National Science Day | ‘विज्ञानभान’ विकसित करताना... 
संपादकीय

National Science Day | ‘विज्ञानभान’ विकसित करताना...

पुढारी वृत्तसेवा

डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण सातत्याने वैज्ञानिक द़ृष्टिकोन निर्माण करण्याकडे वळवली पाहिजे.

डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण यांचा स्मृतिदिन म्हणून 28 फेब—ुवारी हा दिवस भारतामध्ये विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 1921 च्या सुमारास जेव्हा डॉ. रमण युरोपच्या दौर्‍यावर होते, त्यावेळी भूमध्य समुद्राच्या अनोख्या निळाईने ते भारावून गेले आणि या अनुभवामागचा शास्त्रीय कार्यकारणभाव शोधण्यास त्यांनी प्रारंभ केला. त्याची परिणती म्हणजे ‘रमण परिणाम’ आहे. त्यांच्या याच कामाला नोबेल पारितोषिक मिळाले.

आज विज्ञान-तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केलेली आहे. याच मूर्तिमंत उदारण म्हणजे विश्वाच्या नव्या प्रेमलहरीचा शोध. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी 100 वर्षांपूर्वी सांगितलेले भाकित म्हणजे गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व हे आजपर्यंत वाटणारे एक स्वप्न होते; पण शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्नांनी ते साध्य करून दाखवले. विज्ञानाने माणसाचे बरेचसे भौतिक प्रश्न सोडवले. आयुर्मान वाढले. जगणे सुखावह झाले. ज्ञानेद्रिंये आणि तर्कबुद्धी यातून विज्ञानाचा जन्म झाला. विज्ञानामुळे सत्य शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक गृहितक हे विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतले जाते आणि मगच त्याला वैज्ञानिक सत्य म्हणून मान्यता मिळते.

आज शाळांमधून इतर विषयाप्रमाणे एक विषय म्हणून विज्ञान हा विषय शिकवला जातो; पण विज्ञान केवळ एक विषय नसून ती एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेवर विकासाची दिशा अवलंबून आहे. हा द़ृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला पाहिजे. शाळांमधून प्रयोग हा शब्द केवळ सैद्धांतिक किंवा तात्विक स्वरूपापुरता मर्यादित राहिलेला आहे. शाळांमध्ये प्रयोग ‘लिहून’ दिले जातात. ते करून घेतले जातात का? संशोधन करणार्‍या विज्ञानाच्या प्रयोगशाळा, विद्यापीठाच्या प्रयोगशाळा, शास्त्रज्ञ काम करतात त्यांची प्रयोगाची ठिकाणे ही अत्यंत उच्च स्वरूपाची, भौतिक व वैज्ञानिक सुविधांची रेलचेल असलेली आहेत. याची दुसरी बाजू पाहिली, तर अनेक शाळांमध्ये अजूनही विज्ञानाच्या प्रयोगशाळा नाहीत. इयत्ता पहिली ते आठवीच्या 80 टक्के विद्यार्थ्यांना प्रयोग करण्याची संधी शून्य प्रमाणात मिळते. इयत्ता नववी, दहावीला विज्ञानाची प्रयोग परीक्षा असल्यामुळे 80 टक्के ठिकाणी काही प्रमाणात विज्ञानाचे प्रयोग दाखवले जातात आणि 20 टक्के शाळांमधूनच ते करून घेतले जातात. वास्तविक, दुसर्‍याचा अनुभव स्वतःला घेता येत नाही आणि अनुभव घेतल्याशिवाय त्यातला आनंद कळत नाही. असे असताना शालेय शिक्षण आणि विज्ञानाबाबतचे वास्तव जर असे असेल, तर भविष्यकाळात शास्त्रज्ञ कसे तयार होतील?

विद्यार्थ्यांनी मूलभूत विज्ञानामध्ये करिअर करावे याबाबतीत आपण मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरलेलो आहोत. बारावी झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात मूलभूत विज्ञानामध्ये करिअर करावे, संशोधन करावे हा विचार येत नाही. नवी पिढी विज्ञानाच्या मूलभूत क्षेत्रामध्ये संशोधन करत नाही, तोपर्यंत आपण जागतिक पातळीवर विज्ञानाच्या स्पर्धेत यशस्वी होऊ शकत नाही. डॉ. चंद्रशेखर व्यंकटरमण यांच्यानंतर भारताला विज्ञानामधील एकही नोबेल पारितोषिक मिळालेल नाही. काही देशांमधील दोन ते तीन शास्त्रज्ञांना एकाच वर्षी नोबेल पारितोषिक मिळते. याचा विचार शासनाने व सर्वच समाजाने करण्याची गरज आहे.

आपल्याला शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांच्या मनाची जडणघडण सातत्याने वैज्ञानिक द़ृष्टिकोन निर्माण करण्याकडे वळवली पाहिजे. त्यासाठी विज्ञानाचे प्रयोग करण्याची संधी देणारे छोटे-छोटे किटस् शासन, एनजीओ, सामाजिक संस्था, वैज्ञानिक संस्था यांनी विद्यार्थ्यांना देणे आणि तेही अत्यंत कमी किमतीमध्ये देणे आवश्यक आहे. तसे झाले, तर हा उद्देश पुढील दहा वर्षांमध्ये थोड्याफार प्रमाणात साध्य होऊ शकेल. कै. डॉ. व्ही. जी. भिडे यांनी असा एक प्रयत्न केला होता; परंतु तो निधीअभावी वास्तवात येऊ शकला नाही. विज्ञान दिनाच्या निमित्ताने हा विचार व्हायला हवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT