सचिन बनछोडे
टेस्ला, स्पेसएक्स आणि ‘एक्स’चे सर्वेसर्वा एलन मस्क हे आता जगातील पहिले असे व्यक्ती बनले आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. त्यांची संपत्ती ‘वाढता वाढता वाढे’ या थाटाने वाढतच चालली आहे. फोर्ब्सच्या रियल-टाईम बिलिनियर ट्रॅकरनुसार, त्यांची एकूण संपत्ती 500.1 अब्ज डॉलरइतकी नोंदवली गेली आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी पहिल्यांदा 400 अब्ज डॉलरचा आकडा पार केला होता. या वेळी, मस्क हे दुसर्या क्रमांकावर असलेल्या लॅरी एलिसन यांच्यापेक्षा अंदाजे 150 अब्ज डॉलरने पुढे आहेत आणि तज्ज्ञांचे मत आहे की, ते जगातील पहिले ट्रिलिनियर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
मस्क यांच्या संपत्तीचा सर्वात मोठा हिस्सा ‘टेस्ला’ मधून येतो. 15 सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडे कंपनीचा 12.4 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा होता. या वर्षाच्या सुरुवातीला चढ-उतारानंतर ‘टेस्ला’च्या शेअर्समध्ये तेजी आली आहे आणि आतापर्यंत त्यात 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. नुकत्याच शेअर्समध्ये झालेल्या 3.3 टक्के वाढीमुळे मस्क यांच्या संपत्तीत 6 अब्ज डॉलरची भर पडली. कंपनीवर विश्वास दाखवत मस्क यांनी नुकतेच 1 अब्ज डॉलरचे टेस्ला शेअर्सदेखील खरेदी केले आहेत. कंपनीच्या बोर्डाने त्यांच्यासाठी 1 ट्रिलियन डॉलरचे वेतन पॅकेज प्रस्तावित केले आहे, जे निर्धारित उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यावर आधारित असेल.
टेस्लाव्यतिरिक्त मस्क यांच्या इतर कंपन्या, जसे की ‘एक्स एआय’ आणि स्पेसएक्सदेखील त्यांच्या संपत्तीत महत्त्वाचे योगदान देत आहेत. जुलै 2025 पर्यंत ‘एक्स एआय’चे मूल्यांकन 75 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचले होते, तर स्पेसएक्सचे अंदाजित मूल्यांकन 400 अब्ज डॉलर सांगितले जात आहे. एक धडाडीचे आणि कल्पक उद्योजक म्हणून एलन मस्क यांची जगभर ख्याती आहे. मंगळावर मानवी वसाहत स्थापन करण्याचे स्वप्न असो किंवा दुर्गम भागातही स्वस्त, वेगवान इंटरनेट देण्यासाठी ‘स्टारलिंक’ ही हजारो कृत्रिम उपग्रहांचे जाळे निर्माण करण्यासाठीची योजना असो, मस्क यांनी नेहमीच चार पावले पुढचा विचार करण्याचा आपला पिंड दाखवून दिलेला आहे. ‘फाल्कन9’ सारखे अद्ययावत रॉकेट निर्माण करणारी त्यांची ‘स्पेसएक्स’ ही कंपनी असो किंवा वेगवान इलेक्ट्रिक मोटारी बनवणारी त्यांची ‘टेस्ला’ असो, जगभरात या कंपन्यांचा दबदबा आहे.
‘ट्विटर’ खरेदी करून मस्क यांनी त्याचे ‘एक्स’ असे नामकरण केले, त्यावेळीही त्याची मोठीच चर्चा झाली होती. एकेकाळी ते ज्यांचे सल्लागार बनले त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तसेच ‘अॅमेझॉन’चे जेफ बेजोस व ‘ओपन एआय’चे सॅम ऑल्टमन यांच्यावर जाहीर टीका करूनही त्यांनी जगाचे लक्ष वेधले होते. विज्ञान, अर्थकारण, राजकारण अशा अनेक बाबतीत रुची असणारा हा प्रतिभावंत ‘बिलिनियर’ उद्योजक आता जगातील पहिला ‘ट्रिलिनियर’ बनत आहे.