संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर जगाला सहकार्याची भाषा ऐकण्याची सवय आहे; मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी या व्यासपीठाचा उपयोग अमेरिकन सामर्थ्य, सार्वभौमत्व आणि एकतर्फी कृतीच्या राजकारणाचा जाहीरनामा मांडण्यासाठी केला. इराणपासून व्हेनेझुएलापर्यंत आणि एआयपासून संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर त्यांच्या भाषणातून एकच सूत्र पुढे आले. जागतिक व्यवस्थेने अमेरिकेला नियंत्रित करण्यापेक्षा अमेरिकेच्या सामर्थ्याशी जुळवून घ्यावे. प्रश्न एवढाच आहे की, महासत्तेच्या सामर्थ्याचा हा आविष्कार जगाला स्थैर्याकडे नेणार की नियमाधारित जागतिक व्यवस्थेची पकड आणखी सैल करणार? आमसभेत ट्रम्प यांनी दिलेले भाषण एकतर्फी लष्करी वर्चस्ववादाचे दर्शन तर होतेच; पण त्याहीपेक्षा त्यात वास्तवाकडे डोळेझाक करणारा अहंकार अधिक होता. इराण आणि व्हेनेझुएलामधील लष्करी हस्तक्षेप योग्यच होता, असे ठामपणे सांगताना जागतिक समुदायाची अशा आव्हानांना तोंड देण्याची क्षमताच उरलेली नाही, असा दावा ट्रम्प यांनी केला; परंतु तो करताना अमेरिकेच्या अंतर्गत आणि बाह्य धोरणातील उणिवा लपवण्याचा प्रयत्न दिसून आला. इराणमधील युद्ध सात महिन्यांपासून सुरू आहे, हाच मुळात जागतिक आर्थिक व सामरिक महासत्ता अमेरिकेचा पराभव आहे. या युद्धात अमेरिका अडकून पडली आहे, तरीही ट्रम्प यांनी इराणला सर्वनाश करण्याची धमकी दिली. युद्धामुळे इंधन दरांच्या तीव्र झळा अमेरिकन जनतेला बसत आहेत. अमेरिकन नागरिक युद्धाला कंटाळल्याचे सर्वेक्षण सांगत आहे, तरीही ट्रम्प यांनी आम्ही जुने हिंसेचे व्यवहार पूर्ण करत आहोत, असा आव आणणे ही मखलाशी अमेरिकन नागरिकांनाही रुचणारी नाही. हा केवळ जनतेच्या असंतोषाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार नसून, लष्करी ताकदीच्या जोरावर सर्व काही साध्य करता येते, या भ्रमात राहण्याचा प्रकार आहे. एआयमुळे मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो या इशाऱ्याला त्यांनी 'जागतिक कट' म्हणून फेटाळून लावले. मूळ समस्येला राजकीय रंग देण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे. अँथ्रॉपिकचे सीईओ रियो अमोदेई, ओपन एआयचे सॅम ऑल्टमन, गूगल डीपमाईंडचे डेमिस हसाबिस आणि इलॉन मस्क या दिग्गजांनीच एआयच्या अनियंत्रित वेगाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. अमेरिकेतील दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे खासदार एआयवर नियंत्रणासाठी कायदे आणण्याच्या तयारीत आहेत. असे असताना ट्रम्प यांनी या क्षेत्रातील मानकांना बाजूला सारत 'सुपरइंटेलिजन्स'चा स्वीकार करण्याचे केलेले आवाहन तंत्रज्ञानाच्या भयावह परिणामांकडे डोळेझाक करणारे आहे. एआयबाबत चीनपेक्षा आम्ही पुढे आहोत, या दाव्यात तथ्य असले, तरी चिनी संशोधन काही महिन्यांच्या अंतरावर आहे आणि सुरक्षिततेचे नियम डावलून पुढे जाणे आत्मघातकी ठरू शकते. ट्रम्प यांनी अमेरिकेकडे वापरून संपणार नाही इतका दारूगोळा असल्याचा दावा केला; परंतु सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या अहवालानुसार, टॉमहॉक क्षेपणास्त्रे आणि पेट्रियाट क्षेपणास्त्ररोधक यंत्रणांचा साठा पुन्हा भरून काढण्यासाठी किमान तीन ते चार वर्षे लागतील. इराण युद्धात अमेरिकन सैन्याला शस्त्रास्त्रांचा वापर मर्यादित करावा लागल्याचे आणि त्यामुळे काही इराणी हल्ले सहन करावे लागल्याचे अहवाल आलेत. युद्धात विजयाच्या बढाया मारण्याने ट्रम्प यांना आत्मिक समाधान लाभत असेलही; पण सत्य लपून राहत नाही. ड्रग्जविरोधी कारवाई, व्हेनेझुएलातील तेलाच्या साठ्याबाबतचे ट्रम्प यांचे दावेही अतिरंजित आहेत. व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडे मिळून जगातील साठ टक्के तेल असल्याचा दावाही अतिशयोक्तीपूर्ण असून प्रत्यक्षात या दोन्ही देशांकडे मिळून केवळ २१.