एकनाथ शिंदेंना लागली चिंता !  (Pudhari File Photo)
संपादकीय

Eknath Shinde Concern | एकनाथ शिंदेंना लागली चिंता !

Thackeray Brothers Reunion | ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अत्यल्प.

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

लोकसभेच्या निकालात फेरबदल झाले अन् विधानसभेत महायुतीला भरघोस यश मिळाले ते नरेटिव्हची लढाई ताकदीने लढल्यामुळे आणि विशेषत: लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे. फासे योग्य पडले, भरभरून मते मिळाली, जागा निवडून आल्या. सत्ताधार्‍यांच्या यावेळच्या संख्येला ‘पाशवी बहुमत’ असे संबोधले जात आहे. महाराष्ट्राचे चित्रचरित्र बदलण्याचे प्रयत्न जोमाने सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाला जनतेने सलग तिसर्‍यांदा महाराष्ट्राने कौल दिल्याने आता या पक्षाला या प्रदेशाची नस सापडली आहे, असे वाटते. यापुढे भारतीय जनता पक्ष नव्या अत्मविश्वासाने येणार्‍या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाईल.

ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता अत्यल्प. काँग्रेसमध्ये लगेच प्राण फुंकले जातील काय याबद्दल शंका. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वेळ आक्रसलेल्या पक्षातली अंतर्गत भांडणे सोडवण्यात जाणार असे दिसतेय. त्यामुळे भाजपच्या विस्तारात सध्या आव्हान ठरू शकतात ते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस पूर्वी एकदा म्हणाले होते, राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री आता आपद्धर्म आहे. शिवसेनेशी युती आमचा स्वधर्म. म्हणजे सोपा अर्थ लावायचा तर 2019 ला पाठीत जो खंजीर खुपसला, त्याचे चोख उत्तर देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि आमचे हिंदुत्ववादी मित्र बेवफा झाल्याने त्यांच्यातले अस्वस्थ आत्मे आम्ही हेरले अन् त्यांच्या विचारांचे रक्षण केले.

हिंदुत्वाचा उद्घोष करणार्‍या ठाकरेंनी काँग्रेसशी हातमिळवणी करताच एकनाथ शिंदेंना महाशक्तीने बळ दिले अन् ठाकरेंपासून आमदार वेगळे झाले. पक्षनिर्मात्याच्या जैविक वारसाला नाकारून शिवसैनिक आमदारांनी शिंदेंच्या पाठीशी उभे राहणे हे कल्पनेपलीकडचे होते. असे बंड करणे हे केवळ अभूतपूर्व होते. अशा वेळी साथ देणार्‍या शिंदे यांना भाजप कितीही विस्तारवादी झाला तरी अंतर देणार नाही. तसे झालेच तर ते अयोग्य दिसेल. भाजपचे सध्याचे राजकारण आक्रमक आहे खरे; पण शिंदेंसारख्या मित्राला सांभाळून घेणे ही गरज असल्याचे भाजपला विसरून चालणार नाही.

निकाल लागताच शिंदे आपण मुख्यमंत्री होऊ या विचारात होते. भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे बरेचसे चित्र स्पष्ट झाले. अर्थात शिंदे यांना असे त्यांचे मित्र सांगतात. मात्र, भारतीय जनता पक्षाने त्यांना मन न दुखावता त्यांना सावरून घेत पदाचा मान दिला. विधानसभेच्या लढाईचे तेही महानायक असल्याचे चित्र संपूर्ण राज्यभर आदरपूर्वक जाऊ दिले. शिंदे थोर कर्तृत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनाही भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी आहे, हे कळले. अर्थात तरीही गेलेले मुख्यमंत्रिपद त्यांच्या कार्यकर्त्यांना अस्वस्थ करत होते. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत कायदा न जुमानण्यात धन्यता मानणार्‍या आमदारांची संख्या वाढत आहे. या आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळत होता. हे आमदार मनाप्रमाणे वागणे पसंत करतात आणि आपल्या नेत्याला, आपल्या विचारधारेला, आपल्या पक्षाला आपण अडचणीत आणतो आहोत हे विसरून जातात. आमदारांनी पावसाळी अधिवेशन सुरू असताना केलेला प्रकार हा त्यातलाच भाग होता.

