Dr. Jayant Narlikar's birthday
विज्ञान कथांच्या मागावर Pudhari File Photo
संपादकीय

विज्ञान कथांच्या मागावर

पुढारी वृत्तसेवा
उदय कुलकर्णी

रामायणातील ‘रामसेतू’, ‘पुष्पक विमान’ या सर्व गोष्टी खर्‍या की कवीकल्पना? ‘रामायण’, ‘महाभारत’ यांच्याकडं महाकाव्य म्हणून पाहायचं की इतिहास म्हणून? समुद्राच्या पोटात बुडालेल्या सोन्याच्या द्वारकेचे अवशेष अजून आहेत का? या सर्व गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न सातत्यानं होत आहे. यापैकी ‘रामसेतू’चं तसेच ‘द्वारके’चं अस्तित्व काही प्रमाणात निदर्शनास आलं आहे. साहजिकच या महाकाव्यांमधील सर्व गोष्टींकडं केवळ काल्पनिक कथा म्हणून पाहता येत नाही.

परग्रहावर जीवसृष्टी आहे का, याचाही शोध गेली दीड-दोन शतकं सुरू आहे. गणिती पद्धतीनं उत्तर शोधायचं, तर ब्रम्हांडातील अनेक ग्रहांवर प्रगत-अप्रगत जीवसृष्टी असू शकते, ही शक्यता शास्त्रज्ञांना नाकारता येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन परग्रहवासीयांबाबतच्या अनेक कथा जगभरातील विज्ञान कथालेखकांनी लिहिलेल्या आहेत. विज्ञानविषयक काही कल्पना कथालेखकांनी आधी लिहिल्या आणि त्याच प्रकारचे शोध नंतर संशोधकांनी लावले असं अनेकदा घडलं आहे. तसेच संशोधकांनी आधी लावलेल्या शोधांच्या आधारे भविष्यात घडू शकणार्‍या घटनांविषयी लेखकांनी कथा लिहिल्या असाही प्रकार घडला आहे. थोडक्यात, संशोधन आणि विज्ञान काल्पनिक यांचा परस्परसंबंध असा सातत्यानं द़ृढ होत आला आहे. हे सर्व आता आठवण्याचं कारण म्हणजे 19 जुलै हा दिवस.

डॉ. जयंत नारळीकर यांचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्रात तो ‘विज्ञानकथा दिवस’ म्हणून साजरा केला जातो आणि 20 जुलै हा मानवानं चंद्रावर पाऊल ठेवलं त्याचा स्मरणदिवस! कोल्हापुरात जन्मलेल्या वैज्ञानिकाच्या नावानं ‘विज्ञानकथा दिवस’ साजरा होणं ही कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब! खरं तर, बाळाजी प्रभाकर मोडक यांनी मराठीत स्वतंत्रपणे विज्ञान लेखन करण्याचा पाया कोल्हापुरातून घातला. त्यांनी रसायनशास्त्रावर स्वतंत्रपणे पुस्तक लिहिण्यापासून सुरुवात करून विविध विज्ञान विषयांवर सुमारे 26 पुस्तकं लिहिली. या माणसाला मात्र न्याय मिळाला नाही.

जागतिक पातळीवर विज्ञान कथा लेखनाची सुरुवात विसाव्या शतकाच्या तिसर्‍या दशकात झाली. 1926 मध्ये ह्यूगो गर्न झबॅक यांनी ‘अमेझिंग स्टोरीज’ नावाचं विज्ञानकथा प्रसिद्ध करणारं मासिक सुरू केलं होतं. त्याआधी एकोणीसाव्या शतकात ख्यातनाम कवी शेली यांची पत्नी मेरी शेली हिनं ‘फ्रँकेस्टाईन’ नावाची कथा लिहिली. ती विज्ञान काल्पनिका प्रकारातील असली, तरी तिला पूर्णपणे विज्ञान कथा म्हणता येईल अशी स्थिती नाही. यानंतर ज्यूल व्हर्न, रॉबर्ट पेअरी, एच. जी. वेल्स अशा विज्ञान कथा लेखकांनी जगाचं लक्ष वेधून घेतलं. ‘द फर्स्ट मेन इन टू मून’ ही मानव चंद्रावर उतरल्याची कल्पना करणारी कादंबरी एच. जी. वेल्स यांनी 1901 मध्ये लिहिली होती. प्रत्यक्षात हे स्वप्न अवतरायला सुमारे आणखी 68 वर्षे जावी लागली. या कादंबरीचा अनुवाद ‘चंद्रलोकची सफर’ या नावानं कृष्णाजी आठले यांनी केला होता. 1911 मध्ये श्रीधर रानडे यांनी ‘तारेचे हास्य’ नावाची मराठीतील स्वतंत्र विज्ञान कथा पहिल्यांदा लिहिली. त्यानंतर मराठीतील विज्ञान कथांचा प्रवास सुरू झाला, ज्यामध्ये यशवंत रांजणकर, द. पां. खांबेटे, दि. बा. मोकाशी, भा. रा. भागवत, जयंत नारळीकर, निरंजन घाटे यांनी आपापल्यापरीनं योगदान दिलं. नारळीकरांच्या ‘कृष्णविवर’ या कथेपासून मराठीतील विज्ञान कथेकडं गांभीर्यानं पाहिलं जाऊ लागलं. 1975 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात श्रीमती दुर्गा भागवत यांनी नारळीकरंच्या विज्ञान कथांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आणि तेथून मराठी विज्ञान कथा हे लक्षणीय दालन बनलं.

SCROLL FOR NEXT