घरोघरी विवेकाचे दीप उजळीत सणसम्र ज्ञी दिवाळीचं आगमन झालं आहे... लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत तेजाळून निघाला आहे... अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दीपोत्सव. जगण्यात सकारात्मकतेचे रंग भरणारा! साहजिकच, बाजारपेठेत नवचैतन्य संचारले आहे, ते या दिवसात जीवनाला स्पर्श करणार्या प्रत्येक पावलावर अनुभवायला मिळते आहे. आनंदाला नवे परिमाण देणार्या खरेदीचा उत्सवही थाटात सुरू झाला असून, बाजाराने तेजीची गती पकडली. त्यातून अर्थचक्र गतिमान होण्याची आशा दुणावली. ‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला होता. तो झुगारून बाजाराने सकारात्मक संकेत दिले.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्दाम स्वदेशी वस्तू, उत्पादने खरेदी करण्याच्या केलेल्या आवाहनाचे अनुकूल परिणाम दिसू लागले आहेत. तत्पूर्वीच, दसर्याआधी जीएसटी 2.0 द्वारे करसुधारणा राबवल्या. त्यामुळे सणांतील खरेदीची नांदी झाली. ‘जीएसटी कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचत असून, यावेळी सुमारे 20 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त खरेदी होईल,’ असे उद्गार केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढले.
‘खरेदीतील ही वाढ सुरूच राहील,’ असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही व्यक्त केला. जीएसटी कपातीनंतर दैनंदिन वापराच्या 54 वस्तूंपैकी 30 वस्तूंच्या किमतीत अपेक्षेपेक्षा घट झाली, तर 24 वस्तूंच्या किमतीत अंदाजापेक्षा कमी घट नोंदवण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, टी.व्ही. खरेदीत 20 ते 25 टक्के वाढ होताना इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच दुचाकी विक्रीतही सर्वाधिक वाढ नोंदवली गेली. गेल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.8 टक्के इतका विकास दर नोंदवला. हा दर अन्य तिमाहींमधील सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या तीन आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहींमधील वेगापेक्षा तो कमी आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया 87.95 इतका खाली आला आहे, हे चिन्ह चांगले नसले तरी येत्या काळात त्यात सुधारणा अपेक्षित आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेली घट आणि रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य हस्तक्षेपामुळे रुपयातील घसरण मर्यादित राहिली.
गेल्या आठवड्यात ब्ल्यूचिप बँकिंग, तेलवितरण कंपन्या आणि देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा सपाटा लावल्यामुळे सेन्सेक्स 84 हजारांच्या नजीक पोहोचला, तर निफ्टीने 25,700 अंशांपर्यंत झेप घेतली. आता मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मुहूर्ताचे सौदे असून, त्यावेळी शेअर बाजाराचा मूड हाच राहतो का, हे बघणे औत्सुक्याचे असेल. मुख्यत्वे उपभोगकेंद्रित क्षेत्रातील समभागांमुळे बाजारात तेजी आली.
अमेरिकेने कराची कुर्हाड चालवली असली, तरीदखील देशांतर्गत बाजारपेठच विशाल आहे. केंद्र सरकारने तातडीने अनुकूल कर धोरणे राबवल्यामुळे देशांतर्गत मागणीत उत्साह संचारला. त्यामुळे निर्यातीचे नुकसान भरून निघत आहे. बँकांकडून मिळणारे उत्पन्न आणि मालमत्तेच्या गुणवत्तेवरील ताण कमी होण्याच्या आशेने बँकिंग क्षेत्राच्या अपेक्षा उंचावल्या. गुंतवणूकदारांमध्ये चैतन्य आहे. बाजारभांडवलाच्या द़ृष्टीने देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सरलेल्या तिमाहीत 9.6 टक्के वाढीसह 18,165 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला. गुगलने आंध्रप्रदेशात 1,500 कोटी अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करून कृत्रिम प्रज्ञेचे पायाभूत केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला. तिथेच अदानी समूहाशी भागीदारी करून, एक गिगावॅट डेटा सेंटरही उभारले जाणार आहे.
ही बहुआयामी गुंतवणूक विकसित भारताच्या बांधणीच्या द़ृष्टिकोनातून सुसंगत असल्याची टिपणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर केली आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारात एक लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज असून, त्यात सोने-चांदीचा वाटा 60 हजार कोटी रुपयांहून अधिकचा आहे, असे ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने म्हटले आहे. चांदीची नाणी, विटा, बिस्किटे आदींची जोरदार खरेदी झाली. मौल्यवान धातूंमधील तेजी कायम राहण्याची अपेक्षा असून, विद्यमान वर्षात आतापर्यंत परताव्याच्या बाबतीत चांदीने सोन्यापेक्षा चांगली कामगिरी केली.
2025 मध्ये सोन्याच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या. जागतिक मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली सोने खरेदी, भूराजकीय तणाव आणि आशियाई देशांमधील सोन्याला असलेली मजबूत मागणी, यामुळे तेजी वाढली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून लवकरच व्याज दर कपातीची अपेक्षा असून, जगभरच्या मध्यवर्ती बँकांकडून सुवर्णसंचय वाढवला जात आहे. रिझर्व्ह बँकेकडील सुवर्णसाठ्याचे मूल्य 100 अब्ज डॉलर्सवर गेले. जगातील मध्यवर्ती बँकांमधील एकूण सुवर्णसाठ्यांमध्ये भारताचा वाटा 14.7 टक्के झाला आहे. गेल्या 35 वर्षांतले हे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील वर्षी दहा ग्रॅम सोन्याचा भाव 80 हजार रुपये होता, तो आता 1 लाख 30 हजार रुपयांवर गेला. तर चांदीचा प्रतिकिलो भाव गतवर्षी 98 हजार रुपये होता, तो 1 लाख 80 हजार रुपयांवर पोहोचला. म्हणजे सोन्याचे भाव 60 टक्क्यांनी, तर चांदीचे भाव 55 टक्क्यांनी वधारले.
लक्ष्मी-कुबेर पूजन आणि दीपावली पाडव्याच्या निमित्ताने या चैतन्याला नवी झळाळी येईल, अशी आशा आहे. विशेषत:, गुंतवणूकदारांचा कल कसा राहतो, हे पाहावे लागेल. पाडव्याला वाहने, इलेक्ट्रिकल साधने, गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीचा उधाण येईल, असे सांगितले जाते. गुंतवणूकदारांकडून समभाग, रोखे यांचीदेखील खरेदी होईल. सर्व बचत ही सोन्या-चांदीतच गुंतवणे, हे योग्य नसल्याचा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. शेअर बाजार व म्युच्युअल फंड हा अधिक चांगला व सशक्त पर्याय असल्याचे त्यांचे मत आहे. स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या भारताच्या धोरणाला गती देण्याचे मोठे आव्हान आहे. ते पार पाडण्याचा सरकारचा संकल्प आहे, त्याला ग्राहकांनी दिवाळी खरेदीच्या निमित्ताने चांगला प्रतिसाद दिला. मात्र, केवळ सोन्या-चांदीची वा दागदागिन्यांची खरेदी हे विकासाचे खरे लक्षण नव्हे. देशातील कारखानदारीचा जोमदार विकास झाल्यासच रोजगार वाढेल. शेतीत संरचनात्मक सुधारणा झाली, तर ग्रामीण भागांत खरे परिवर्तन येईल. ही दिवाळी त्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचा संदेश घेऊन आली आहे.