खरे तर आमदारांच्या राहण्या-खाण्याची आणि जेवणाची व्यवस्था सध्या अत्यंत निकृष्ट आहे. आमदार निवास बांधण्याचे काम सुरू आहे आणि नव्या सरकारकडून प्रचंड अपेक्षा असलेली जनता अधिवेशन काळात कामासाठी संपर्क साधत असल्यामुळे उपाहारगृहांवर पडणारा ताण मोठा आहे. त्यामुळे उत्तम पदार्थ वाढणे हे शक्य होत नाही हे स्पष्ट दिसते आहे. अन्न खराब असते, त्यात दर्जा नसतो हे मान्य; पण अशा खराब अन्नासाठी शिवसेनेच्या एका आमदाराने सरळ मारामारी करणे हे शोभत नव्हते. पाठोपाठ काही मंत्र्यांनी जादूटोणा होण्याचे उल्लेख करणे, आयकर कराच्या नोटिसांबाबत स्वतःच्याच पक्षाला अडचणीत आणणारी विधाने करणे हे आश्चर्यकारक होते.

शिंदे या प्रकाराने हतबद्ध झाले हेही दिसत होते. मात्र, सहकार्‍यांना सांभाळण्यावर त्यांनी आजवर कायमच भर दिला आहे. लोकसभेत ते ज्या खासदारांना उमेदवारी देऊ शकले नाहीत, त्यांना विधान परिषदेवर नेमण्याचा शब्द त्यांनी दिला होता आणि तो त्यांनी पाळला. शब्दाचा पक्का असलेला हा नेता सहकार्‍यांना पाठबळ देण्यात कसूर करत नाही. सांभाळून घेण्याच्या या धोरणामुळे शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या पहिल्या काही दिवसांत नोकरशाहीही कंटाळली होती. अवास्तव मागण्या करणारे आमदार कुठल्याही अधिकार्‍याच्या कार्यालयात शिरत. काही दिवसांतच या आगळीकीची दखल घेत शिंदे यांनी सहकार्‍यांची समजूत घातली असे म्हणतात. आता क्रमांक दोनचे स्थान सांभाळताना सहकार्‍यांचे वर्तन त्यांच्यासाठी अडचणीचे कारण ठरले आहे. मग्रुरीची भाषा बोलणे, मारहाण करणे या प्रकाराबद्दल भाजपच्या दिल्लीकर नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या परिस्थितीत सगळ्या सहकार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम शिंदे यांनी केले. ते अप्रिय होते आणि अपरिहार्यही. लोकजीवनात वावरताना शिंदे कायम मदतीला धावतात, अशी पावती त्यांच्या संपर्कात आलेले नागरिक देत असतात.

माझा हात देणारा आहे, मी देना बँक चालवतो असे शिंदे सांगतात. जनतेला असे भरभरून देणारे नेते आवडतात. राजकारणाचा पोत बदलला आहे. त्यात रॉबिनहुडगिरीला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. अन्न खराब होते म्हणून मारले, ही शिवसेना स्टाईल आहे, असे म्हटले गेले ते या पार्श्वभूमीवर. पण महाराष्ट्रात असे चालत नाही. लोकप्रतिनिधींची मुजोरी या भूभागाला आवडत नाही. लोकभावना या मारधाडीच्या विरोधात असल्याची जाणीव त्यामुळेच शिंदे यांनी सहकार्‍यांना करून दिली. तीदेखील तातडीने! स्वत:ला बदलवले नाही तर कारवाई होईल, असा दम शिंदेंनी दिला आहे. या औषधाची मात्रा लागू पडते काय, ते बघायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT