Dr. Madhav Gadgil | पर्यावरण चळवळींचा ‘पितामह’ Pudhari File Photo
संपादकीय

Dr. Madhav Gadgil | पर्यावरण चळवळींचा ‘पितामह’

पुढारी वृत्तसेवा

प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी आयुष्य वेचणार्‍या डॉ. माधव गाडगीळ यांचे कार्य दूरद़ृष्टीचे होते. त्यांच्या जाण्याने एक सच्च्चा पर्यावरणवादी काळाच्या पडद्याआड गेला आहे.

डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे नाव सर्वांच्या परिचयाचे होते याचे प्रमुख कारण म्हणजे पश्चिम घाटासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिलेला अहवाल. हा अहवाल तत्कालीन केंद्र सरकारने स्वीकारला नसला तरी गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये केरळ, महाराष्ट्रासह विविध ठिकाणी आलेल्या आपत्तींमुळे डॉ. गाडगीळ सरांनी केलेल्या शिफारशी किती महत्त्वाच्या आणि गरजेच्या होत्या याची जाणीव सर्वांना झाली. अतिशय बुद्धिवंत, अभ्यासू आणि पर्यावरणाविषयीची सखोल जाण असणारे ते संवेदनशील पर्यावरणशास्त्रज्ञ होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना हाल्डेन यांची पुस्तके वाचून डॉ. गाडगीळ जीवशास्त्र या विषयाकडे आकर्षित झाले. पुणे विद्यापीठातून जीवशास्त्रात पदवी आणि मुंबई विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात गेले. 1969 मध्ये त्यांनी ‘मॅथेमॅटिकल इकॉलॉजी’या विषयात पीएच.डी. मिळवली. गणिताचा आधार घेऊन जीवशास्त्रातील कूट प्रश्न सोडवण्याचे त्यांचे कसब पाहून हार्वर्डने त्यांना तिथेच थांबण्याची विनंती केली होती. मात्र, आपल्या देशातील जैवविविधतेवर काम करण्याच्या ध्येयाने ते 1971 मध्ये मायदेशी परतले. त्यांनी बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये काम सुरू केले. 1973 मध्ये त्यांनी ‘सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ संस्थेची स्थापना केली. डॉ. गाडगीळ हे प्रयोगशाळेत बसून संशोधन करणारे शास्त्रज्ञ नव्हते, तर सतत डोंगरदर्‍यांमध्ये फिरून, सूक्ष्म निरीक्षण करण्याचा त्यांना व्यासंग होता.

केंद्र सरकारने संपूर्ण पश्चिम घाटाची वास्तवस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ‘गाडगीळ समिती’ नेमली. डॉ. गाडगीळ सरांनी गुजरातच्या पायथ्यापासून केरळपर्यंत पसरलेल्या पश्चिम घाटाच्या प्रत्येक ठिकाणी भेटी दिल्या. गावकरी, सरकारी अधिकार्‍यांशी चर्चा केली. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात या सर्व राज्यांमध्ये दोन वर्षे पायी फिरून विस्तृत अहवाल सादर केला.

अहवालामध्ये डॉ. गाडगीळ यांनी असे म्हटले होते की, संपूर्ण पश्चिम घाट हा संवेदनशील आहे. त्यामुळे 90 टक्के पश्चिम घाट हा इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केला पाहिजे. अतिसंवेदनशील, मध्यम संवेदनशील आणि कमी संवेदनशील असे पश्चिम घाटामधील तीन भाग त्यांनी यामध्ये नमूद केले होते. अतिसंवेदनशील भागात मनुष्यवावरास बंदी, तेथे धरणांची निर्मिती नको, रासायनिक शेती नको, अशी शिफारस त्यांनी केली होती. केंद्र सरकारने हा अहवाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिला, पण अतिशय लघुरूपात. सरांनी विविध राज्यांमध्ये जाऊन या अहवालात आपण नेमके काय म्हटले आहे, याबाबत सभा घेण्यास सुरुवात केली. कोल्हापूर, सातारा, बेळगाव येथील सभांमध्ये सरकारी अधिकारी सरांसमोरच अहवालाविषयीची चुकीची माहिती लोकांना देत होते. तेव्हा सरांनी त्यावर आक्षेप घेतला. नंतर सरकारने हा अहवाल फेटाळल्याचे जाहीर केले. हा डॉ. माधव गाडगीळ यांना सर्वांत मोठा धक्का होता. डॉ. गाडगीळ आणि डॉ. वर्तक यांनी पश्चिम घाटातील देवरायांचाही विस्तृत अभ्यास केला. ईशान्य भारतातील जैवविविधताही अभ्यासली. 200 हून अधिक लेख लिहिले. ‘वारूळ पुराण’ पुस्तकातून गाडगीळ सरांचा सखोल अभ्यास आणि तळमळ जाणवते. त्यांच्या पुस्तकांचे भारतीय तसेच चिनी भाषेतही अनुवाद झाले. सरकारने त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मान केला. डॉ. गाडगीळ यांनी बिबट्यांच्या शिकारीला परवानगी देण्यात यावी, अशी शिफारस केली होती. त्याचा शास्त्रीयद़ृष्ट्या विचार व्हायला हवा होता; पण तोही झाला नाही. आज जग पर्यावरणाच्या दोहनामुळे झालेल्या परिणामांच्या विळख्यात अडकत चालले आहे. अशा स्थितीत डॉ. गाडगीळांसारख्या पर्यावरण चळवळींचा पितामह अनंताच्या प्रवासाला निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT