Dr. Gopalrao Patil | ‘लातूर पॅटर्न’चे जनक : डॉ. गोपाळराव पाटील  
संपादकीय

Dr. Gopalrao Patil | ‘लातूर पॅटर्न’चे जनक : डॉ. गोपाळराव पाटील

पुढारी वृत्तसेवा

शहाजी पवार

समाजाच्या भल्यासाठी जगलेल्या माणसाचे जाणे अंतकरणाला चटका लावणारे असते. ‘लातूर पॅटर्न’चे जनक माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निर्वाण लातूरकरांना असेच चटका लावणारे आहे. बालरोगतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एवढीच गोपाळरावांची ओळख नव्हती, तर त्यांच्या सेवाकार्याचे नाते विद्यार्थ्यांशी अन् बांधिलकीशी जडले असल्याने ते सर्वांचे ‘आप्पा’ झाले होते.

कवठा हे आप्पांचे जन्मगाव. परोपकाराचे गुरुत्व त्यांना आई-वडिलांकडून मिळाले. हैदराबाद मेडिकल कॉलेजमधून त्यांनी शिक्षण व बालआरोग्याची पदविका प्रावीण्यासह प्राप्त केली. कुर्नूल, हैदराबाद वैद्यकीय महाविद्यालयात काही काळ ते प्राध्यापक होते. कुरुंदवाड (जि. कोल्हापूर) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काही काळ त्यांनी काम केले. 1965 मध्ये आप्पांनी लातुरात बालरोगतज्ज्ञ म्हणून सेवा सुरू केली. खेड्यांतून आजारी बालके घेऊन आलेल्या माऊलींना आप्पांचा दवाखाना मोठा आधार होता. एखाद्याकडे पैसा नाही म्हणून आप्पांनी सेवा नाकारली नाही. 1960 मध्ये लातूरमध्ये शिवछत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना झाली. संस्थेने विद्यालये सुरू केली. आज देशभर परिचित असलेल्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची उभारणी झाली. आप्पा या संस्थेचे अध्यक्ष होते. प्रारंभीपासूनच गुणवत्तेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ही संस्था सर्वांच्या सहकार्याने नावारूपाला आणली. यातूनच लातूर पॅटर्न साकारला. पुढे आप्पा राजकारणात आले. गोपिनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नांतून 1991 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. हा निर्णय बदलावा म्हणून शरद पवारांनी आप्पांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला; परंतु आप्पा निर्णयावर ठाम राहिले. त्यांनी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या विरोधात लातूर लोकसभा लढवली. त्यांना यश लाभले नाही.

त्यांची विद्वता पाहून भाजपने त्यांना 1994 मध्ये त्यांना राज्यसभेवर घेतले. अनेक महत्त्वाच्या संसदीय समित्यांवर त्यांनी काम केले. अनेक विषय प्रभावीपणे मांडले. सभागृहात व सभागृहाबाहेर सवंग भाषा कधीच वापरली नाही. वैयक्तिक टीका केली नाही. अटलबिहारी वाजेपेयी यांनी त्यांचा नॉलेज कॉर्पोरेशन ही उपाधी देऊन गौरव केला. शिक्षण संस्थेचा कारभारही त्यांनी लोकशाही पद्धतीने केला. शिस्त, गुणवत्ता अन् पारदर्शकतेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. संस्थाध्यक्ष म्हणून रुबाब गाजवला नाही. शिक्षक-मुख्याध्यापकांना, प्राचार्य-प्राध्यापकांना त्यांनी विद्यार्थी घडवण्यासाठी मोकळीक दिली. त्यांच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही.

शिक्षक-प्राध्यापकांच्या मुलाखती ते स्वतः घेत. ज्ञानाच्या कसोटीवर उतरलेल्यांना नियुक्ती देण्याचा धर्म त्यांनी निष्ठेने पाळला. त्यामुळेच शाहू कॉलेज व लातूर पॅटर्न केवळ नावारूपालाच आला नाही, तर पालक-विद्यार्थ्यांच्या मनात कायम घर करून राहिला. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी जगभरात विविध पदांवर कार्यरत आहेत. लातुरात भालचंद्र ब्लड बँक व उदगीरमध्ये उदयगिरी लायन्स रुग्णालय त्यांच्याच पुढाकाराने उभारले गेले. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव केला गेला. वर्तनातील विनम-ता, आचरणातील निर्मळता अन् वाचेतील मधुरता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती. त्यांचा जीवनप्रवास हा ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’ याची साक्ष देणारा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT