विकास नावाची काही गोष्ट असते की नाही? नागरिकांनी विकासामध्ये हातभार लावावा, अशी शासनाची इच्छा असेल तर त्याला तुम्ही मान दिलाच पाहिजे. अनेकजण 31 डिसेंबरच्या रात्री ‘पारंपरिक’रीत्या नववर्षाचे स्वागत करतात. अनेक मित्रांच्या पार्टी होतील, रात्रभर डान्स होईल, तुम्ही कितीही नियोजन केले असले तरी मागवलेले मद्य कमी पडू नये म्हणून खास तुमच्यासाठी यावर्षी सोय केलेली आहे. ती सोय म्हणजे पहाटे पाच वाजेपर्यंत तुम्हाला मद्य खरेदी करता येईल.
समजा, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये बसला आहात आणि तुम्हाला जास्त झाली तर त्या हॉटेलच्या मालकावर तुम्हाला घरी सोडायची जबाबदारी पण लवकरच टाकणार आहेत म्हणे. पण, घराचा पत्ता तुम्हाला सांगता येईल किंवा सापडेल एवढी शुद्ध असली पाहिजे.
आपल्या राज्यात शेतामध्ये आणि गावाबाहेर पार्टीचे नियोजन आहे. मोठेमोठे डीजे लावले जातील, त्यावर मोठ्या आवाजात गाणी पण वाजवली जातील. तुम्ही नुसते नृत्य करून फारसा उपयोग होणार नाही. कारण, डान्स म्हणजे काय? आले वारे आणि गेले वारे. नृत्य करण्यापूर्वी मात्र भरपूर घेतली पाहिजे, काळजी हो. त्यात यंदा महापालिका निवडणुका आल्यात. त्यामुळे तरुण मंडळांची तर काय चंगळच आहे.
त्यातून आपोआपच विकासाला हातभार लागणार आहे. काय म्हणताय? लक्षात येत नाही? अहो, जेवढी जास्त प्रमाणात दारू घेतली जाईल तेवढा महसूल शासनाकडे गोळा होत राहील आणि हा महसूल सरकार थेट विकासकामालाच लावणार ना? विकासकामे करायची म्हटली की पैसा लागतो आणि पैसा कमी असल्यानंतर शासनाने वेगवेगळ्या मार्गाने महसूल उभा करावा, त्यासाठी ही नामी शक्कल काढली आहे. या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत मुबलक दारू उपलब्ध असणार आहे. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की, तुमचे पैसे खर्च करून ती विकत घ्यायची आहे. तुम्ही खर्च करणार्या प्रत्येक पैशाचा काही एक वाटा शासनाच्या तिजोरीत जात असतो आणि त्यातूनच विकासकामे होत असतात. आपल्या राज्याचा महसूल वाढवायला इतर राज्याचे लोक येणार नाहीत, तो आपणच वाढवायला हवा, असे समजून अनेकजण 31 डिसेंबरला अत्यंत सकारात्मकरीत्या कंबर कसतात.
महिला वर्गाने, पतीराज थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी बाहेर पडत असतील तर ते राज्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जात आहेत, असे समजावे. एवढा उदात्त उद्देश असताना त्यांना विरोध करणार? तुमच्या परवानगीनेच ते राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत आहेत, हे विसरू नका.