सचिन बनछोडे
कर्म कर, फळाची इच्छा ठेवू नकोस... हे गीतावचन काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या फील्ड डायरेक्टर डॉ. सोनाली घोष यांना आपल्या सेवाभावी जीवनात तंतोतंत लागू होते. मात्र, एखाद्याच्या कर्तृत्वाचा कीर्तिसुगंध हा जगभर दरवळतोच. आता केंटन मिलर सन्मान प्राप्त करून त्यांनी जागतिकस्तरावर भारताला नवी ओळख मिळवून दिली आहे. त्यांनी भारतातील पर्यावरण संरक्षणाला नवी दिशा देऊन संपूर्ण देशाला अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. त्यांचे या क्षेत्रातील नेतृत्व केवळ देशासाठीच नव्हे, तर परदेशातील लोकांसाठीही प्रेरणास्रोत ठरले आहे.
गेल्या शुक्रवारी, जागतिकस्तरावर भारताच्या संवर्धन प्रयत्नांना मोठी ओळख मिळाली. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या फील्ड डायरेक्टर डॉ. सोनाली घोष यांना आययूसीएन वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेसमध्ये डब्ल्यूसीपीए-केंटन मिलर अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मिळवणार्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्रांच्या स्थिरतेसाठी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयत्नांसाठी डॉ. घोष यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डॉ. सोनाली यांचा जन्म 1975 मध्ये पुण्यात झाला. त्या एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबातून येतात. त्यांचे वडील सैन्यात असल्याने त्यांचे बालपण संपूर्ण भारतात गेले. यामुळेच त्यांना भारतातील नद्या, जंगले आणि विविध क्षितिजे पाहायला मिळाली. त्यामधूनच त्यांचे पर्यावरणप्रेम विकसित झाले व वाढले. जेव्हा डॉ. घोष यांनी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस जॉईन केली, तेव्हा त्या त्याच क्षितिजांवर परतल्या जिथे त्यांचे बालपण गेले. पुढे त्यांनी लाईफ सायन्सचा अभ्यास केल्याने त्यांचे निसर्गाशी असलेले नाते आणखीनच द़ृढ झाले.
डेहराडूनमधील वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये त्यांची निवड झाली, तेव्हा त्यांच्या आयुष्याला एक नवे वळण मिळाले. वन अधिकारी म्हणून त्यांना खर्या अर्थाने जंगलाचे रक्षण करणे म्हणजे काय, हे समजले. 1 सप्टेंबर 2023 रोजी डॉ. घोष यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या पहिल्या महिला फील्ड डायरेक्टर बनून इतिहास रचला. या महत्त्वपूर्ण पावलामुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर देशातील संपूर्ण संवर्धन चळवळीला नवी उंची मिळाली. काझीरंगा हे सोपे ठिकाण नाही; ब्रह्मपुत्रा नदीच्या सान्निध्यात असलेले हे उद्यान जगातील सर्वाधिक एक-शिंगी गेंडे, हत्ती, वाघ आणि पक्ष्यांच्या 500 हून अधिक प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यामुळे येथील व्यवस्थापन आव्हानात्मक बनते. डॉ. घोष यांनी हे ठिकाण केवळ सांभाळले नाही, तर त्याचे नाव देशभरात केले. अनेक अडचणींचा सामना करूनही डॉ. घोष यांनी काझीरंगाच्या संवर्धन प्रणालीला परिवर्तनकारी रूप दिले. ‘नेकी कर, दर्या में डाल...’ या म्हणीप्रमाणेच डॉ. घोष यांचे प्रयत्न आहेत. त्यांनी निःस्पृहपणे आपले उपक्रम सुरू ठेवले आणि अखेरीस त्यांना जगभरातून सन्मान प्राप्त झाला. डॉ. घोष यांचे यश हे संपूर्ण देशाचे यश आहे!