चिमण्या, कावळे ओरडायला चालू व्हायच्या आत ट्रम्पचे ट्विट उजाडताच व्हायरल झाले, तसे सोशल मीडियावर कमेंटमधून किलबिलाट होऊ लागला. तात्याला डोळ्याला डोळा लागेना म्हणून चीनचे बारीक असलेले डोळे खाड्कन उघडावे, यासाठी तात्याचा खटाटोप. खोड्या काढल्याशिवाय तात्या गप्प होत नाही. पुन्हा इराणच्या खोड्या काढायला सज्ज. ‘युद्धाचा विराम’ हे वाक्य दरवेळी स्वल्पविरामात टाकून बातमीदार थकले. कारण, ट्रम्प पुन्हा युद्धाला उताविळ होतो. त्याला पूर्णविराम सध्या तर नाही, असे स्पष्ट दिसत होते. हे नित्याचं होतं बातमीदारांसाठी. एकापाठोपाठ एकाची ट्रम्पूने खोडी काढली तर कसे होणार? पहिला नंबर रशियाचे पुतीन, मग चीन आणि भारत असे देश लिस्टमध्ये दाखल झाले. पुतीनना न राहवल्याने त्यांनी उलट ट्विट केले, नंतर चीन आणि शेवटी भारताचे मौन, म्हणजे ती प्रतिक्रियाच होती असं मानायला हरकत नाही; तर ट्विट काय होतं, सगळे एकत्र आहात, तर शेवटपर्यंत एकत्र राहाल, अशी आशा करतो या अर्थी. आता यात झोप उडाल्याचं प्रथमदर्शी निदर्शनास आलं. तसे पुतीन, जिनपिंग खवळले आणि उलट ट्विट केले.
पुतीन : रशियाच्या नादी लागून काय मिळणार? त्यापेक्षा आपण आपले कारनामे थांबवा. बरे होईल. रशिया नेहमीच भारतासोबत राहील.
जिनपिंग : चीनला डोळे मोठे करता येत नसले, तरी आम्ही डोळे उघडायच्या आत सुधरा. आयुष्य जपा. आमच्या नादी नका लागू.
भारत : नरोवा कुंजरोवा! (भारताचे ट्विट अजून पेंडिंग असल्याने ट्रम्प अजून जागा आहे असे समजून पुढील ट्विट वाचू)
ट्रम्प : तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा!
जिनपिंग : शुभेच्छा गेल्या चुलीत. इराणशी पंगा घेतला तेवढा पुरे. तो शेवटपर्यंत घ्या. अशी शुभेच्छा देतो. इराण आपल्या मानेवर बसला आहे. झोपू देणार नाही.
ट्रम्प : आम्ही त्याला मनावर घेत नाही.
पुतीन : आपल्याला मन देवाने बहाल केलेले नाही. चिंता नसावी. गो अहेड!
भारत : आम्ही लवकर यावर प्रतिक्रिया देऊ. तूर्तास रजा असावी.
ट्रम्प : आपण चीनला साथ देत आहात हे जाणवले. प्रतिक्रिया नाही दिली तरी चालेल.
किंग जॉन : तू परत आला काय बे? तात्या तुला पोत्यात घालून मारेल. कशाला मरायला उगवतोस सूर्याच्या आधी. तिकडे तर अर्धी रात्र असेल. इकडचा सूर्य तिकडे करेन. झोप गप. मी कालच नेटचा रिचार्ज मारला. आता तू मर!
(ट्रम्पचे ट्विटर अकाऊंट कोणीतरी हॅक केले होते, अशी न्यूज पसरली आणि किंग जॉनला माफीचे उत्तर आले.)