९ टक्के तेलसाठा आणि २३.२ टक्के उत्पादन क्षमता आहे. व्हेनेझुएलातील तेल क्षेत्राला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अब्जावधी डॉलर्सची गरज असून त्यासाठी किमान चार ते दहा वर्षे लागू शकतात. तसेच समुद्री मार्गाने येणारे ९७ टक्के ड्रग्ज नष्ट केल्याचा त्यांचा दावा कुठल्याही अधिकृत माहितीवर आधारित नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’चा थरार पाहून पाकिस्तानने भारतासमोर नांग्या टाकल्या, तरीही ट्रम्प पुनः पुन्हा आपणच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा करताहेत. आमसभेतही त्यांनी मारलेली लोणकढी थाप हास्यास्पद आहे. माझ्या मध्यस्थीमुळे आणि प्रयत्नांमुळे भारत-पाकिस्तान संघर्षात सुमारे ३ कोटी लोकांचे प्राण वाचले, असे खुद्द शाहबाज शरीफ यांनी सांगितल्याचा दावा करत ट्रम्प यांनी शरीफांना 'टेरीफिक मॅन' संबोधले. जे नेते किंवा देश ट्रम्प यांचे सार्वजनिक व्यासपीठावर कौतुक करतात किंवा त्यांची क्षमता मान्य करतात, ट्रम्प त्यांच्याशी तात्पुरती जवळीक दाखवतात. पाकचे नेतृत्व या स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःच्या राजकीय हितासाठी त्यांची सातत्याने प्रशंसा करताना दिसते. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा भागात तांबे, सोने, अँटिमोनी, टंगस्टन आणि दुर्मीळ खनिजांचे मोठे साठे आहेत. ही खनिजे अमेरिकेला देण्यासाठी पाकची लष्करी संस्था एफडब्ल्यूओ आणि अमेरिकेची खासगी कंपनी 'यूएस स्ट्रॅटेजिक मेटल्स' यांच्यात ५०० दशलक्ष डॉलरचा सामंजस्य करार झाला. यामध्ये ट्रम्प यांचे अप्रत्यक्ष वैयक्तिक हितसंबंध गुंतल्याची टीका होत आहे. पाकच्या लाळघोटेपणामुळेच इराण युद्धात त्याला मध्यस्थीची संधी दिली होती. याउलट भारताने अमेरिकेसोबत व्यापार करारात कृषी, दुग्धोत्पादन आणि फिशरीज या क्षेत्राचे दरवाजे खुले करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. टॅरिफचा बडगा उगारूनही भारत मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळेच पाकची प्रशंसा करून ट्रम्प सौदेबाजीमध्ये दबाव निर्माण करत आहेत; पण त्यांची ही पद्धत आता नवी राहिलेली नाही. तसेच आज घेतलेल्या भूमिकेवर काही तासांनी ते ठाम राहतीलच याचीही शाश्वती नाही. त्यामुळेच क्युबा आणि इराणच्या प्रतिनिधींनी ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान सभात्याग केला. अमेरिकेतील नागरिक, तज्ज्ञ, थिंक टँक यांसह जगभरात ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण हे जागतिक सहकार्य आणि मुत्सद्देगिरीला तिलांजली देणारे आहे, असा सूर आहे. अंतर्गत समस्या, युद्धाचे दुष्परिणाम झाकण्यासाठी महासत्तेच्या ताकदीचे प्रदर्शन करणे दीर्घकाळ टिकणारे नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने सामर्थ्याबरोबरच संस्था, आघाड्या आणि नियमांच्या आधारे जागतिक नेतृत्व उभे केले. ट्रम्प त्या समीकरणातील 'नियम' आणि 'संस्था' यांचे वजन कमी करून 'सामर्थ्य' आणि 'राष्ट्रीय हित' यांचे वजन वाढवत आहेत. प्रत्यक्षात आजचे जग बहुध्रुवीय बनत आहे. ब्रिक्स संघटना अमेरिकाकेंद्री विश्वरचना उघडपणे नाकारत आहे. आखातातील अमेरिकेचा प्रभावही इराण युद्धामुळे फिका पडला. अशा काळात जगाला शांततेचा संदेश देण्यासाठी स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठांवरून नव्याने धमक्या द्याव्या लागणे, ही अगतिकता नाही, तर दुसरे काय आहे?