डॉ. नगिना माळी
शिक्षण हे केवळ ज्ञान मिळविण्याचे साधन नसून, माणूस घडविणारी सामाजिक आणि मूल्याधिष्ठित प्रक्रिया आहे. शिक्षणाच्या विविध व्याख्या आणि त्यामागील तत्त्वज्ञान याविषयी...
भारतासारख्या विकसनशील देशासाठी शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून, राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. काळानुरूप शिक्षणाची उद्दिष्टे, स्वरूप आणि पद्धती बदलत गेल्या. प्रौढ शिक्षण, स्त्री शिक्षण, दूरस्थ शिक्षण, निरंतर शिक्षण आणि आजचे ऑनलाईन शिक्षण या प्रवासातील विविध टप्पे आहेत. या परिवर्तनामागे अनेक विचारवंतांचे चिंतन आणि प्रयत्न आहेत.
शिक्षण म्हणजे नेमके काय, याची मांडणी विविध विचारवंतांनी आपल्या दृष्टिकोनातून केली आहे. विनोबा भावे यांनी ‘योग, उद्योग आणि सहयोग म्हणजे शिक्षण,’ असे म्हटले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या मते, ‘माणसातील पूर्णत्वाचा आविष्कार म्हणजे शिक्षण’, तर रवींद्रनाथ टागोर यांनी ‘भाव, भाषा आणि जीवन यांचा मेळ म्हणजे शिक्षण,’ अशी व्याख्या केली. महात्मा गांधींनी शिक्षणाला श्रम आणि कृतीशी जोडत ‘खरे बौद्धिक शिक्षण शरीरश्रमातून प्राप्त होते,’ असे प्रतिपादन केले. या सर्व व्याख्यांमध्ये एक समान धागा दिसतो आणि तो म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास.
मुळात शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. व्यक्तीला समाजाशी जोडणे, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आणि त्याला जबाबदार नागरिक बनवणे, हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शिक्षणामुळे व्यक्तीचे मन, मेंदू आणि मनगट कार्यरत राहतात. ज्ञानाबरोबरच विचारशक्ती, संवेदनशीलता आणि कृतिशीलता विकसित होणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी संस्कारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संस्कारांची सुरुवात घरातून होते आणि शाळा त्याला दिशा देण्याचे कार्य करते. प्राचीन आणि आधुनिक विचारवंतांनी शिक्षणाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. प्लेटो यांच्या मते, ‘शरीर आणि आत्म्याला त्यांच्या जन्मजात क्षमतांनुसार पूर्णत्वाकडे नेणे म्हणजे शिक्षण होय.’ जॉन ड्यूई यांनी अनुभवाधिष्ठित शिक्षणावर भर देत ‘अनुभवाची समृद्धता म्हणजे शिक्षण,’ असे सांगितले. यावरून शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून, जीवनातील अनुभवांमधून विकसित होणारी प्रक्रिया असल्याचे स्पष्ट होते. शिक्षण व्यक्तीला स्वावलंबी बनवते. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हे विचार शिक्षणाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करतात. शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर त्या माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे प्रज्ञेत रूपांतर करणे होय. हेच ज्ञान व्यक्तीला स्वतःची आणि समाजाची जाणीव करून देते. रूसो यांनी मांडलेल्या अभावात्मक शिक्षणाच्या संकल्पनेनुसार, बालकाला योग्य वातावरण मिळणे आवश्यक आहे. दुर्गुणांपासून दूर ठेवून सद्गुणांकडे वळविणारे वातावरण निर्माण करणे ही शिक्षणाची महत्त्वाची पूर्वअट आहे. बालवयात योग्य संस्कार झाले तरच व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडू शकतो.
आजच्या काळात शिक्षणाकडे केवळ परीक्षा आणि गुणांच्या चौकटीत पाहणे योग्य ठरणार नाही. समाजाशी संवाद साधणारे, प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आणि जीवनोपयोगी शिक्षण अधिक आवश्यक आहे. पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक ज्ञान, कला, क्रीडा, सामाजिक जाणिवा आणि मूल्यशिक्षण यांचाही समावेश असला पाहिजे. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणावर भर दिला आणि शिक्षण पिढ्या घडविते, हा विश्वास व्यक्त केला. एकूणच, शिक्षण म्हणजे माणसातील सुप्त गुणांना जागरूक करून त्याला माणुसकी, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव देणारी प्रक्रिया होय. मनुष्यप्राण्यातून माणूस आणि माणसातून मानवता घडविण्याची ताकद शिक्षणात आहे. म्हणूनच शिक्षण हे केवळ ज्ञानाची जननी नसून, सुसंस्कृत, सर्जनशील आणि जबाबदार समाजनिर्मितीचे प्रभावी साधन आहे. शिक्षणाच्या आधुनिकसंदर्भात डिजिटल क्रांतीमुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक व्यापक आणि सुलभ झाली आहे. ऑनलाईन शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ताआधारित अध्यापन साधने आणि मुक्त शैक्षणिक संसाधने, यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या ज्ञान मिळणे शक्य झाले आहे. तरीही या बदलांमध्ये शिक्षकाची भूमिका कमी न होता अधिक महत्त्वाची झाली आहे. शिक्षक हा केवळ माहिती देणारा नसून, मार्गदर्शक, प्रेरक आणि मूल्यसंस्कार देणारा घटक आहे. त्यामुळे तंत्रज्ञान आणि मानवी संवेदना यांचा समतोल राखणे ही आजच्या शिक्षणव्यवस्थेची खरी गरज आहे.