Thiru Vummidi Ethiraj | थिरू वुम्मीदी एथिराज 
संपादकीय

Thiru Vummidi Ethiraj | थिरू वुम्मीदी एथिराज

पुढारी वृत्तसेवा

युवराज इंगवले

भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळत असताना ब्रिटिशांकडून भारताकडे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून एका राजदंडाची (सेंगोल) गरज होती. तामिळनाडूच्या अधीनम मठाच्या सूचनेनुसार अवघ्या विसाव्या वर्षी थिरू वुम्मीदी एथिराज यांनी कुटुंबासह या ५ फूट लांबीच्या सोन्याचा मुलामा असलेल्या चांदीच्या राजदंडाची कलाकुसर करून रचना केली होती. याच्या टोकावर न्याय आणि धार्मिकतेचे प्रतीक असलेला ‘नंदी’ कोरलेला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी हा राजदंड स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्द केला होता; तर २८ मे २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्‍घाटनावेळी या राजदंडला लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाजवळ सन्मानाने स्थापित केले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी एथिराज संसदेत उपस्थित होते आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले होते.

राजदंडाचे मुख्य शिल्पकार आणि चेन्नईतील १२५ वर्षे जुन्या प्रतिष्ठित ‘वुम्मीदी बंगारू ज्वेलर्सचे प्रमुख एथिराज यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी चेन्नई येथून जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने भारतीय पारंपरिक सुवर्णकारागिरी आणि देशाच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण घटनेला जोडणारा वारसा मागे राहिला आहे. २५ नोव्हेंबर १९२६ रोजी जन्मलेले एथिराज हे दक्षिण भारतातील सुवर्णकार व्यवसायातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कारागिरीमुळे वुम्मीदी कुटुंबाच्या पारंपरिक कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. विशेषतः २०२३ मध्ये भारताच्या नव्या संसद भवनात राजदंडाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्यांच्या योगदानाची पुन्हा देशभर चर्चा झाली. राजदंडाला भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे.

१४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री तामिळनाडूतील अधीनम मठाचे पुजारी हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांना सादर करण्यासाठी दिल्लीला आले होते. एथिराज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. राजदंडाच्या निर्मितीतील त्यांच्या योगदानाची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी यांनी २०२३ मध्ये ज्येष्ठ सुवर्णकाराची भेट घेऊन भारताच्या राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याचे सांगितले. भारताच्या गौरवशाली परंपरा आणि देशाच्या ऐतिहासिक प्रवासातील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून त्यांचे जीवन आणि कारागिरी सदैव लक्षात राहील, असे गौरवोद्‌गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही एथिराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत राजदंडाच्या निर्मितीतील त्यांच्या कौशल्यामुळे भारतीय सांस्कृतिक वारशात त्यांना कायमस्वरूपी स्थान मिळाले आहे. त्यांचे कार्य भारताच्या पारंपरिक कलांच्या उत्कृष्टतेचे प्रतीक असल्याचे मुर्मू यांनी नमूद केले. एथिराज यांचे निधन ही केवळ एका ज्येष्ठ सुवर्णकाराची हानी नसून, भारतीय पारंपरिक कारागिरीचा गौरवशाली वारसा जपणाऱ्या एका व्यक्तिमत्त्वाला निरोप आहे. त्यांच्या हातून साकारलेल्या राजदंडाच्या माध्यमातून त्यांचे योगदान भारतीय इतिहासात कायमच स्मरणात राहील, हे मात्र नक्की!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT