अमेरिकेची निवडणूक पद्धत ही द्विपक्षीयतेला प्रोत्साहन देते. त्यामुळे हे लहान पक्ष प्रभावी ठरत नाहीत. आता उद्योगपती एलॉन मस्क यांनी ‘अमेरिका पार्टी’ या नव्या पक्षाची स्थापना केली असून, तेथील द्विपक्षीय पद्धतीलाच आव्हान दिले आहे. ट्रम्प प्रशासनातून तडकाफडकी बाहेर पडल्यानंतर, त्यांनी अमेरिकी नागरिकांनी गमावलेले स्वातंत्र्य त्यांना परत मिळावे, यासाठी या पक्षाची स्थापना केली आहे. चुकीचा खर्च करून आणि भ्रष्ट मार्गाने पैसे कमावून देशाला दिवाळखोरीत काढण्याचा विषय येतो, तेव्हा आपण जणू एकपक्षीय व्यवस्थेत राहात असतो, ती लोकशाही व्यवस्था नसते, असे मत मस्क यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्या पर्वात मस्क हे त्यांच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्न्मेंट एफिशिएन्सी’चे प्रमुख होते. सरकारमधील अनेक विभाग आणि खाती बंद करून हजारो कर्मचार्यांना नोकरीतून काढून टाकण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे असंतोष निर्माण झाला होता. तसेच ट्रम्प यांनी कर आणि खर्च याविषयी मांडलेले विधेयक हे पूर्णतः अविचारातून तयार केलेले आहे, अशी टीका मस्क यांनी केली होती.
अमेरिकन अर्थव्यवस्थेची वाट लावण्याचे काम ट्रम्प हे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. अमेरिकेत छोटे-मोठे पक्ष यापूर्वीही स्थापन झाले आहेत. पण देशातील दोन प्रमुख राजकीय पक्षांना आव्हान देण्यात आजपर्यंत कोणीही यशस्वी झालेला नाही. मात्र मस्क हे जगातील एक श्रीमंत उद्योगपती असून, 2024 च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी ट्रम्प यांच्यासाठी 25 कोटी डॉलर खर्च केले होते. आता 2026 मधील अमेरिकेतील काँग्रेसच्या निवडणुकीत प्रचंड खर्च करून यश मिळवण्याचा निर्धार मस्क यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असून, तेथे लक्षणीय यश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मस्क यांच्या पक्षाचे नेतृत्व कोण करणार आहे आणि पक्षाची रचना कशी असणार आहे, या बाबींनाही महत्त्व असेल. सध्या ते केवळ सिनेटच्या 2 ते 3 जागा आणि 8 ते 10 ‘हाऊस डिस्ट्रिक्ट’वरच लक्ष्य केंद्रित करणार आहेत. अमेरिकेत दर दोन वर्षांनी 435 हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज् जागांसाठी निवडणुका घेतल्या जातात. याशिवाय सिनेटच्या 100 सदस्यांपैकी जवळपास एकतृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवडले जातात. कारण त्यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असतो. या सदस्यांवर मस्क यांचे लक्ष आहे. ट्रम्प यांच्याशी मतभेद झाल्यानंतर, अमेरिकेत एक नवीन राजकीय पक्ष असायला हवा का, असा प्रश्न विचारत मस्क यांनी एक जनमत चाचणी घेतली होती. त्यांच्या या कल्पनेस ‘एक्स’वरील बहुतांश युजर्सनी पाठिंबा दिला.
