मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणार्या तीन आरोपींना पुण्यातील एका न्यायालयाने अनोखी शिक्षा सुनावली आहे. हे आरोपी गैरवर्तन करताना पोलिसांनी पाहिले आणि त्यांची वैद्यकीय चाचणी घेतली. न्यायालयात खटला उभा राहिला. या तीनही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आणि न्यायालयाने त्यांना चार दिवस दररोज तीन तास सार्वजनिक ठिकाणी साफसफाई करण्याची शिक्षा सुनावली.
अशाप्रकारे काही अवैध रसपान करणार्या लोकांना सुचवावेसे वाटते की, प्यायचे असेल तर दूधच प्या ना? इतर गोष्टी कशासाठी प्राशन करायच्या? प्यायचे असेल तर सर्वात उपयुक्त असे दूधच प्या, या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, तसेच दुधाचे व्यसन लागत नाही. कुणी दूध पिऊन गटारीत पडला आहे, असेही कधी पाहण्यात आलेले नाही.
दूध ही तिरस्कार करावा, अशी बाबच नाही. तरुणाईला मात्र दूध पिण्याचा तीव— तिरस्कार वाटत आहे, असे दिसून आले आहे. नुकतीच कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. कोजागरी पौर्णिमा, चंद्र आणि दूध यांचे अतूट असे नाते आहे. आजकाल सोशल मीडियाच्या प्रचंड वापरामुळे विविध प्रकारचे विनोद कोजागरी पौर्णिमेबद्दल आले होते. काहींनी प्रश्न विचारला होता की, ‘चंद्र पाहून दूध प्यावे की दुसरे काही पिऊन थेट चंद्रावर जावे.’ अर्थात, ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
फळांचे ज्यूस असतील तरी ते पण पौष्टिक असतात; मग दूध पिण्यापेक्षा ज्यूस पिले तर काय वाईट? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्यूस आपण कधीतरी पीत असतो आणि विशेषत: उन्हाळ्यामध्ये पीत असतो; कारण त्या काळात शरीराचे तापमान वाढलेले असते. थंडगार ज्यूस पिऊन शरीराला बरे वाटते आणि तरतरी पण येत असते. या ज्यूसबरोबर असणारे कोल्ड्रिंक हे अत्यंत निरुपयोगी असले, तरी अक्षरश: हजारो लिटरने प्राशन केले जाते. कोल्ड्रिंकच्या जाहिरातीत अॅक्शन असते. हीरोईझम असतो. या तत्सम जाहिराती पाहून तरुण मंडळी भारावून जातात आणि जोशमध्ये येऊन हे कोल्ड्रिंक्स पितात, ज्यांचा शरीराला काही उपयोग नसतो.
तसे पाहता दुधाला कोणताही दुसरा पर्याय नाही. कारण, दुधाचा प्रत्येक अंश हा शरीरासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हणतात. तरीही दुधाच्या जाहिराती कमी आणि कोल्ड्रिंकच्या जास्त असतात. मद्यपानाने लिव्हर आणि किडनी आणि त्यानंतर इतर अवयवांवर परिणाम होत जातो. याचा अर्थ ते तुमचे आयुष्यमान कमी करते. अशावेळी सर्व काही सोडून तुम्हाला दुधाकडे वळणे आवश्यक आहे. आजघडीला व्यसनी पेयांकडे लक्ष आणि दुधाकडे दुर्लक्ष पाहता, दूध पिण्याकडे ओढा वाढावा, यासाठी अनोखी जाहिरात करता येईल. दूध पिणे डेअरिंगचे काम आहे. ते शरीराला अत्यंत पोषक आहे. त्यामुळे प्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे दुधाला ‘डर के आगे जीत है’ असे म्हणता येईल, नाही?