील जळालेल्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचाच समावेश आहे. हा आकडा युरोपियन कमिशनने संपूर्ण युरोपियन युनियनसाठी वर्तविलेल्या जंगलातील आगींमुळे होणाऱ्या सरासरी वार्षिक २.५ अब्ज युरो (सुमारे २७,२५० कोटी रुपये) नुकसानीपेक्षाही अधिक आहे. प्रत्येक वर्षी ज्या काळात नेहमी आगी लागतात त्या जंगलातील आग हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांतच यावर्षी सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आहे.
हा अंदाज युरोपियन कमिशनच्या पुनर्स्थापना खर्चाच्या पद्धतीवर आधारित असून तो फ्रान्स सरकारच्या आकडेवारीशी सुसंगत आहे. मात्र, या अंदाजात घरे, उद्योग, शेती, पर्यटन, विमा हप्त्यांतील वाढ, तसेच अग्निशमन उपकरणांवरील अतिरिक्त खर्चाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष आर्थिक नुकसान या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ईटीएच झुरिच येथील हवामान अर्थतज्ज्ञ सारा मेयर यांच्या मते, प्रत्यक्ष आर्थिक फटका या अंदाजाच्या तिपटीहूनही अधिक असू शकतो. या आगींचा सर्वाधिक फटका फ्रान्स आणि स्पेनला बसला आहे. फ्रान्समधील गिराँदे भागात एका भीषण आगीत सुमारे ४२ हजार हेक्टर जंगल जळून खाक झाले, तर सुमारे २ लाख २० हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. तसेच, सफ्रान, दसॉ एव्हिएशन आणि एरियन ग्रुप यासारख्या एरोस्पेस कंपन्यांचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले.
स्पेनमध्येही हजारो हेक्टर शेती आणि कुरणांचे नुकसान झाले असून, केवळ अग्निशमन मोहिमेवरच यंदाच्या सुरुवातीपासून १.७ ते ३.३ अब्ज युरो (सुमारे १८,५३० कोटी ते ३५,९७० कोटी रुपये) खर्च झाल्याचा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या मते, जंगलातील आगी रोखण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा खर्च या नुकसानीच्या तुलनेत अत्यल्प आहे. जंगल व्यवस्थापन, नियंत्रित पद्धतीने आग लावणे, झुडपे व गवत साफ करणे आणि आग लवकर ओळखण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभारल्यास मोठ्या प्रमाणावरील आगी टाळता येऊ शकतात. स्पेनमध्ये यासाठी दरवर्षी सुमारे ८०० दशलक्ष युरो (सुमारे ८,७२० कोटी रुपये) खर्च होतो. मात्र, प्रतिबंधासाठी खर्च केलेला एक युरो (१०९ रुपये) भविष्यात अग्निशमनासाठी लागणारे १०० युरो (सुमारे १०,९०० रुपये) वाचवू शकतो.
युरोपातील अनेक देशांमध्ये जंगलातील आगींसाठी असलेल्या अर्थसंकल्पापैकी सुमारे ९० टक्के निधी आग विझविण्यावर खर्च होतो, तर केवळ १० टक्के निधी प्रतिबंधात्मक उपायांवर खर्च केला जातो. दरम्यान, कॉपर्निकस हवामान बदल सेवेनुसार, जून २०२६ हा पश्चिम युरोपच्या इतिहासातील सर्वाधिक उष्ण जून महिना ठरला. जर्मनीच्या रॉबर्ट कोख इन्स्टिट्यूटनुसार, २०२६ च्या सुरुवातीपासून उष्णतेशी संबंधित कारणांमुळे ५,१२० जणांचा मृत्यू झाला असून, बहुतांश मृत्यू जूनअखेरीस आलेल्या उष्णतेच्या लाटेदरम्यान झाले. हवामान बदलामुळे वाढत्या उष्णतेच्या लाटा आणि जंगलातील आगी युरोपसमोरील गंभीर आव्हान बनत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.