अमेरिकेत सरकार बेबंदपणे खर्च करते आणि राजकीय पक्ष हे भ्रष्ट आहेत. देशातील लोकशाही पोकळ असून, सामान्यांना खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळावे, यासाठी ‘अमेरिका पार्टी’ बनवली आहे, असे प्रतिपादन मस्क यांनी केले आहे. ते कॅनेडियन अमेरिकन असून, ते टेस्ला मोटर्स या जगद्विख्यात कंपनीचे संस्थापक व मुख्याधिकारी आहेत. स्पेस एक्स आणि सोलर सिटी या कंपन्याही त्यांच्याच आहेत. 2004 मध्ये टेस्ला मोटर्सचे संस्थापक म्हणून त्यांचे नाव झाले आणि इलेक्ट्रिक वाहनांचा उत्पादक म्हणून त्यांनी नाममुद्रा कोरली. मी आणि एलॉन यांच्यातील नाते खूप चांगले होते; पण विद्युत वाहने खरेदी करण्याच्या कायद्यात सवलतीच्या कपातीबद्दल बोललो, तेव्हा मस्क यांना ते रुचले नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते; तर संबंधित विद्युत वाहन विधेयक मला न दाखवता रात्रीच्या अंधारात लवकर मंजूर करून घेतले, असा दावा मस्क यांनी केला होता. उलट विद्युत वाहनांच्या सक्तीला विरोध केला आहे. एलॉन सर्वांनाच विद्युत वाहन खरेदी करण्यास भाग पाडत होता. आता तो पूर्ण वेडा झाला आहे. देशाचे अब्जावधी डॉलर वाचवण्याचा सहजमार्ग म्हणजे टेस्लाची अनुदाने रद्द करणे होय, असे ट्रम्प यांनी बेधडकपणे म्हटले होते. केवळ ट्रम्प यांच्यासोबतच्या वैमनस्यातून नवा पक्ष स्थापन केला जात असेल, तर त्याला तसा काही अर्थ नाही.
अमेरिका हा जगातील एक मोठा लोकशाही देश असून, तेथे 50 राज्ये आहेत. विविध धर्म आणि वंशांचे लोक अमेरिकेत राहतात आणि त्यांचे प्रश्नही वेगवेगळे आहेत. एखादी कंपनी स्थापन करणे व ताब्यात घेणे आणि एखादा राजकीय पक्ष स्थापन करणे यात मूलभूत फरक आहे. डावी वा उजवी विचारसरणी असो, राजकीय पक्षास सर्व समाजघटकांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतात आणि त्यासाठी लढावे लागते. केवळ पैसा आहे, म्हणून पक्ष स्थापन करून सरकार बनवण्याच्या आकांक्षा बाळगणे किंवा धोरणांवर प्रभाव टाकण्याच्या बाता मारणे हे केवळ स्वप्नरंजन आहे. कुठलाही वैचारिक पाया वा जनाधाराविना राजकीय पक्ष चालवणे, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. तेव्हा राजकारणाच्या उद्योगात पडताना मस्क यांनी विचार केलेला बरा. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे मुख्य पक्ष आहेत.
डेमोक्रॅटिकची सुरुवात 1828 मध्ये गुलामगिरी समर्थक पक्ष म्हणून झाली. तथापि 1930 आणि 1940च्या दशकातील महामंदीनंतर आर्थिक पुनरुत्थान तसेच 1960च्या दशकातील नागरी हक्क चळवळीमुळे डेमोक्रॅटिक पक्ष वांशिक समानतेचा समर्थक बनला. हा पक्ष उदारमतवादाला प्रोत्साहन देतो. तर रिपब्लिकनची सुरुवात 1954 मध्ये गुलामगिरीविरोधी पक्ष म्हणून झाली आणि 1861 मध्ये त्या पक्षाचे अब्राहम लिंकन हे राष्ट्राध्यक्ष होते. रिपब्लिकन पक्ष हा रूढीवादी आणि भांडवलशाही विचारांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. याशिवाय अमेरिकेत लिबर्टेरियन पार्टी, ग्रीन पार्टी, कन्स्टिट्युशन पार्टी यांसारखे अनेक लहान पक्षही अस्तित्वात आहेत. आता मस्क यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला असला तरी त्यांना राजकारणात कितपत यश मिळते, हे कळायला फार उशीर लागणार नाही.