माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग गेल्याचं समजलं अन् मला अतीव दुःख झालं. मनाला खूप वेदना झाल्या. मी डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात काम केलंय. त्यांना मी खूप जवळून पाहिलंय, अनुभवलंय. त्यांची अन् माझी वैचारिक नाळ अगदी घट्ट जुळली होती. विलक्षण हुशार, संवेदनशील असा कर्तृत्ववान प्रशासक, नेता, अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी आपण आज गमावलांय. याचं मला खूप, खूप दुःख होतंय.
- सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री
डॉ. मनमोहन सिंग यांनी माझ्यावर नितांत प्रेम केलं. मला आठवतंय 2005-2006 साली मी आंध्र प्रदेशचा राज्यपाल होतो. तेव्हा त्यांनाही वाटायचं की या बिचार्याला म्हणजे मला राज्यपाल केलंय, पण हा राजकारणात, मंत्रिमंडळात काम करणारा चांगला कर्तबगार माणूस आहे. त्याला म्हणजे मला मूळ प्रवाहात आणलं पाहिजे. खरं सांगायचं तर त्यांनी माझं मन जाणलं. मलाही माझ्या मूळ प्रवाहात यायचं होतं. त्यांनी मला 2006 च्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात घेतलं. तत्पूर्वी त्यांनी मला राज्यपालपदाचा राजीनामा द्यायला लावला. ही अशी पहिलीच घटना घडली देशामध्ये की, राज्यपालपदावरील व्यक्तीनं राजीनामा देऊन थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवलं. तो मी होतो. या सार्या नाट्यामागे डॉ. मनमोहन सिंग होते. परंतु हे तेव्हा त्यांनी मला कुठंच व्यक्त करू दिलं नाही.
अतिशय संयमी, शांत व कोणत्याही कामाचा गवगवा न करता ते करण्याचा त्यांचा कटाक्ष असायचा. त्याच्यामुळंच मी तब्बल साडेसहा वर्षे केंद्रात ऊर्जामंत्री म्हणून काम केलं. त्यावेळी विविध ठिकाणी पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी त्यांनी अगदी सढळ हाताने निधी उपलब्ध करून दिला. त्येंचं एकच म्हणणं असायचं, “कुछ भी करो, सुशीलकुमारजी मगर पुरे हिंदुस्थान में एक भी मकान ऐसा नही होना चाहिए की वहा बिजली न हो।” आताचे सत्तेतले राजकारणी न केलेल्या कामाचाही गवगवा करतात. मात्र, डॉ. मनमोहन सिंग यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी फक्त माझ्या ऊर्जा मंत्रालयासाठी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच आज पूर्ण हिंदुस्थानभर प्रकाश, उजेड आहे. अर्थात याचं सारं श्रेय डॉक्टरसाहेबांना जातंय.
मी पॉवर मिनीस्ट्रीमध्ये चांगलं काम केल्यानं देशभरात आमच्या सरकारचा चांगला गवगवा झाला. त्यानंतर मला होम मिनिस्ट्री (गृह मंत्रालय) मिळालं. तिथंही मी चांगल्या प्रकारे काम केलं म्हणून डॉ. मनमोहन सिंग मला नेहमीच शाबासकी देत असत. इतकंच नव्हे तर ज्यावेळी प्रणव मुखर्जी राष्ट्रपती झाले त्यावेळेस ते लोकसभेचे नेते होते. त्यामुळे त्यांच्या जागी आता दुसर्या कुणाला लोकसभेचा नेता करायचं, हा प्रश्न होता. तेव्हाही डॉ. मनमोहन सिंग यांनी सर्वांशी विचार विनिमय करून, विशेष म्हणजे तेव्हा ते राज्यसभेचे सदस्य होते. म्हणून लोकसभेचा नेता निवडीसाठी त्यांनी माझं नाव पुढं केलं आणि मी लोकसभेचा नेता झालो. अशाप्रकारे डॉ. मनमोहन सिंग यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.
माझ्यासारख्या दलितवर्गीय कार्यकर्त्यावर विश्वास दाखवणार्या, त्याला पुढं नेणाची दूरद़ृष्टी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे होती. ही काय साधी गोष्ट नाही. विशेषतः त्या काळात तर नाहीच नाही. राज्यपाल पदावरून डायरेक्ट पॉवर मिनीस्ट्री तेथून डायरेक्ट होम मिनीस्ट्री देणं, त्या पुढे जात लोअर पार्लमेंट लीडर (लोकसभा नेता) केलं ही काय साधी गोष्ट होती का; पण डॉक्टरसाहेबांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला. माझ्या राजकीय चढत्या आलेखात डॉ. मनमोहन सिंग यांचे मोठे योगदान आहे अन् ते मी कधीही विसरू शकणार नाही. अशाप्रकारचा नेता आज आपल्यामधून गेलाय याचं मला अतीव दुःख होतंय. देशामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी आर्थिक नीती आणली, देशाची आर्थिक स्थिती सुधरवली त्याची इतिहासात नोंद झालीय. जगानेही त्यांच्या या कार्याची दखल घेतली आहे. अशा देशसेवा करणार्या राजकीय नेत्याला माझी मनस्वी श्रद्धांजली.
पंतप्रधानांसाठी एक स्को (एस. सी. ओ.) नावाची संस्था असते. जिथं हे आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब जातात. पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत अन्य कुणालाही कधीच या संस्थेच्या मिटींगला पाठवलं नाही; पण डॉ. मनमोहन सिंग यांनी मला दोनदा या स्को च्या मिटींगला पाठवलं. कारण हा पंतप्रधान लेव्हलच्या नेत्याचा इश्यू असतो. तेथे दुय्यम नेता कधीच चालत नाही, परंतु डॉक्टरसाहेबांनी मला त्या योग्यतेचा दर्जा देत या मिटींगला एकदा नव्हे तर दोनदा पाठवलं. यासाठी मला कझाकिस्तानला पाठवलं. तेव्हा तिथं रशीयाचे व्लादमिर पुतीन वगैरे जागतिक नेते होते. ही रियरेस्ट रिअर अशी घटना आहे. ती संधी मली फक्त आणि फक्त डॉक्टरसाहेबांमुळेच मिळाली होती. ती मी कधीच विसरू शकत नाही.
(शब्दांकन ः संजय पाठक, सोलापूर)