US-Israel Iran War | ट्रम्प यांनी चिंता वाढवली...  
संपादकीय

US-Israel Iran War | ट्रम्प यांनी चिंता वाढवली...

पुढारी वृत्तसेवा

मिथिलेश जोशी

डोनाल्ड ट्रम्प यांच्या इराण युद्धावरील भाषणाने दिलासा मिळण्याऐवजी नव्या शंका निर्माण केल्या आहेत. कारण युद्ध शेवटाचा आराखडा समोर आलेला नाही. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था, गुंतवणूकदार आणि सर्वसामान्यांमधील अस्वस्थता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

अत्यंत कसोटीच्या काळातून जग आणि अमेरिका जात आहे. इराण युद्धामुळे केवळ इराणच नव्हे तर जगाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे) राष्ट्राला उद्देशून पण सार्‍या जगाला संदेश देणारे भाषण केले. त्यात ते शस्त्रसंधीची घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र ट्रम्प यांच्या भाषणाचा रोख चिंता का करू मी विश्वाची, असाच होता. हा संवाद उत्तरे देण्याऐवजी नवे प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. या संबोधनात ट्रम्प यांच्यासमोर अत्यंत कठीण कसोटी होती. अलीकडील सर्वेक्षणांनुसार हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिकेने त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास गमावलेला आहे, त्यांच्या नव्या युद्धाविषयीही नाराजी वाढली आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणार्‍या परिणामाबद्दल जनतेत चिंता आहे.

जगभरातील कोट्यवधी लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की हे युद्ध कधी आणि कसे संपणार किंवा ते संपेल तरी का? विशेषतः इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक मंदीची भीती निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसच्या क्रॉस हॉलमधून दिलेल्या 20 मिनिटांच्या भाषणात ट्रम्प यांनी युद्धाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असा युक्तिवाद मांडला की, 47 वर्षांपासून अमेरिकेला धमक्या देणार्‍या इराणी शासनाला अण्वस्त्र मिळू देणे शक्य नव्हते. त्यांनी राजनैतिक प्रयत्नांचे अपयश आणि इराणी सरकारची कठोर दडपशाही यांचा उल्लेख करत स्वतःची ठाम भूमिका मांडली. मात्र, हे स्पष्टीकरण काही आठवड्यांपूर्वी अधिक प्रभावी ठरले असते. युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांच्या बदलत्या आणि विसंगत भूमिकेमुळे या युक्तिवादाची धार बोथट झाली आहे. त्यासाठी ठोस पुरावेही त्यांनी सादर केले नाहीत. तरीही, अमेरिकन आणि इस्रायली हवाई कारवाईमुळे इराणच्या लष्करी क्षमतेला मोठा धक्का बसल्याचा त्यांनी विश्वासार्ह दावा केला; परंतु या नुकसानीचे खरे प्रमाण काय आहे आणि त्यातून इराणी सत्तास्थापनेत काही तडे पडतील का, हे स्पष्ट नाही.

भाषणातून युद्धाच्या शेवटाचा कोणताही ठोस आराखडा समोर आला नाही. उलट, त्यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणला ‘मागास युगात नेण्याची’ धमकी देत संभाव्य लष्करी विस्ताराचे संकेत दिले. इराणने शांतता करार मान्य केला नाही तर त्यांच्या वीज केंद्रांवर आणि तेलसाठ्यांवर हल्ले करण्याची धमकीही त्यांनी दिली. अमेरिकन जनतेतील आणि जागतिक गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता त्यातून कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता आहे. युद्धातून बाहेर पडण्याची स्पष्ट रणनीती त्यांनी मांडली नाही. उलट, दोन महायुद्धे, कोरिया, व्हिएतनाम आणि इराक युद्धांशी तुलना करत हे युद्धही दीर्घकाळ चालू शकते, असे संकेत दिले.

ट्रम्प यांनी काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे टाळली. 1) इराणी सर्वोच्च नेत्यांसह अनेक नेत्यांचा अंत करून शासन बदल घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला, पण इराण अजूनही उरलेल्या सत्ताधार्‍यांच्या ताब्यात आहे. ते अधिक कडवे असल्याचे संकेत मिळत आहेत. 2) अणू केंद्रे पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा त्यांनी केला, मात्र समृद्ध युरेनियम साठ्यांबाबत स्पष्टता दिली नाही. 3) होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबतही त्यांनी ठोस पावले जाहीर केली नाहीत.

राजकीयद़ृष्ट्याही त्यांची स्थिती अधिकच गुंतागुंतीची होत आहे. बहुतांश अमेरिकन नागरिक या युद्धामुळे अर्थव्यवस्था बिघडत असल्याचे मानतात. त्यातून नोव्हेंबर महिना अखेरीस होणार्‍या मध्यावधी निवडणुकांच्या काळात त्यांना त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प यांचे हे भाषण जनतेचा विश्वास परत मिळवण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. युद्ध कधी संपेल आणि त्यानंतर जगाचे चित्र कसे असेल, याबाबत त्यांनी स्पष्टता दिली नाही. परिणामी, जागतिक चिंतेतही घट झालेली दिसत नाही. उलट जग पुन्हा मंदीत लोटण्याची शक्यता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT