प्राचार्य तुषार चांदवडकर
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी आपल्या साहित्य आणि वैचारिक लेखनातून दलित साहित्याला नवी दिशा, स्वतंत्र सौंदर्यदृष्टी आणि व्यापक वैचारिक अधिष्ठान मिळवून दिले. उपेक्षितांच्या वेदनांना शब्द देतानाच जातीय विषमतेविरुद्ध विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला.
मराठी साहित्याच्या इतिहासात काही साहित्यिकांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केवळ साहित्यनिर्मिती केली नाही, तर समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक जडणघडणीतही मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. शरणकुमार लिंबाळे हे अशाच महत्त्वपूर्ण साहित्यिकांपैकी एक आहेत. दलित साहित्याला व्यापक वैचारिक अधिष्ठान देण्याबरोबरच त्याला स्वतंत्र सौंदर्यदृष्टी आणि चिकित्सक परिप्रेक्ष्य प्राप्त करून देण्यात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे साहित्य म्हणजे केवळ उपेक्षितांच्या वेदनांचे चित्रण नव्हे, तर सामाजिक विषमतेविरुद्धचा वैचारिक संघर्ष, मानवी प्रतिष्ठेचा आग्रह आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीची आकांक्षा होय.
अक्करमाशी : एका व्यक्तीची वेदना
डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचे नाव घेताच सर्वप्रथम आठवते ते त्यांचे गाजलेले आत्मकथन ‘अक्करमाशी’. मराठी दलित आत्मकथनाच्या परंपरेतील ही एक मैलाचा दगड ठरलेली साहित्यकृती आहे. या आत्मकथनातून त्यांनी आपल्या व्यक्तिगत जीवनातील संघर्ष, सामाजिक उपेक्षा, जातिव्यवस्थेने निर्माण केलेली विषमता, कौटुंबिक गुंतागुंत आणि अस्मितेचा शोध अत्यंत प्रामाणिकपणे मांडला आहे. ‘अक्करमाशी’ हे केवळ एका व्यक्तीचे आत्मकथन नाही, तर भारतीय समाजव्यवस्थेतील जातीय उतरंडीचे आणि सामाजिक विषमतेचे वास्तवदर्शी दस्तऐवजीकरण आहे. व्यक्तीच्या जीवनानुभवातून समग्र समाजाचे वास्तव व्यक्त करण्याची ताकद या लेखनात आहे. स्वतःच्या वेदनेला साहित्यिक अभिव्यक्ती देताना त्यांनी असंख्य उपेक्षितांच्या अनुभवांना शब्द दिले. त्यामुळे ‘अक्करमाशी’ला केवळ आत्मचरित्रात्मक साहित्यकृती म्हणून नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण वैचारिक हस्तक्षेप म्हणूनही पाहावे लागते.
साहित्यनिर्मितीचे बहुआयामी विश्व
लिंबाळे यांची साहित्यनिर्मिती केवळ आत्मकथनापुरती मर्यादित नाही. कथा, कादंबरी, कविता, आत्मकथन, समीक्षा आणि वैचारिक लेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली आहे. ‘उपल्या’, ‘हिंदू’, ‘बहुजन’, ‘झुंड’, ‘नरवानर’, ‘दलित ब्राह्मण’, ‘सनातन’ आणि ‘गर्व से कहो’ यांसारख्या साहित्यकृतींतून त्यांनी भारतीय समाजातील जातीय वास्तव, सांस्कृतिक संघर्ष, सामाजिक बहिष्करण, अस्मिता आणि परिवर्तनाची प्रक्रिया यांचे विविधांगी चित्रण केले आहे.
त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा सामान्य माणूस आणि त्याचे जगणे आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या माणसांचे प्रश्न, त्यांचे संघर्ष, त्यांची स्वप्ने आणि त्यांच्या जगण्यातील अंतर्विरोध यांना त्यांनी साहित्याच्या केंद्रस्थानी आणले. इतिहासाच्या मुख्य प्रवाहात ज्यांच्या अस्तित्वाची पुरेशी नोंद झाली नाही, अशा समूहांचे जीवन आणि योगदान साहित्याच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला २०२० चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले दलित साहित्यिक ठरले. विशेष म्हणजे ‘सनातन’च्या इंग्रजी अनुवादाला २०२४ च्या जेसीबी साहित्य पुरस्काराच्या अंतिम निवड यादीत स्थान मिळाले. यावरून त्यांच्या साहित्याची भाषिक आणि राष्ट्रीय सीमा ओलांडणारी क्षमता लक्षात येते.
दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
डॉ. लिंबाळे यांचे सर्वांत महत्त्वाचे वैचारिक योगदान म्हणजे ‘दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ हा समीक्षाग्रंथ. दलित साहित्याकडे पाहण्याची नवी दृष्टी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र निकष विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या ग्रंथात दिसतो.
परंपरागत साहित्य समीक्षेत सौंदर्य, कल्पनाविलास, अलंकार, शैली, रस आणि कलात्मकता यांना महत्त्व दिले गेले. मात्र, दलित साहित्याचे मूल्यमापन केवळ या पारंपरिक निकषांच्या आधारे करता येणार नाही, अशी भूमिका लिंबाळे मांडतात. कारण दलित साहित्याची निर्मिती विशिष्ट सामाजिक अनुभव, ऐतिहासिक अन्याय, जातीय शोषण, मानवी वेदना आणि परिवर्तनाच्या आकांक्षेतून झालेली आहे. त्यांच्या मते दलित साहित्याचे सौंदर्य हे केवळ भाषिक किंवा शैलीगत वैशिष्ट्यांमध्ये नसून त्याच्या अनुभवसत्यात, सामाजिक बांधिलकीत, विद्रोही जाणिवेत आणि परिवर्तनशील आशयात आहे. दलित साहित्याला स्वतंत्र सौंदर्यशास्त्राची आवश्यकता आहे, ही भूमिका त्यांनी सैद्धांतिक पातळीवर मांडली. त्यांच्या साहित्यचिंतनात अनुभवाला विशेष महत्त्व आहे. ज्यांनी सामाजिक विषमता प्रत्यक्ष अनुभवली आहे, त्यांच्या अनुभवविश्वाला साहित्यामध्ये अभिव्यक्त होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दलित साहित्य हे केवळ सहानुभूतीचे साहित्य नसून स्वानुभवातून निर्माण झालेले आत्मभान आणि सामाजिक जाणीवेचे साहित्य आहे.
वेदना, विद्रोह, नकार आणि परिवर्तनाची भूमिका
लिंबाळे यांच्या साहित्यविचारात वेदना, नकार, विद्रोह आणि परिवर्तन या संकल्पना मध्यवर्ती आहेत. मात्र, त्यांचा विद्रोह हा केवळ व्यवस्थेच्या विरोधातील भावनिक उद्रेक नाही. तो विषमतेच्या मुळाशी जाणारा आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेची मागणी करणारा वैचारिक विद्रोह आहे. त्यांच्या मते साहित्याने समाजातील अन्यायकारक व्यवस्था उघड केली पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या प्रवृत्तींचा प्रतिकार केला पाहिजे. साहित्य हे समाजापासून अलिप्त राहू शकत नाही. त्याला सामाजिक वास्तवाशी संवाद साधावा लागतो. लिंबाळे यांच्या विचारविश्वावर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव जाणवतो. विशेषतः आंबेडकरी विचारधारेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये त्यांच्या साहित्याच्या वैचारिक अधिष्ठानात दिसून येतात.
‘सनातन’ कादंबरी
लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीने मराठी साहित्याला राष्ट्रीय पातळीवर विशेष प्रतिष्ठा मिळवून दिली. या कादंबरीतून त्यांनी इतिहासातील उपेक्षित समाजघटकांचे जीवन, त्यांच्यावरील अन्याय आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्तित्वाचा शोध घेतला आहे. मुख्य प्रवाहातील इतिहासलेखनात अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या समाजघटकांचे अनुभव आणि योगदान साहित्याच्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘सनातन’ ही केवळ एका समाजाची कथा नसून भारतीय समाजव्यवस्थेतील दीर्घकालीन विषमता आणि तिच्याविरुद्धच्या संघर्षाचे साहित्यिक रूप आहे. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास, सामाजिक वास्तव, सांस्कृतिक स्मृती आणि मानवी संघर्ष यांची केलेली कलात्मक गुंफण. त्यामुळे या कादंबरीला साहित्यिक मूल्याबरोबरच सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.
दलित साहित्य सीमांच्या विस्ताराचा आग्रह
लिंबाळे यांच्या साहित्य विचारातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दलित साहित्याला भाषिक, जातीय आणि सामाजिक मर्यादांमध्ये बंदिस्त न ठेवण्याचा त्यांचा आग्रह. दलित साहित्याने व्यापक मानवी जीवनाशी संवाद साधला पाहिजे. त्याचा अनुवाद विविध भाषांमध्ये झाला पाहिजे आणि त्यातील मानवी मूल्ये जगभर पोहोचली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. साहित्यिकाची ओळख केवळ त्याच्या जातीय किंवा सामाजिक पार्श्वभूमीवर ठरू नये, तर त्याच्या साहित्यिक गुणवत्तेवर, विचारांच्या व्यापकतेवर आणि मानवी मूल्यांवरील निष्ठेवर ठरावी, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वपूर्ण पैलू आहे.